Saturday, March 21, 2026

ठोकशाहीतून – विठोबांच्या शब्दांत

 ठोकशाहीतून – विठोबांच्या शब्दांत

विशेष प्रसंगी ठोकशाहीच्या पानांवर विठोबा अवतरतात! चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची  छाप आणि चुकीच्या वाटेवर चालणाऱ्यांना सोट्याचा इशारा हा त्यांचा खाक्या, ठोकशाहीच्या धोरणाशी सुसंगत.

Value-Based Leadership या पुस्तकाची बातमी विठोबांपर्यंत पोहोचली. त्यांना ती विशेष वाटली. एका इंग्रजी प्रकाशन संस्थेकडून पुस्तकाचे परीक्षण होत आहे हे पाहून त्यांच्या मनात आनंदाचे तरंग उमटले. त्यांनी तत्काळ त्याचे मराठी भाषांतर केले. सा. ठोकशाहीच्या पानांवर ते प्रकाशित झाले. विठोबाच्या शब्दात ते येथे देत आहे.

Value-Based Leadership (मूल्याधिष्ठित नेतृत्व) समीक्षा:

मूल्ये अजूनही नेत्यांना मार्गदर्शन करू शकतात का?

मी प्रिया श्रीवास्तव, Editor-in-Chief, Deified Publication.  पंधरा वर्षांहून अधिक काळ, मी विविध प्रकारची पुस्तके वाचत आहे. काही आठवडे मी कादंबऱ्यांमध्ये बुडून जाते, तर काही आठवडे आत्मचरित्रे किंवा व्यवस्थापनावरील पुस्तके माझ्या टेबलावर येतात. नेतृत्वा (Leadership ) वरील पुस्तके विशेषतः एक ठराविक पद्धतीची असतात—फ्रेमवर्क्स, बुलेट पॉइंट्स, आकृत्या, आणि जग कसे चालावे याबद्दल खूप काही. म्हणून जेव्हा मी प्रथम डॉ. महेंद्र इंगळे यांचे Value-Based Leadership  हे पुस्तक पाहिले, तेव्हा मी थोडे थांबले. शीर्षक चमकदार होते, किंवा त्यात मोठी आश्वासने दिसत होती म्हणून नव्हे. खरं सांगायचं तर, पुस्तकाच्या वर्णनाचा सूर, आणि मुख्य म्हणजे मुखपृष्ठाने मला थांबवले. मुखपृष्ठावर एक दिशादर्शक कंपास, आणि त्याच्या मध्यभागी एक मशाल आहे. साधे दृश्य, पण ते मनात रेंगाळले. नेतृत्व म्हणजे दिशा! नेतृत्व म्हणजे प्रकाश! कदाचित मी मुखपृष्ठात खूप अर्थ शोधत असेन. संपादकांना तसे करायची सवय असते.

पण नेतृत्वाच्या पुस्तकात कविता, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा संगम बघून माझी उत्सुकता आणखी वाढली. नेतृत्वावरील पुस्तके क्वचितच त्या वाटेने जातात. ती साधारणपणे संस्थांची धोरणे आणि उत्पादकतेच्या चौकटीतच राहतात. आणि मला सतत वाटते हाच प्रश्न आहे. आज नेतृत्व करणाऱ्यांची खरी झुंज धोरणांशी नाही, तर जीवन आणि कार्याला अर्थ देण्याशी आहे. आणि हेच या पुस्तकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकाबद्दल:

नेतृत्वाचे निर्णय  शाश्वत मूल्यांशी जोडणे हा विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. फक्त कामगिरीचे मोजमाप, साध्य केलेली उद्दिष्टे किंवा तिमाही आकडेवारी यावरून नेतृत्वाचे मूल्यमापन होऊ शकत नाही .

डॉ. इंगळे यांनी नेतृत्वाकडे चिंतनशीलता,  तत्त्वज्ञानातील अंतर्दृष्टी आणि इतिहासातून घेतलेले  धडे यांच्या मिश्रणातून पाहिले आहे. नेतृत्व मार्गदर्शना करिता हा एक अनोखा संगम आहे, आणि खरं सांगायचं तर तो नाविन्यपूर्ण आहे.

हे पुस्तक नेत्यांना अनिश्चिततेतून मार्गक्रमण करताना प्रामाणिकपणा, नम्रता आणि सेवाभावाशी जोडून ठेवण्यास मदत करते. लेखक सुचवतात की नेतृत्व म्हणजे फक्त लोकांना दिशा देणे नाही, तर त्यांना चारित्र्य संपन्न बनण्यास मदत करणे हे आहे. हो, लोकांना दिशा हवी असते, पण त्यांना अर्थही हवा असतो. या पुस्तकात चिंतानावर भर दिलेला आहे. मूल्ये केंद्रस्थानी ठेवून  निर्णय घेणे आणि नंतर त्याची अर्थपूर्णरित्या अंमलबजावणी करणे अशा स्वरूपाची मांडणी केली आहे. स्वतःच्या आचारणातून घालून दिलेल्या उदाहरणाने नेत्याचा अधिक प्रभाव पडतो हे उदाहरणे देवून स्पष्ट केले आहे.

मला जे जाणवले:

पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकाचा सूर. डॉ. महेंद्र इंगळे यांनी चार दशकांहून अधिक काळ अभियांत्रिकी शिक्षण आणि नेतृत्व विकासात काम केले असल्याने त्यांच्या लेखनात अनुभवाची खोली जाणवते.

दुसरी गोष्ट म्हणजे चिंतनावर दिलेला भर. नेतृत्वावरील पुस्तके बहुतेक वेळा कृतीच्या पायऱ्यांकडे धावतात. पण खरी वाढ चिंतनातूनच होते.

कवितेचा उल्लेखही मला आकर्षक वाटला. नेतृत्व हा शेवटी मानवी अनुभव आहे, आणि कविता त्याला अधिक खोलवर जावून  व्यक्त करू शकते.

मुखपृष्ठावरील दिशादर्शक कंपासाचे प्रतीक सूक्ष्मपणे सांगते की नेतृत्व म्हणजे दिशा दाखवणे, नियंत्रण ठेवणे नव्हे.

भावनिक केंद्रबिंदू:

नेतृत्व विषयावरील, अनेक पुस्तके सत्ता, प्रभाव, आणि अधिकार याबद्दल बोलतात. पण जी पुस्तके खरोखर लोकांच्या हृदयाचा ठाव घेतात ती जबाबदारीबद्दल बोलतात. मूल्याधिष्ठित नेतृत्व हे पुस्तक नेतृत्वाला सेवाभावाशी जोडते. अहंकाराशी नाही. त्यामुळे ते हृदयचा ठाव घेते.

आजच्या काळात, जेव्हा संस्थांच्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे  आणि भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते तेव्हा फक्त कार्यक्षमतेचाच विचार केल्यास नेते भावनिक बाजू गमाऊन बसू शकतात हा सूचक इशाराही या पुस्तकातून देण्यात आला आहे.

हे पुस्तक कोणासाठी:

जर तुम्हाला परफॉर्मेंस चार्ट्स आणि प्रॉडक्टिविटी  हॅक्स असलेले कॉर्पोरेट प्लेबुक हवे असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्हाला अर्थपूर्ण जीवन जगण्याकरिता शाश्वत मूल्ये, तत्त्वज्ञान, गोष्टी व रुपके  आणि वैयक्तिक चिंतन महत्वाचे वाटत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

अंतिम विचार:

नेतृत्व विषयावरील बहुतेक पुस्तके नेत्यांनी वेगाने पुढे कसे जायचे हे सांगणारी आहेत. पण मूल्याधिष्ठित नेतृत्व हे पुस्तक नेतृत्वाकडे अधिक चिंतनशील आणि मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करते. ही पद्धत थोडी संथ वाटू शकते, पण कदाचित नेत्यांना ह्याच गोष्टीची गरज आहे—थोडं थांबून विचार करण्याची.

आजच्या परिस्थितीत, २०२६ मधे, प्रेम, कृतज्ञता, सहनशीलता, नम्रता, सहृदयता, धैर्य या शाश्वत मूल्यांची नेत्यांना आठवण करून देवून त्यानुसार मार्ग क्रमण करण्यास प्रोत्साहित करतील अशी पुस्तके हवीत. डॉ. महेंद्र इंगळे यांचे Value-Based Leadership हे त्यापैकी एक आहे.

विठोबांनी परिश्रमपूर्वक इंग्रजीतून मराठीत भाषांतर केले. चार कौतुकाचे शब्द लिहिले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत!

विठोबा म्हणजे मधुकर तर नव्हे? नावातच मधू आहे—मध म्हणजे गोडवा, आनंद. कर म्हणजे निर्माता. मध गोळा करून किंवा निर्माण करून लोकांमध्ये वाटणारा, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा—तोच मधुकर….

Dr. Mahendra Ingale @ Pune on March 21, 2026

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats

 

No comments:

Post a Comment

Democracy: Erosion from Above and Below

Democracy: Erosion from Above and Below Democracy is like a glass — transparent and beautiful, but vulnerable to cracks.  Democracy is also ...