Tuesday, June 23, 2026

शांततेतील संवाद !

शांततेतील संवाद !

पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारव्याची हलकी झुळूक पसरली आहे. मध्यरात्र उलटून गेली आहे. बरीचशी शांतता आहे.

थोडी रपेट मारावी म्हणून काव्यरत्नावली चौकापासून चालायला सुरुवात केली. हा चौक नेहमीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो—महत्वाच्या दिनविशेषांचे फलक येथे लावले जातात. आज महेश नवमीच्या शुभेच्छा देणारे झगमगते फलक नजरेस पडले.

कॉनक्रीटच्या प्रशस्त रस्त्यावरून पुढे जाताना दिवसभराच्या गजबजाटात दुर्लक्षित राहणाऱ्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आल्या. त्या जणू संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होत्या. अधिकाऱ्यांचे प्रशस्त बंगले, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यासमोरील  बांधकाम भवन,  स्वातंत्र्य चौक व तेथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, बस स्थानक, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल, जी. एस. ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा, सिविल कोर्ट,  पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आणि तेथून दिसणारे जळगाव रेल्वे स्टेशन. साधारण दोन अडीच किलोमीटरचे हे अंतर.

परतांना, नेहरूंच्या पुतळ्याजवळ थोडा थबकलो. १९६५ मध्ये जळगाव नगरपालिकेने हा सुंदर संगमरवरी पुतळा उभारला—जळगावच्या वैभवात भर घालणारा!

परवा विवेक सावंतांचे नेहरूंवरील भाषण ऐकले होते. MKCL चे कार्यकारी अधिकारी राहिलेले सावंत यांचे अभ्यासपूर्ण पण सहज संवाद वाटावा असे ते भाषण. त्याची आठवण तिथे उभी राहिली.

आणि मग आठवणींची साखळी सुरू झाली—जळगाव पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना, हॉस्टेलच्या मित्रांसोबत परीक्षा काळात मध्यरात्रीनंतर सायकलवरून रेल्वे स्टेशनजवळील ‘ब्रिजविलास’ रेस्टॉरंट मध्ये चहासाठी जाण्याची. तसेच मुंबईत ग्रँट रोडवरील ‘दिल्ली दरबार’ हॉटेलपासून अंधेरीतील SPCE हॉस्टेलपर्यंतच्या मध्यरात्रीनंतर सुरू केलेल्या ‘लाँग वॉक’ ची!

त्या आठवणींनी रात्रीच्या शांततेत आणखीनच गारवा निर्माण केला!

Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on June 24, 2026
Author of 
Value‑Based Leadership

 #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

No comments:

Post a Comment

शांततेतील संवाद !

शांततेतील संवाद ! पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारव्याची हलकी झुळूक पसरली आहे. मध्यरात्र उलटून गेली आहे. बरीचशी शांतता आहे. थोडी रपेट ...