महानगरपालिका निवडणुका: लोकशाहीचा महोत्सव !
भारतीय लोकशाही व्यवस्थेत पंचायत राज्य व्यवस्थेला
अनन्य साधारण महत्व आहे. ७५व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना
नवे बळ दिले.
अनेक वर्षानी महाराष्ट्रात स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.
त्याकरिता सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन!
महाराष्ट्र शासनाचेही अभिनंदन !!
या निवडणुकात,
अनेकजण दांडगा जनसंपर्क, अफाट लोकप्रियता,
तन मन आणि धन अर्पून केलेले कार्य आणि पक्षाची उमेदवारी या बळावर निवडून येतात.
ज्यांना पक्षाचे
बळ लाभत नाही त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. तशा
ही परिस्थितीत ते जिंकले, आणि जनतेला दिलेल्या
आश्वासहनांची पूर्तता करण्याचा कसोशीने केला तर त्यांचे नेतृत्व उजळून निघते.
पण काहीना मात्र
निवडणूक जिंकण्या करिता अनेक प्रकारच्या क्लूपृत्या वापराव्या
लागतात. त्यातील काही पारंपारिक तर काही नावीन्यपूर्ण असतात. तो ही लोकशाही
प्रक्रियेचाच भाग मानायला हवा.
ए बी फॉर्मची खेळी:
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया
सुरू झाली आहे. ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी
पक्षांच्या कार्यालयांत, नेत्यांच्या बांगलयांवर, फार्म हाऊसवर आणि निवडणूक विभागात प्रचंड हालचाल होती.
सत्ताधारी पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड होती. ए बी फॉर्म देण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत रोखून ठेवण्यात आली. हा रणनीतीचा भाग असू शकतो. दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक उमेदवारांना ए बी फॉर्म मिळाला आहे की नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळ, तर काही ठिकाणी असंतोष प्रगट झाल्याचे सोशल मिडियावर बघायला मिळाले. पण हा गोंधळच पक्षांतर्गत लोकशाही अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण मानावे लागेल!
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची
प्रक्रिया :
वेळ कमी असल्याने, तसेच निवडणुकी संदर्भात
वेळोवेळी प्रसिद्ध झालेले शासन निर्णय, परिपत्रके या संबंधात पुरेशी माहिती
नसल्याने अनेकांनी आपले अर्ज वकिलांकडून भरून घेतले.
त्यामुळे वकिलांच्या कार्यालयात गर्दी मावत नव्हती.
छाननी झाली.
काहींचे अर्ज बाद झाले. काही बिनविरोध झाले.
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली.
काहींच्या अर्जाबाबत आक्षेप घेण्यात आले. या बाबत उच्च न्यायालयात जाण्याचीही
तयारी ही अनेकांनी करून ठेवली आहे.
उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली.
प्रसिद्ध झालेल्या यादीतील चार प्रकारचे उमेदवार:
1. प्रमुख पक्षाचे अधिकृत उमेदवार – ज्यांना पक्षाने ए बी फॉर्म दिला
आहे.
2. पक्षाची उमेदवारी न मिळालेले उमेदवार – पूर्वी यांना
"बंडखोर" म्हणायचे. पूर्वी बंड या शब्दाबद्दल लोकांमध्ये आकर्षण होते. मत
देणार नसले तरी, अनेक बंडखोर उमेदवारांकडे, लोक आदराने बघायचे. पण आता बंडखोरीसाठी लागणारे धैर्य दुर्मिळ झाले
आहे. तरीही, लोकशाही जिवंत ठेवण्यात
त्यांचा सिंहाचा नाही, पण खरीच वाटा निश्चित आहे!
3. लहान पक्षांचे आणि आघाड्यांचे उमेदवार – जे मोठ्या पक्षांच्या सावलीत
स्वतःचा आवाज उठवतात.
4. स्वतंत्र उमेदवार – ज्यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळणार
नाही हे आधीच ठाऊक असते, पण लोकाग्रहस्तव किंवा
स्वतःच्या प्रेरणेने नशीब ते आजमावतात.
यानंतर सुरू होतो उमेदवारी माघारीचा रंगमंच.
• तथाकथित बंडखोरांना पक्षाचे नेते विविध प्रलोभने दाखवून उमेदवारी
मागे घ्यायला सांगतात. काही मान्य करतात, काही हट्ट धरतात.
• तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारच्या उमेदवारांवर ताकदवान उमेदवार
"साम-दंड-भेद" नीतीचा अवलंब करतात.
• काही उमेदवार आधीच व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून उमेदवारी दाखल करतात.
त्यांचे हितचिंतक तडजोड घडवून आणतात आणि शेवटी उमेदवारी मागे घेतली जाते.
प्रचाराचा पुढचा टप्पा:
माघारीनंतर चित्र अधिक स्पष्ट होते आणि पुढचा
टप्पा सुरू होतो—प्रचाराचा.
प्रत्यक्ष प्रचार:
भेटीगाठी, प्रचार पत्रके वाटणे, नेत्यांच्या सभा व भाषणे, रॅली—या सगळ्यातून उमेदवार एकमेकांना आणि मतदार
उमेदवारांना जोखतात.
अप्रत्यक्ष प्रचार:
हा प्रकार मात्र रात्री सुरू असतो.
• मतदार संघातील प्रमुख
व्यक्तीं सोबत बैठक.
• उत्साही कार्यकर्ते ढाबा, फार्म हाऊस, रिसॉर्ट, स्टार हॉटेल वर जमून रणनीती आखणे.
• खर्चिक असले तरी या बैठकात ‘मोठे निर्णय’ घेतले जातात. कॉन्फरेन कॉल किंवा स्पीकर फ़ोन लाऊन संभाषण केले जाते. दुसऱ्या दिवशी त्यानुसार अंमलबजावणी केली जाते.
आचारसंहिते नंतरचा ४८ तास आधी प्रत्यक्ष प्रचार थांबतो. त्यानंतर पक्षाचे महत्वाचे नेते
पुढे येतात.
• समाजातील नेते, मंडळांचे अध्यक्ष, सेवाभावी संस्थांचे प्रमुख, शासकीय कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधला जातो.
• विविध प्रलोभने, आदेशवजा सूचना दिल्या
जातात.
• या काळात अफवा तंत्राचा खुबीने उपयोग केला जातो.
• WhatsApp ग्रुप्स महत्वाची भूमिका बजावतात. Admin ना सगळ्यात जास्त महत्व
प्राप्त होते ते याच काळात! या निमित्ताने एका इंग्रजी
कवितेची आठवण होत
आहे.
"I have a dream!
I have a dream that one day, I will become a WhatsApp Admin!"
कदाचित कवीने ही कविता निवडणूक प्रचाराच्या
पार्श्वभूमीवरच लिहिली असावी!
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:
अलीकडे या टप्प्यात AI तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. खरी आणि खोटी माहिती डिजिटल
प्लॅटफॉर्म वर प्रभावीपणे पसरविण्यात येते. माहिती खरी कोणती आणि खोटी कोणती हे Fact Check सारख्या तंत्रज्ञानातून तपासता येते, पण सर्वसाधारण माणसाकडे ती सुविधा आणि त्यासाठी लागणारा
वेळ नसतो.
‘लक्ष्मी दर्शन’ काळ :
या काळात ‘लक्ष्मी दर्शन’ ही होते. अनेकजण
या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहतात. हा अर्थपूर्ण जागरणाचा काळ असतो. काही जण ‘मतदार राजा जागा राहा. रात्र वैऱ्याची आहे’ असे आवाहनही करतात. त्यामुळेही मतदार जागत असतात.
आणि नवखे उमेदवार मात्र या टप्प्यात गाफील राहतात
किंवा फसतात...
मतदार राजा:
लोकशाहीच्या या रंगमंचावरील सर्वात महत्वाचा कलाकार
म्हणजे मतदार!
पूर्वी त्याला "मतदार राजा" म्हणायचे.
आजही म्हणतात.
त्या दिवसा पुरता तो खरोखरीच राजा असतो—हातात
मुकुट नसला तरी मतदानाची शाई हीच त्याची राजमुद्रा असते.
"People get the government as they deserve!" असे म्हणतात.
आपल्याला हवे तसे लोकप्रतिनिधी आपणच निवडतो.
त्यांच्या गुण-दोषांसकट. कारण ते काही प्रमाणात
आपल्यातील अनेकांत प्रतिबिंबित होतात. हाच तर "प्रतिनिधी"
या शब्दाचा खरा अर्थ आहे.
लोकशाहीचे अनेक फायदे आहेत, काही तोटेही आहेत. पण सर्वात मोठा फायदा हा आहे की
बहुसंख्य लोक मिळून आपले प्रतिनिधी ठरवतात. म्हणजेच, हा एक सामूहिक निर्णय असतो.
प्रत्येक मतदार आपला एक सूर लावतो,
आणि त्या असंख्य सुरांच्या संगमातून,
लोकशाहीचे सुमधुर संगीत निर्माण होते.
मीही सध्या मतदार राजा च्या भूमिकेत आहे.
४० वर्षांपेक्षा अधिक काळ मी प्रभाग क्रमांक १२ मध्ये राहत आहे. बराच काळ पुण्यात राहत असलो तरी, माझे नाव या प्रभागाच्या मतदार यादीत आहे. येत्या १५ जानेवारीला मी माझा मतदानाचा पवित्र अधिकार बजावणार आहे. मत कोणालाही दिले तरी निवडून आलेले व्यक्ति माझे प्रतिनिधी असतात याची मी कायम जाणीव ठेवतो. शासकीय अधिकारी असतांना मी लोकप्रतिनिधींचा नेहमीच मनःपूर्वक आदर केला. आजही करतो.
या प्रभागातून सौ. उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध
निवडून आल्या आहेत. अजून तीन उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य माझ्याकडे आहे.
भ्रमनिरास आणि नाराजी:
वर्षानुवर्षे पक्षात राहूनही, पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना, पक्ष कसा चालतो किंवा चालवला जातो हे न समजल्याने, त्यांचा या
प्रक्रियेत भ्रमनिरास होतो.
• काहींचे क्षमता असूनही तिकीट कापले जाते. ते नाराज होतात.
• काहींची क्षमता नसल्याने तिकीट नाकारले जाते. तेही नाराज होतात.
• पोकळी निर्माण होते तेव्हा इतरांना उमेदवारी करिता तयार केले जाते परंतु योग्य पर्याय मिळाल्याने त्यांना उमेदवारी दिली जात नाही. तेही नाराज होतात.
• काहींच्या स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पना असतात, ते ही उमेदवारी न मिळाल्याने नाराज होतात.
पक्षाला उमेदवारांची उपयुक्तता, उपद्रव मूल्य, निवडून येण्याची क्षमता, आर्थिक स्थिती, जातिनिहाय मतदार वर्गातील
स्थान, नेटवर्किंग कौशल्ये आणि त्यांची कर्तबगारी याची
अधिक माहिती असते. अलीकडच्या काळात ती सर्वाधिक असते. या सर्व माहितीचा उपयोग करून
‘जिंकून येण्याची क्षमता’ या निकषावर पक्ष उमेदवारी देतो. त्याकरिता राजकीय
पक्षांकडून सर्वे ही केले जातात. अलीकडे काही उमेदवारही असे सर्वे करून घेतात. या प्रक्रियेतून सर्वे करणाऱ्या एजन्सीजना कोट्यावधी रुपये मिळतात. काही उमेदवारांना मात्र याची
पूर्ण कल्पना नसते. त्यामुळे तिकीट न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास होतो. संवेदनशील
व्यक्तींच्या भावनांचा उद्रेक होतो. गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून
वेळीच त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.
या निवडणूक रंगमंचावर,
बिनविरोध झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन !
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना,
आणि त्यांना मत देऊ ईच्छिणाऱ्या मतदारांना
मनःपूर्वक शुभेच्छ्या !
महेंद्र इंगळे @ जळगाव, जानेवारी १, २०२६
#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats