Monday, August 18, 2025

‘अभियांत्रिकी स्पंदने’—पुण्याच्या ज्ञानपरंपरेत एक नवा ठसा!

 

अभियांत्रिकी स्पंदने’—पुण्याच्या ज्ञानपरंपरेत एक नवा ठसा!

पुणे—विद्येचं माहेरघर!

या शहराने ज्ञान, संस्कृती, आणि विचारांची उज्ज्वल परंपरा जपली आहे!

डेक्कन जिमखाना हे त्या परंपरेचं तेजस्वी प्रतीक, जिथे विचारांचे दीप उजळतात, आणि नव्या कल्पनांना दिशा मिळते!

येथे Book Ganga International Book Store या प्रतिष्ठित दालनात माझं पुस्तक, ‘अभियांत्रिकी स्पंदने’ पोहचलं ! प्रतिष्ठित लेखकांच्या पुस्तकांसोबत ते दिमाखाने स्थानस्थ झालं! माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ! 

पुण्यातील काही जिवलग मित्रांनी सुचवले की हे पुस्तक Book Ganga मध्ये उपलब्ध असावे. त्यांच्या सूचनेनुसार मी त्वरित श्री. विवेक कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला आणि संध्याकाळी त्या दालनात पोहोचलो. मॅनेजर श्री. जोग यांनी अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. त्यांनी बुकगंगाच्या योजना, वेबसाइट, ऍप आणि लेखकांसाठी असलेल्या सोयींबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. कुमार यांनी पुस्तक ठेवण्याच्या औपचारिकता तत्परतेने पूर्ण केल्या. मी पुस्तकाच्या काही प्रती त्यांच्याकडे सुपूर्त केल्या. या प्रतींची विक्री झाल्यावर, पुढील मागणी नोंदविल्यानंतर त्याप्रमाणे प्रती उपलब्ध करून दिल्या जातील अशी व्यवस्था करून दिली. पुस्तकावर २५% सवलत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला—वाचकांसाठी एक आनंददायक बाब!

मा. विठ्ठलराव दीक्षितांचा वारसा लाभलेले, Book Ganga  हे केवळ पुस्तकांचे दुकान नाही, तर एक सांस्कृतिक केंद्र आहे. येथे मराठी आणि इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना आहे. मी पूर्वीही येथे अनेक पुस्तकांची खरेदी केली आहे. त्या आनंदाच्या आठवणींमध्ये, शेजारी असलेल्या चितळेंकडून बाकरवडी घेण्याचा मोहही अनेकदा अनिवार झाला आहे—कधी पुस्तकांनंतर, तर कधी अगदी उलट!

पण आजचा दिवस वेगळा होता. आज माझेच पुस्तक त्या दालनात स्थान मिळवत होते. पुण्याच्या ज्ञानपरंपरेत माझ्या लेखणीचा ठसा उमटत होता! हा विचारच मनाला गहिवरून टाकणारा होता! 

मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काही सुंदर क्षण टिपले गेले! विविध पुस्तकांचे दर्शन घेत, वेळ कसा गेला कळलेच नाही. बाहेर पडताना ओलाने घरी जाण्याचा विचार होता, पण त्या जागेपासून निघावेसेच वाटत नव्हते.

मी बुकस्टोरच्या बाहेर बराच वेळ उभा राहून रस्त्यावरची ट्रॅफिक न्याहाळत होतो. समोर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य आणि प्रेरणादायी पुतळा दिसत होता. तो बघून मन भारावून गेले. संध्याकाळच्या गारव्यात पावसाचे बारिक तुषार हवेत विरघळत होते. दिवसभराच्या संततधार पावसाने रस्ते, झाडे, वाहने सगळेच ओलेचिंब झालेले. हातात छत्री होती, पण ती उघडावीशी वाटलीच नाही. वातावरणात एक वेगळीच जादू होती!

ओलाने मी पाऊण तासात घरी पोहोचू शकलो असतो, पण त्या सुंदर संध्याकाळची अनुभूती घेत थोडं चालावं असे मला वाटले. मी चितळेंच्या समोरून, फर्ग्युसन रस्त्यावरून चालत निघालो. मला आवडणारा पुण्यातील हा सगळ्यात सुंदर रस्ता! रस्त्याच्या दुतर्फा असलेली प्रतिष्ठानं न्याहाळत, रुपाली, वैशाली समोरून, फर्ग्यूसन कॉलेजच्या बाजूने चालत, संत तुकाराम पादुका, संत ज्ञानेश्वर पादुका चौक ओलांडून पुढे चालत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाण पुलापर्यंत पोहचलो. पदपथावरून चालतांना, छत्रीला आणि स्वतःला सांभाळत, टिपता येतील तेव्हढे क्षण कॅमेऱ्यात टिपले! उड्डाण पुलाखालून काटकोनात वळून कृषी महाविद्यालयाच्या बाजूने शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला पोहोचलो. तेथून मेट्रोने भोसरी स्टेशनवर उतरलो, तेव्हा रात्रीचे ९.३० वाजले होते!

सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधे शिकत असतांना, मध्य रात्री नंतर, ग्रँट रोडवरील दिल्ली दरबारहून चालत, रात्रीची मुंबई न्याहाळत हॉस्टेलला पोहोचलो तेव्हा सूर्योदया पूर्वीच्या नारंगी आणि सोनसळी छटांनी न्हालेले आकाश कॅम्पस वर स्वागत करीत होते; त्या क्षणाची आठवण होऊन एक नवीन स्पंदन निर्माण झाले ! 

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे @ ऑगस्ट १८, २०२५

ता. क.:  ‘संध्या रात्रीचा फर्ग्युसन रोड’  हा स्वतंत्र ब्लॉग लिहणार आहे, जसा ‘लाँग मार्च’  हा रात्रीच्या मुंबईचे वर्णन करणारा ब्लॉग लिहला आहे. 


 

 

 

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...