Sunday, November 16, 2025

कृतज्ञतेचे रंगीत मुखपृष्ठ

एक दिवस फोन आला. आवाज ओळखीचा आणि आदरयुक्त  होता—

सर,  मी हेमंत नाईक. १९८९ चा विद्यार्थी. तुमचं पुस्तक मिळेल का? मी त्याची झेरॉक्स काढून तुम्हाला परत देईन.

मी थोडा थांबलो. विचारलं, “असं का?”

सर, फोटो कॉपीअर माझ्या ओळखीचा आहे. तो ९० रुपयात झेरॉक्स काढून देणार आहे. ते मला स्वस्तात पडेल.

मी हसलो.

हे झेरॉक्स तुम्हाला स्वस्तात पडणार नाही,” मी म्हणालो. कारण त्यात, मी Copilot च्या सहाय्याने डिझाईन केलेले रंगीत मुखपृष्ठ  नसेल. त्याचे मूल्य हे पुस्तकाच्या किमतीपेक्षा कीती तरी अधिक आहे. ते केवळ कागदाच्या स्वरूपात नाही तर ते भावना, प्रेरणा आणि सन्मानाचं प्रतीक आहे. तुम्ही पुस्तक घेण्याची इच्छा दाखवलीत, हेच माझ्यासाठी मौल्यवान आहे. तुम्ही मला भेटा. मी तुम्हाला हे पुस्तक भेट देईन. झेरॉक्सची आवश्यकता नाही.

दोन दिवसांनी हेमंत भेटले. हातात पुस्तक होतं. ते त्यांनी Amazon वरून मागवलेलं होतं.

ते माझी स्वाक्षरी घेण्यासाठी आले होते. मी लिहिलं—

प्रिय हेमंत नाईक यांना सस्नेह…

त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथील काही आठवणी सांगितल्या. ‘तुम्ही हसत खेळत शिकवायचे, स्नेहसंमेलन, खेळ व इतर कार्यक्रमांमध्ये आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. खो खो टीम सोबत तुम्ही सांगली आणि कोल्हापूरला आमच्या सोबत आलात आणि आमचा उत्साह वाढविला. स्पर्धा जिंकल्यानंतर प्रत्येकाला वैयक्तिक बक्षीस दिले. या सगळ्या गोष्टींची, आम्ही भेटतो तेव्हा चर्चा करतो’, असे त्यांनी सांगितले.

पुस्तकावर स्वाक्षरी घेतल्यानंतर त्यांनी एक आठवण सांगितली—

सर, तुमची एक स्वाक्षरी असलेलं जर्नल मी आजही जपून ठेवलं आहे.

तेव्हा ती स्वाक्षरी मिळाल्यावर मला किती आनंद झाला होता, हे शब्दांत

 सांगता येणार नाही.

हे ऐकून मी भारावून गेलो.

माझ्याप्रती कोणी कृतज्ञता व्यक्त करतो—तेव्हा माझं अंतःकरण भरून येतं.

कृतज्ञता हे  शाश्वत मूल्य आहे. माझ्या दृष्टीने त्याला अनन्य साधारण महत्व

आहे. कृतज्ञता ही केवळ भावना नसून आत्म्याला स्पर्श करून, हृदयात दिव्य

 स्पंदने निर्माण करणारी एक अनुभूती असते !

डॉ. महेंद्र इंगळे @पुणे, नोव्हेंबर १७, २०२५  

No comments:

Post a Comment

लोकशाहीचा नवा राजा: काकराज !

लोकशाहीचा नवा राजा: काकराज! एके दिवशी , घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने , घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्य...