Friday, February 27, 2026

मराठी भाषा गौरव दिन

 मराठी भाषा गौरव दिन

अमृततेही पैजा जिंके अशी माझी माय मराठी! आमचे पहिले बोबडे बोल उमटले ते या माय मराठीचे. ये रे ये रे पावसा म्हणत भिजत खेळलो, श्रवणमासी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे म्हणत नाचलो, या बाळांनो या रे या म्हटल्यावर खेळ सोडून धावलो. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा असे विचारत बालपणातून तरुणपणात प्रवेश केला.

शांताबाई, विंदा यांनी प्रेमाचा अर्थ उलगडून सांगितला. पाडगावकरांनी या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करताना, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती.. अनंत मरणे झेलून घेईन इथल्या जगण्यासाठी.. हे सांगत मातृभूमीच्या ऋणाची आठवण करून दिली. तात्यासाहेबांचे गणपतराव बेलवलकर, कानेटकरांचे लाल्या वेड लावणारे ठरले. भाऊसाहेबांच्या ययाती ने मानवी मनाच्या अमर्याद इच्छांची ओळख करून दिली. नेमाडेंच्या पांडुरंगाने ग्रामीण जीवनाचा संघर्ष दाखवला. व पू नी मानवी मनाचा ठाव घेत जीवनाचा अर्थ उलगडवला तर मिरासदार आणि शंकर पाटील यांनी पोट धरून हसवले.

पू. लं. चे चितळे मास्तर, हरी तात्या, राव साहेब, अंतु बरवा, नारायण  ही घरातील माणसेच वाटली. जी एं चा सुवर्ण मृग आजही गूढ प्रदेशात घेऊन जातो. वाळिंब्यांचा चार्ली चॅपलिन डोळे पाणावतो. इनामदारांचे त्रिंबकजी डेंगळे आणि यशवंतराव होळकर  रक्ताचा प्रवाह वेगवान करून अंगावर शहारे आणतात. अण्णाभाऊ साठे यांचा फकीरा आणि नारायण सुर्वे यांचे माझे विद्यापीठ जीवन शिक्षण देतात.

साने गुरुजींच्या शामच्या आई  वर आचार्य अत्रेंनी चित्रपट काढून तिला सर्वांचीच आई बनवली. रणजित देसाईंचे श्रीमान योगी  हातात घेतल्यावर महाराजांचे अस्तित्व जाणवते. शिवाजी सावंतांच्या छावा ने शंभू राजांच्या बलिदानातून जगायचे ते कशासाठी आणि मरायचे ते कशासाठी याचे  भान दिले. ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून  जो जे वांछिल तो ते लाहो अशी विश्वात्मक प्रार्थना उमटली. तुकोबांनी जे का रंजले गांजले , त्यासी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा म्हणत ईश्वरभक्तीचा सुगम मार्ग दाखविला.

या सर्व थोर विभूतींनी माय मराठीची सेवा करून तिला समृद्ध केले. त्यांच्याप्रती आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो. अभियांत्रिकी स्पंदनांच्या निर्मितीतून माय मराठीची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे परम भाग्य आहे.

आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. महेंद्र इंगळे, पुणे, फेब्रुवारी २७, २०२६

 

 

No comments:

Post a Comment

Realised Dreams, Rising Power

  Realised Dreams, Rising Power A river begins as a trickle in the mountains. At first, it flows quietly, nourishing the soil and quenchin...