वंदे भारत- संस्मरणीय प्रवास!
आज, नव्याने सुरू झालेल्या अजनी- पुणे ‘वंदे भारत’ ने जळगाव वरून पुण्याला आलो. ३.२८ ला प्रवास सुरू झाला. ९.५० ला रात्री पुण्याला पोहचलो.
उद्घाटनानंतर, वंदे भारतने पहिल्यांदाच प्रवास करीत असल्याने, गाडीत आसनस्थ होताच पहिल्यांदा Wikipedia वर त्या विषयीची माहिती वाचली.
शेजारी बसलेला तरुण आपल्या सॅमसंगच्या टॅब वर ‘ब्लॉकचा’ गेम खेळण्यात मग्न दिसला. एक लेव्हल पूर्ण होताच त्याने थोडा पॉझ घेतला. मी त्याच्याशी संवाद साधला. मी कशा पद्धतीने संवाद साधतो, त्यात माझे पांढरे केस कसे उपयुक्त ठरतात हे मी ‘ Grey Hair, Golden Journey! ‘ या माझ्या ब्लॉग मधे सविस्तरपणे लिहलेच आहे!
२३ वर्षाचा, नागपूरचा हा तरुण हिंजवडी, पुणे येथील फेज -३ मधील मायक्रोसॉफ्ट मधे सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत होता.
भारती विद्यापीठातून त्याने कॉम्प्युटर इंजीनियर मधे B. Tech. आणि त्या सोबत AIML (Artificial Intelligece and Machine Learning) केले होते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याने मायक्रोसॉफ्टकडे अप्लाय केले. त्यात त्याचे सिलेक्शन होऊन त्याला ८० लाखाचे पॅकेज मिळाले हे ऐकतांना त्याच्या विषयी कौतुक वाटत होते.
US ने लावलेल्या टॅरिफचा सॉफ्टवेयर कंपन्या व त्यात काम करणाऱ्या इंजीनियरवर कसा परिणाम होईल या बद्दल त्याने आपले मत मांडले. वंदे भारत व त्यात असलेल्या सुविधांबाबतही त्याने बरीच माहिती दिली.
‘Data’ बद्दल आम्ही चर्चा केली. याविषयाशी संबंधित माझा ‘Who You Are?’ हा ब्लॉग त्याने उत्सुकतेने डाऊन लोड करून घेतला.
त्याचे काम Coding करणे होते- तंत्रज्ञानाच्या सूत्रांना आकार देणे!
माझे काम Decoding करणे- अंतर्मुख होऊन अनुभवांचे अर्थ शोधणे!
त्याची सडपातळ शरीरयष्टी, बारीकशी दाढी, उजळ वर्ण, पांढऱ्या शर्टसह फॅशनेबेल जीन, आणि चेहऱ्यावरील तेज बघून मी, ‘ तू मायक्रोसॉफ्ट मधे शोभून दिसतोस’ अशी कॉम्प्लिमेंट दिल्यावर त्याच्या मित्रांनी मनमोकळं हसून दाद दिली!
थोड्या वेळाने टिकट चेकर आले. त्यांचा राखाड्या रंगाचा यूनिफॉर्म बघून मी त्यांना त्याविषयी विचारले असता, ‘ Premier Train मधे हा यूनिफॉर्म असतो.’ असे त्यांनी सांगितले. त्यांची वागणूक अतिशय सौजन्याची होती.
मधून मधून भारतीय रेल्वे कडून यात्रा सुखद आणि मंगलमय व्हावी याकरिता शुभेच्छा दिल्या जात होत्या!
समोरच्या डिस्प्ले वर गाडीचा वेग व पुढील स्थानकाची माहिती माहिती दिसत होती. जळगांव स्थानकावर गाडीला ७/८ मिनिटांचा झालेला उशीर झाला होता. जळगांव मनमाड दरम्यान १२९ किमीचा वेग गाठून होता गाडीने वेळ भरून काढला. थोड्या वेळाने कॉफी आली. कॉफ़ी छान होती आणि अटेंडेंट स्मार्ट, इंग्रजी बोलणारे!
पुढच्या सीट वर बसलेले पती-पत्नी यांनी आपले सीट रोटेट करून, विंडोला समांतर करण्याचे ठरविले. ते करण्याकरिता मी त्यांना थोडी मदत केली. Executive Chair Car (ECC) मधील सीट ३६० डिग्री मधे फिरवण्याची सुविधा आहे. सीट आडवे झाल्याने मलाही वाइड विंडो व्ह्यू मिळाला. बाहेर पाऊस पडत असल्याने नयनमनोहर दृश दिसत होते!
पती-पत्नी आपल्या जागेवर स्थिरावल्यानंतर, मी त्यांना ‘मिर्झा एक्सप्रेस’ मधील, रिव्हॉल्विंग चेअर संबंधातील विनोद, माझ्या पद्धतीने सांगितला. ‘DHMS असलेल्या डॉक्टर मिर्झांनी आपल्या गावी दवाखाना सुरू केला. मोठ्या उमेदीने त्यांनी रिव्हॉल्विंग चेअर घेतली. पण दवाखाना चालत नव्हता. शेजारचे लोक आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे घेवून यायचे व खुर्चीत बसवून गोल फिरवायचे. यावरून डॉ. मिर्झांना एक कल्पना सुचली. प्रत्येकी आठ आणे घेवून लहान मुलांना रिव्हॉल्विंग चेअरवर बसवून गोल गोल फिरवायला त्यांनी सुरू केले.’ हे दाम्पत्य नागपूरचे असल्याने त्यांना हा विनोद परिचित होता. वातावरण थोडे हलके फुलके झाल्यावर त्यांच्याशी छान गप्पा गोष्टी झाल्या.
प्रवास फक्त साडे सहा तासांचा असल्याने वेळ कमी पडला!
पुणे स्टेशन आले.
गाडी प्लेटफॉर्म नंबर ५ वर थांबली.
मी पिंपळे सौदागरला राहत असल्याने स्टेशनच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो.
स्टेशन समोरील, ट्रेन बोगी प्रमाणे सजवलेल्या, ‘हल्दीराम’ मधे जेवण घेवून, Ola मधून रात्री ११ वाजता घरी पोहचलो.
वंदे भारत मधील प्रवास केवळ आरामदायक नव्हता, तर तो संवाद आणि अनुभवांचा उत्सव होता!
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे @ ऑगस्ट १५, २०२५
No comments:
Post a Comment