सहकारी, मी आणि प्रशासनाचा आरसा !
काल श्री सुरेश गोस्वामींशी बोललो. ते माझे लेखन आवर्जून वाचतात. शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे ते प्रबंधक म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या ४० वर्षाच्या सेवेत, त्यांना तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकुण १६ प्राचार्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यातील काहींची गुण वैशिष्ट्ये त्यांनी मला सांगितली. गुणग्राहकतेचा त्यांचा हा पैलू मला नव्याने समजला!
इक्विपमेंट मशीनरी पुरविणारे, सिक्युरिटी सर्विसेस व सफाई कामगार पुरविणारे कंत्राटदार, बांधकाम कंत्राटदार, विविध सेवा पुरविणारे पुरवठादार, ‘ग्रांट आली का, बिले कधी निघणार’ याची चौकशी करायला संस्थेत यायचे. यासंबंधातील सर्व माहीती, पत्रव्यवहार संबंधितांना दाखवून ग्रांट उपलब्ध झाल्यावर त्वरित बिले काढण्यात येतील असे सांगुन त्यांना आश्वस्त करण्याची जबाबदारी मी श्री गोस्वामी यांच्याकडे सोपविली होती. ते, ती उत्तमरित्या पार पाडत असत म्हणुन माझ्या पर्यंत कोणी लोक येत नसत. ते या लोकांशी अतिशय सौजन्याने वागायचे आणि त्यांना चहा पाजायचे. कंत्राटदारांना चहा पाजणारे अधिकारी म्हणून मी त्यांचा अनेकदा उल्लेख करायचो. अभ्यागतांच्या चहापाना वरील खर्च म्हणुन, त्यांना हा कार्यालयीन खर्च म्हणून दाखविता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही.
शासकीय तंत्रनिकेतन जळगाव ही मोठी संस्था. येथे सहा अभियांत्रिकी शाखा आणि फार्मसी शाखा आहे. शासकीय तंत्रनिकेतन, मुक्ताईनगर या संस्थेच्या प्राचार्य पदाचाही कार्यभार माझ्याकडे होता. कामात सुलभता यावी म्हणून प्रा पी पी गडे यांचेकडे, मुक्ताईनगर तंत्रनिकेतना संबंधातील कामकाजा करिता समन्वयकाची जबाबदारी सोपविली होती. ते, ती इतक्या उत्तमरित्या पार पाडत होते की मंत्रालयातील अल्प संख्यांक विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी परस्पर संपर्क करून माहिती घ्यायचे आणि काही निर्देश द्यायचे. त्यानुसार त्वरित अंमल बजावणी केली जायची. बांधकाम प्रगती अहवाल (Progress Report) तयार करताना स्थापत्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागा सोबत समन्वय करणे, ग्रँटची मागणी करताना, मागील निधी पूर्णपणे खर्च झाला आहे, त्यासंबंधीचे विवरण असलेले प्रमाणपत्र -Utilisation Certificate (UC) तयार करण्याकरिता लेखा विभागा बरोबर समन्वय करणे या जबाबदाऱ्या ते व्यवस्थित पार पाडायचे.
मुक्ताई नगर तंत्रनिकेतन संस्थेच्या बांधकाम शीर्षा (Head) खाली ४ कोटी रुपये प्राचार्यांच्या खात्यात जमा होताच मी लेखा विभागाला त्वरीत चेक लिहायला सांगितले. स्वाक्षरी करून, प्रा गडे यांचे हस्ते पुढील प्रक्रिये करिता तो ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला. कंत्राटदारांना हे माहीत झाल्यावर ते संस्थेत आले. आभार व्यक्त करायचे म्हणून भेटी करिता चिठ्ठी पाठविली. ‘तुमचे आभार पोहचले. भेटीची आवश्यकता नाही. ते शासकिय काम होते आणि माझे कर्तव्य होते’, असे मी त्यांना कळविले. त्यावेळेस, गेल्या अनेक वर्षांपासून, १५ सप्टेंबर रोजी, मी ज्यांच्या चरित्राविषयी बोलत आलो आहे आणि ज्यांच्या कर्तव्यनिष्ठे संबंधातील ‘दोन मेणबत्त्यांची गोष्ट’ मी सांगत आलो आहे ते महान अभियंता भारतरत्न विश्वेश्वरय्या माझ्या समोर उभे आहेत असे मला वाटले!