सत्य पराभूत होऊ शकते का?
कम्प्युटर इंजिनिअर
म्हणून सुरेशला अमेरिकेत येऊन वीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. सध्या तो एका
सॉफ्टवेअर कंपनीत AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर
उभारणीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
कॅलिफोर्नियातील
पिनॅकल्स नॅशनल पार्कमध्ये सुटीच्या दिवशी फिरत असताना त्याच्या मनात सहज विचार
आला..... तो मुंबईत महाविद्यालयात शिकत असताना एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या भावभावना जाणून घेणे आणि त्यानुसार भविष्यातील
अभ्यासक्रम ठरविणे हा होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचा विषय निवडून त्यावर अर्ध्या तासात निबंध लिहायचा होता.
सुरेशने उत्स्फूर्तपणे यात भाग घेतला होता. त्याने निवडलेला विषय होता—
“सत्य पराभूत होऊ शकते का?”
सत्याचा शोध
प्रामुख्याने तत्त्वचिंतक आणि अध्यात्माच्या वाटेवर चालणारे संत-महात्मे घेत
असतात. त्यांना जे आकलन होते ते समाजापुढे आणि अनुयायांसमोर मांडतात. परंतु ते
अनेकदा सत्याचे कवडसेच असतात. पूर्ण सत्य नव्हे. हे कवडसेही उपयुक्त ठरतात.
सत्य हे शब्दातीत
आहे; ते केवळ अनुभवाद्वारेच जाणता येते.
ज्यांना पूर्ण सत्य
गवसते ते बोलत नाहीत. ते मौनात जातात. हे मौन दोन प्रकारचे असू शकते.
आध्यात्मिक मौन : जे
सत्य अनुभवतात, त्यांना जाणवते की सत्य हे शब्दातीत आहे; ते अनुभवानेच जाणता येते. ते व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत; त्यामुळे ते मौनात
जातात.
राजकीय मौन : सत्ता
आणि व्यवस्था यांची ताकद समजल्यावर काहींच्या
मनात भीती निर्माण होते. सत्याचा प्रखर आणि भेदक प्रकाश त्यांच्या
डोळ्यांसमोर अंधार निर्माण करतो. सत्ता हेच सत्य असा त्यांचा भ्रम होतो. अधिक भीती
आणि भ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्याविषयी बोलण्या ऐवजी ते मौन स्वीकारतात.
अनेकजण स्वतःहून सत्याचा शोध वगैरे घेण्याच्या फंदात पडत नाहीत. दैनंदिन व्यापात तेव्हढा वेळ त्यांच्या कडे नसतो. पण अनेकदा विवस्त्र स्वरूपात सत्य त्यांच्या समोर उभे ठाकते. आणि त्यांना त्यास सामोरे गेल्या शिवाय गत्यंतर राहत नाही.
सत्य परभूत होऊ शकते, कारण स्वतःचे आणि अनुयायांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य
त्याच्याकडे नसते.
सत्याचा जय किंवा
पराजय हा त्याच्या अनुयांच्या क्षमतेवर अवलंबून असतो.
सत्याचे आचरण
केल्यास आत्मबल निर्माण होते, आणि तेच सत्याला
विजय मिळवून देण्यास उपयुक्त ठरते.
व्यक्तिमत्त्वाला
अंतर्बाह्य झळाळी प्राप्त व्हावी असे ज्यांना वाटते त्यांनी सत्याचे आचरण करण्यास हरकत नाही.
सत्याचा शोध घेण्याचे
अनेक मार्ग आहेत, त्यापैकी तपश्चर्या हा एक महत्त्वाचा मार्ग
आहे. तपश्चर्या वनात जाऊनच नाही तर घराच्या चार भिंतीत किंवा कार्यालयाच्या दालनात ही करता येवू शकते.
काहीसे असे विचार त्याने आपल्या निबंधातून मांडले होते.
निबंध स्पर्धेचा निकाल
राखून ठेवण्यात आला होता. सुरेश महाविद्यालयात असे पर्यंत तो लागला नव्हता.
पार्कमधून बाहेर
पडून, आपल्या मोटारीत बसतांना सुरेशच्या मनात पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला—
“सत्य पराभूत होऊ शकते का ?”
त्याच बरोबर आणखी एक विचार त्याच्या मनात आला -
“सत्य शोधण्यात AI चा कसा उपयोग करता येईल ?”
हा विचार मनात घेऊन तो आपल्या बंगल्याच्या दिशेने
निघाला.
Dr. Mahendra
Ingale @ Jalgaon on June 18, 2026
Author of
“Value-Based Leadership” mvingale2405@gmail.com
#EngineeringHeartBeats
#ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls