रस्त्यांचा सांस्कृतिक प्रवाह!
वेगाने धावणारे रस्ते—
पाऊलवाट, पायवाट, गाडरस्ता, कच्ची सडक, पक्की सडक—
ही जुनी रूपे टाकून ते आता डांबरी रस्ते,
काँक्रीट रोड, व्हाईट टॉपिंग आणि रबर आच्छादित झाले आहेत.
त्यातील काही महामार्ग तर काही एक्सप्रेस वे झाले आहेत,
उड्डाण पुलांवरून,
सी -लिंक आणि कनेक्टिंग लिंक मधून धावत आहेत,
दऱ्या-डोंगर कपारींना जोडत आहेत,
समुद्राला कवेत घेत तो लीलया पार करत आहेत.
चमकदार ढाबे, रेस्टॉरंट्स आणि फूड मॉल्स
त्यांच्या स्वागतासाठी सज्ज उभे आहेत.
टोल तलवार घेऊन उभा ठाकतो तेव्हा,
फास्ट टॅगची ढाल सहजतेने घाव झेलून,
रस्त्याला सुखरूप पुढे नेत आहे.
शहरातून, शहराबाहेरून आणि जंगलातून,
दिवसा आणि रात्रीही धावणारे हे रस्ते,
अभियंत्यांना समृद्ध,
कंत्राटदारांना वजनदार,
अधिकाऱ्यांना चमकदार,
पदाधिकाऱ्यांना धनाढ्य,
काहींना बलाढ्य बनवित आहेत.
रस्ते आता फक्त दळणवळणाचे साधन राहीले नाहीत.
ते सामान्यांसाठी दळण,
आणि सत्तेसाठी वळण बनले आहेत,
आधुनिक जीवनशैलीतील
सांस्कृतिक प्रवाह झाले आहेत.
Dr. Mahendra Ingale @ Pune on Sept 9, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #EveryDreamComesTrue #ValueBasedADRAndCounsellingServices #HorizonBeyondCertainty
No comments:
Post a Comment