Friday, June 19, 2026

काकराज : लोकशाहीचा नवा राजा !

 काकराज : लोकशाहीचा नवा राजा !

एके दिवशी, घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने, घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्याची चर्चा ऐकली. त्यातून प्रेरणा घेऊन त्याने आपल्या मुलाला, काकराजला परदेशात शिकायला पाठवायचे ठरविले. 

काकराज अतिशय हुशार आणि कल्पक होता. मटक्यातील पाणी पिण्यासाठी, पाण्याची खाली गेलेली पातळी वर आणण्याकरिता त्यात दगड गोटे टाकण्याऐवजी स्ट्रॉ वापरून ते कसे प्यायचे हे त्याने प्रात्येक्षिकासह सगळ्यांना समजाऊन सांगितले होते. त्याची ही कल्पकता बघून कावळे आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे व व्यवहार चातुर्याचे कौतुक केले होते.

काकराज जागतिक दर्जाच्या विद्यापीठामधून व्यवस्थान शास्त्रात उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर त्याचा मोठा सत्कार झाला. भाषणात त्याने सांगितले:

"आपण आता लहानसहान गोष्टींमध्ये अडकून राहायचे नाही. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती साकारण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा उपयोग करायचा. हे संपूर्ण जंगलच आपल्या मालकीचे झाले पाहिजे. चिमणीचे घरटे मिळविण्यासाठी व्यर्थ वेळ घालवायचा नाही. उलटपक्षी चिमण्या आणि जंगलातील इतर पशुपक्षी, प्राणी यांना आपल्या सोबत घ्यायचे. त्यांना आपले विचार पटवून द्यायचे. जग झपाट्याने बदलत आहे, आपणही बदलले पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती केली पाहिजे."

त्याचे हे विचार अनेकांकरीता नवीन होते. काही जेष्ठ कावळ्यांनी नाराजीही व्यक्त केली. कारण यापूर्वी कावळ्यांनी कधी इतर पशू पक्ष्यांशी संवाद साधला नव्हता आणि अशा पद्धतीचा विचार केला नव्हता. पण लोकशाहीत सार्वमत बनविण्याची ही पद्धत आहे हे काकराजने त्यांना पटवून दिले.

हळूहळू कबुतरे, पोपट, घुबड, मोर, लांडोर यांसारखे पक्षी त्याच्या विचारांशी सहमत झाले. प्रत्येकासाठी नव्या व्यवस्थेत आकर्षक योजना होती. यानंतर काकराजने  वाघ आणि सिंह वगळता सर्व पशू, पक्षी आणि प्राण्यांची बैठक बोलावली. काही वाघ हे सिंहाविषयी पूर्वीपासूनच नाराज होते. त्यांनी बैठकीस गुप्त पाठिंबा दिला. या बैठकीत काकराजची राजा म्हणून निवड झाली. गरुडाने विरोध केला: "सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो सामर्थ्यशाली आहे, आपण त्याच्या बरोबरीचे नाही." पण गरुडांची संख्या कमी असल्याने त्याचे मत दुर्लक्षित झाले.

निवडीचा ठराव सिंहापर्यंत पोहोचविण्यात आला. सिंह संतापला: "मी हे स्वीकारणार नाही." त्याने वाघ, बिबटे, कोल्हे, अस्वले यांची मदत मागितली, पण कुणी त्याच्या मदतीस आले नाहीत.

काकराजने सिंहाच्या गुहेबाहेर सभा घेतली:

"मी लोकशाही मानतो. ती जगातील सर्वात चांगली राज्य पद्धती आहे. येथे प्रत्येकाच्या कल्पकतेला आणि कर्तृत्वाला वाव आहे. येथे सर्वांना राजा बनण्याची संधी आहे. उद्या तुमच्यापैकी कोणीही राजा होऊ शकतो. परदेशात असताना मी लोकशाही राज्य व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आहे आणि हे सर्व जवळून अनुभवले आहे. 

आपण सर्व सभ्य आहोत. सभ्य संस्कृतीत हिंसाचाराला स्थान नाही. माझ्याकडे संपूर्ण जंगलाचा नाश करू शकतील अशी घातक शस्त्रे आहेत पण मी ती वापरणार नाही कारण हिंसाचारात माझा विश्वास नाही. सहमतीकरिता शांततेचा मार्ग मला अधिक चांगला वाटतो.”

त्याचे हे अभ्यासपूर्ण पण तेव्हढेच आवेशपूर्ण भाषण ऐकून उपस्थितांच्या अंगात उत्साह संचारला. ते काकराजचा जयजयकार करू लागले. जोर जोरात घोषणा देवू लागले. काहींना तर आपणच राजा झालो आहे असा भास होऊ लागला. 

उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन करून, काकराज शांततेने आणि आत्मविश्वासाने पुढे बोलू लागला:

 “जंगलाचा राजा कोण हे लोकशाही पद्धतीने ठरायला पाहिजे. ज्याला सिंह राजा वाटतो त्याने लाल फूल आणावे. ज्याला काकराज राजा वाटतो त्याने हिरवी पाने आणावीत." 

थोड्याच वेळात तेथे हिरव्या पानांचा ढीग जमा झाला.

काकराज लोकशाही मार्गाने जंगलाचा राजा झाला. नद्या-सरोवरे हंस आणि बगळ्यांच्या मालकीची झाली. वृक्ष वेली चिमण्या, कबुतरे आणि पोपट यांच्या ताब्यात आले. भूप्रदेश माकड आणि गोरीलांना मिळाला. 

सिंह आपल्या गुहेतच राहतो. अधूनमधून तो गर्जना करतो, पण ती फक्त गर्जनाच असते. 

Dr. Mahendra Ingale @ Pune, April 19, 2026

Author of Value‑Based Leadership

#EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats

 

 

No comments:

Post a Comment

काकराज : लोकशाहीचा नवा राजा !

  काकराज : लोकशाहीचा नवा राजा ! एके दिवशी , घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने, घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठ...