मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि संस्थात्मक बांधिलकी
संघटनेतील व्यक्तींच्या कार्यक्षमतेचा
पाया त्यांच्या कौशल्यांमध्ये असतो, पण त्यांच्या संस्थात्मक बांधिलकी (Organisational Commitment) चा पाया त्यांच्या भावनिक अनुभवांमध्ये असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा
संघटनेत सन्मान होतो, त्या क्षणापासून तिच्या अंतर्मनात आत्मसन्मानाची भावना अंकुरते. हाच
आत्मसन्मान पुढे तिला संस्थेच्या उद्दिष्टांशी एकरूप करतो. ती व्यक्ती केवळ काम
करणारी नसते, तर ती संघटनेशी
जोडलेली, समर्पित सहकारी
बनते.
मूल्याधिष्ठित कृतींचा प्रभाव :
संस्थात्मक बांधिलकी वाढवण्यासाठी
केवळ धोरणे पुरेशी नसतात. त्यासाठी मूल्याधिष्ठित कृतींची आवश्यकता असते. त्यातील काही:
• सन्मानचिन्हांचे प्रदान, जे व्यक्ती अभिमानाने गणवेशावर लावते
• प्रेरणादायी घोषवाक्ये, जी सामूहिक चेतना जागृत करतात
• सामुदायिक प्रार्थना, जी एकसंधतेची अनुभूती देतात
• संघटनेची प्रतीके, जी व्यक्तीला एका व्यापक उद्दिष्टाशी जोडतात
प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करताना आम्ही या सर्व बाबींचा विचार करतो. कारण मूल्यांची अनुभूती ही केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त व्हावी लागते.
नेतृत्वाचे आचरण:
उद्दिष्टांच्या पूर्तिकरिता, नेतृत्वाने
केलेला त्याग, मोजलेली किंमत, आणि जपलेली मूल्ये — हे सर्व जेव्हा
सहकाऱ्यांच्या नजरेस पडते, तेव्हा त्यांच्या मनात संस्थेविषयी उच्च प्रतीची बांधिलकी
निर्माण होते. नेतृत्वाचे आचरण हेच सहकारी आणि अनुयायी यांचे करिता प्रशिक्षणाचे पाठ्यपुस्तक असते. शब्दांपेक्षा
कृती अधिक प्रभावी ठरते.
व्यक्तींच्या भावनिक गरजा :
Abraham Maslow, Frederick Herzberg आणि David McClelland यांसारख्या मानसशास्त्रज्ञांनी मानवी प्रेरणा आणि वर्तना संबंधी सिद्धांत मांडले आहेत:
• Maslow
ने गरजांची शिडी मांडली. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांनंतर सुरक्षा, प्रेम, सन्मान (Esteem) आणि शेवटी Self-Actualisation या गरजांची
पूर्ती माणसाला आवश्यक वाटते.
• Herzberg
ने Motivation आणि Hygiene Factors या बाबत स्पष्टता दिली. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण असल्यास व्यक्तीस त्याला हवा असलेला कामाचा
आनंद मिळतो आणि तो अधिक क्षमतेने काम करतो.
• MacClelland ने Need for Achievement, Affiliation आणि Power या प्रेरक शक्तींचा अभ्यास केला. या भावनिक गरजांची पूर्ति व्हावी या करिता व्यक्ती कठोर परिश्रम करतात अशी मांडणी त्याने केली.
Recognition: भावनिक गरज आणि बांधिलकीचा पाया
नेते हे कळत-नकळत या सिद्धांतांचा
उपयोग करतात. नेता जेव्हा ते सहकाऱ्यांना त्यांच्या नावाने, उपाधीने संबोधतो, त्यांच्या जीवनातील अनुभवांबद्दल,
सुख-दुःखा बद्दल, यश-अपयशाबद्दल बोलतो, आणि त्यांना भावनिक आधार देतो, तेव्हा सहकाऱ्यांच्या मनात एक भावना निर्माण होते:
• “माझं अस्तित्व महत्त्वाचं आहे.”
• “माझा सहभाग संघटनेला दिशा देतो.”
• “लोक माझ्यावर विश्वास ठेवतात.”
ही भावना म्हणजेच Maslow च्या Esteem Need ची पूर्ती — जी बांधिलकी (Commitment) चा पाया ठरते. अशा व्यक्ती संघटनेला केवळ एक संस्था म्हणून पाहत नाहीत, तर स्वतःच्या आयुष्याचा अविभाज्य भाग मानतात. संघटनेची उद्दिष्टे त्यांना स्वतःच्या आयुष्या पेक्षा अधिक मौल्यवान वाटतात आणि त्यांच्या पूर्ति करिता ते अविरत प्रयत्न करतात.
प्रशिक्षणात भावनिक स्पर्शाचा अनुभव:
बाफना ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांकरिता आयोजित
प्रशिक्षण कार्यक्रमात आम्ही या सिद्धांतांचा उपयोग केला. सहभागी कर्मचाऱ्यांना:
• त्यांच्या प्रथम नावाने संबोधले
• त्यांच्या आनंददायक आणि दुःखद क्षणांबद्दल संवाद साधला
• त्यांना स्वतःच्या संकल्प बोलून दाखवण्यास प्रोत्साहित केले
या संवादातून जेव्हा व्यक्ती
अंतःकरणपूर्वक बोलते, तेव्हा ती स्वतःशी बांधिलकी निर्माण करते. आणि ही बांधिलकी म्हणजे बदलाची
खरी सुरुवात.
प्रशिक्षक मार्गदर्शन करू शकतात, पण बदल फक्त व्यक्तीच्या स्वतःच्या
निश्चयातूनच घडतो.
आम्ही अनेक Behaviour Modification कार्यक्रम याच
पद्धतीने राबवले — जिथे संवाद हा परिवर्तनाचा झरा ठरतो.
मूल्य ही भावनेशी जुळलेली एक काल्पनिक, पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
लहानपणीचे संस्कार, शिक्षण, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील आचरण, तसेच वाचन, मनन आणि चिंतन यांमधून मूल्यांची
वृद्धी होत असते. ही प्रक्रिया व्यक्तीच्या अंतर्मनाला आकार देते आणि तिच्या
जीवनाला दिशा प्रदान करते.
परंतु, जर एखादी व्यक्ती या अनुभवांपासून
वंचित राहिली, किंवा तिला अशा
संधींची उपलब्धता झाली नाही, तरीही प्रशिक्षणाच्या माध्यमातून मूल्ये रुजविता येतात. योग्य पद्धतीने
आखलेले प्रशिक्षण कार्यक्रम व्यक्तीच्या अंतर्मनात मूल्यांची बीजे रोवतात आणि
त्यातून तिच्या वर्तनात सकारात्मक बदल घडतो.
नैतिक मूल्यांवर आधारित नेतृत्व
विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्थांपैकी, पंचगणी येथील Moral Re-Armament (MRA) Centre हे एक
महत्त्वाचे उदाहरण आहे. या केंद्रात अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले
जातात, जे व्यक्तींना
आत्मपरीक्षण, संवाद आणि
कृतीच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित नेतृत्वाची अनुभूती देतात.
नेतृत्व म्हणजे अंतःकरणाशी जोडणी:
नेतृत्व हे केवळ धोरणात्मक नसते, ते भावनिक आणि तात्त्विक असते. जेव्हा
नेते सखोल वाचन करतात, त्यावर
मनन-चिंतन करतात, त्याला आपल्या
अनुभवाशी जोडतात आणि त्यानुसार कार्यशैलीत बदल करतात, तेव्हा ते केवळ मार्गदर्शक राहत नाहीत, तर सहकाऱ्यांच्या जीवनात प्रेरणेचे स्रोत बनतात.
संस्था व्यवसायिक असो, सामाजिक असो, किंवा राजकीय — नेतृत्वाची खरी उंची
ही माणसांच्या मनाशी जोडण्यातून निर्माण होते. आणि ही जोडणी मूल्याधिष्ठित
कृतींमधूनच शक्य होते.
डॉ.महेंद्र इंगळे @पुणे, नोव्हेंबर २०,२०२५
No comments:
Post a Comment