Sunday, March 8, 2026

जागतिक महिला दिना निमित्ताने ...



आज जागतिक महिला दिन!
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त सर्वांना शुभेच्छा! 

काही वर्षांपूर्वी महिला ही अबला समजली जायची. आज ती सबला बनत आहे. विविध क्षेत्रात समर्थ नेतृत्व करीत आहे. दहावी आणि बारावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत मुलींचे प्रमाण अधिक असते. आयटी कंपन्यांमध्ये अनेक मुलींचे पॅकेज मुलांपेक्षा अधिक आहे. जेंडर बायस नसावे अशी अनेक कंपन्यांची पॉलिसी असते. महिलांच्या सोई-सुविधांकडे विशेष लक्ष दिले जाते. महाराष्ट्र शासनाने महिलांकरिता लाडकी बहीण व इतर योजनांबरोबरच बाल संगोपन रजेची सुविधा दिलेली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात सेल्स पर्सन म्हणून काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे. न्यूज चॅनल्समध्ये अँकर म्हणून आव्हानात्मक काम करणाऱ्या, प्रत्यक्ष फील्डवर जाऊन वार्तांकन करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. महिला पेट्रोल पंपांवर दिसतात. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात, महिला प्रगती पथावर वाटचाल करीत आहे.

तरीही अनेकदा महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडताना समजते. याबाबत अधिक कठोर कायदे व त्याची अमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजाने सुद्धा पुढे येवून जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. प्रत्येक कुटुंबात, मुले लहान असताना त्यांना स्त्रीविषयी आदर करायला शिकविणे व तशी वर्तणूक घरात सर्वांची असणे आवश्यक आहे.

या निमित्ताने लहानपणी माझ्यावर ज्या कर्तबगार स्त्रीचा प्रभाव पडला त्यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो – माझी आजी छबाबाई. अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष करीत त्यांनी कुटुंबाला पुढे नेले. बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत असतानाही सामाजिक भान ठेवून इतरांना त्या आपल्या परीने मदत करीत राहिल्या. सल्ला देत राहिल्या. चांगदेव ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणूनही त्या कार्यरत होत्या. लहानपणीचे माझे सर्व हट्ट त्यांनी पुरविले.

बाबांचा उदार व प्रगतिशील दृष्टिकोण असल्याने, आमच्या कुटुंबात महिलांविषयी नेहमीच आदराचे स्थान राहिले आहे. आयटी इंजिनियर म्हणून पौर्णिमा अमेरिकेत जाणारी घरातील पहिली सदस्य ठरली. सौ. ज्योति शैलेन्द्र इंगळे यांनी जळगाव महानगरपालिकेत स्थायी सभापती म्हणून काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. सौ. दमयंती किरण इंगळे- मराठे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बालकांचे योग्य पोषण सुनिश्चित करण्यासाठी राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन ‘– हा यूनिसेफकडून सहाय्य मिळालेला महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्या सामाजिक बांधिलकी मानून सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. त्यांच्या कार्याचा विविध स्तरावर गौरव झालेला आहे. शासनाचे विविध प्रकल्प त्या सेवाभावी वृत्तीने व समर्पित भावनेने राबवितात.

महाराष्ट्र शासनात नगररचना अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या सौ. लता इंगळे यांनी कौटुंबिक जबाबदारीही तेवढ्याच समर्थपणे पेलली. एखाद्या घटनेकडे अत्यंत बारकाव्याने व वस्तुनिष्ठपणे  पाहण्याची, व त्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांची मला मोलाची साथ लाभली.

परवा पंचगणी येथील Moral Re-Armament Centre मध्ये श्री. राजमोहन गांधी यांच्याशी ओळख करून देताना मी म्हटले: “Lata Ingale, my wife. She served Maharashtra Government as an upright officer.” त्यावर त्यांनी मिष्किलपणे दाद देत म्हटले: “Then I must stand in upright position and salute her.” ९० व्या वर्षी त्यांच्या अंगी असलेला हजरजबाबी आणि दिलखुलासपणा सुखावून गेला.

मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे:

“Smt. Lata Ingale – who exemplified integrity and dedication in her role as an officer in the Town Planning Department, consistently upholding rules and regulations with precision and fairness. 

Her professional journey reflects an unwavering commitment to public service marked by sensitivity and responsibility. 

Incidentally, she is also my wife, and it is with profound respect that I acknowledge her contribution—not merely as a distinguished officer, but as someone who has left behind a personal and professional legacy of dignity, discipline, and service to society.”

जागतिक महिला दिना निमित्त पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा! 

Dr. Mahendra Ingale @Pune on March 8, 2026

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats

 

No comments:

Post a Comment

The Beauty of Words!

 The Beauty of Words! Reviews are coming… And each comes with tones of joy and inspiration!  The path is long and journey unfolds slowly whe...