Monday, June 30, 2025

पुस्तक प्रकाशित झाले !

पुस्तक प्रकाशित झाले ! 

परवा पांडुरंगाच्या दर्शन घडले. 

दर्शन घेवून मंदिराबाहेर आलो आणि पुन्हा एकदा कळसा कडे बघून हात जोडले गेले. 

तर्जनीने 'पब्लिश' टॅब ला स्पर्श केला आणि 'अभियांत्रिकी स्पंदने' प्रकाशित झाले.

या स्पंदनांचे आता सार्वत्रिक लयीत रुपांतर झाले असून जगातील काना कोपऱ्यात ती पोहचते आहे . 

 मूठभर बिया हातात याव्यात आणि निळ्याशार हिरव्या डोंगरावर उभे राहून, आषाढातील भरलेल्या आभाळाकडे हात जोडत पाहून, त्या आसमंतात उधळून द्याव्यात. परमेश्वराची कृपा झाल्यावर, बियांमधील चैतन्याचे वटवृक्षात रुपांतर होते. हा विचार पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माझ्या मनात आला. शब्दांच्याही पलीकडे, लिहणाऱ्यालाही अभिप्रेत नसतील अशा अनेक गोष्टी वाचक अनुभवू शकतात असा ही विचार, माझ्या मनात या प्रसंगी येत आहे. 

तापी-पूर्णा सांगमावरील चांगदेव मंदिरापासून निघालेली ही दिंडी, प्रिय स्नेहीजनहो, तुमच्या सहवासात इथपर्यंत पोहचली. या प्रवासात पुन्हा एकदा तुमच्या सोबत चालत आलो, तुमच्या प्रेमळ साथीत हे आनंददायी क्षण पुन्हा अनुभवले. तुमच्या सहकार्याने हा प्रवास अधिक समृद्ध झाला. तुमचे मनःपूर्वक आभार! 

तुम्ही आठवणी जागवल्या, संवेदनांना स्पर्श करून स्पंदने निर्माण केली, प्रिय विद्यार्थी मित्रहो, तुमच्या जिज्ञासेने आणि प्रतिसादाने मला नवी ऊर्जा मिळाली; तुमचे मनःपूर्वक आभार ! 

वेळोवेळी दिलेल्या अमूल्य सूचना, प्रेम आणि आपुलकीने दिलेला प्रतिसाद, कौतुकाचे शब्द आणि प्रोत्साहानाने वाढवलेला उत्साह या मुळे माझा प्रवास आनंददायी झाला म्हणून प्रिय मित्रहो तुमचे मनःपूर्वक आभार ! 

हे विश्व निर्मात्या परमेश्वरा, तू जग सुंदर बनविले आहेसच, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी दिलीस, अंतःकरणात नव नवीन संकल्पना उमटविल्या, विचारांना दिशा दिलीस. तुझे मनःपूर्वक आभार !

Sunday, June 29, 2025

मनःपूर्वक…

मनःपूर्वक…

प्रिय स्नेहीजनहो,

तापी-पूर्णा संगमावरील चांगदेव मंदिरापासून निघलेली ही दिंडी तुमच्या सहवासात इथपर्यंत पोहचली. या प्रवासात पुन्हा एकदा तुमच्या सोबत चालत आलो, तुमच्या प्रेमळ साथीत हे क्षण अनुभवले. तुमच्या सहकार्याने हा प्रवास अधिक समृद्ध झाला.

तुमचे मनःपूर्वक आभार!

प्रिय विद्यार्थी मित्रहो, 

तुम्ही आठवणी जागवल्या, संवेदनांना स्पर्श करून स्पंदने निर्माण केली. तुमच्या जिज्ञासाने आणि प्रतिसादाने मला नवी ऊर्जा मिळाली. 

तुमचे मनःपूर्वक आभार!

प्रिय मित्रहो,

वेळोवेळी दिलेल्या अमूल्य सूचना, प्रेम आणि आपुलकीने दिलेला प्रतिसाद, कौतुकाचे शब्द आणि प्रोत्साहानाने वाढवलेला उत्साह यामुळे माझा प्रवास आनंददायी झाला. 

तुमचे मनःपूर्वक आभार!

हे विश्वनिर्मात्या परमेश्वरा, 

तू जग सुंदर बनविले आहेसच, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी दिलीस. अंतःकरणात नवनवीन संकल्पना उमटविल्या, विचारांना दिशा दिलीस. तुझे मनःपूर्वक आभार!

रामकृष्ण हरी!

 रामकृष्ण हरी!

काल लोणंद ते तरडगाव दरम्यान माऊलीच्या पालखी मागे दिंडीत चालण्याचा आनंद मिळाला….

सायंकाळी दिंड्या तरडगावला विसावल्या…

रात्री पांडुरंगाचे दर्शन झाले…

सकाळी विष्णुपाद मंदीरातून चंद्रभागेचे मनमोहक दर्शन घडले…

गोपाळ पुऱ्यातील गोपाळ कृष्ण मंदिरासमोरील प्रांगणात फुगड्या खेळून झाल्यावर, पदस्पर्श करून नमस्कार करणे बघून मनात अनेक भाव जागृत होऊन ओसांडू लागले!

६ जुलैच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या स्वागताकरिता पंढरपूर व प्रशासन सज्ज झाले आहे. जागोजागी स्टील प्लेट्स व नट बोल्ट असलेले बॅरिकेड लावले जात आहेत. मंदीरापासून गोपाळ पुरा पुलाच्याही पलीकडे, भाविकांची आठ किलोमीटरची एकेरी रांग लागावी याकरिता बॅरिकेड लावले जात आहेत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रांगेतील भाविकांकरिता सर्व सुविधा देता याव्यात या करिता व्यवस्था करण्यात येत आहे.

भक्तांच्या भेटीची पांडुरंगालाही ओढ लागली आहे!

भेटी लागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी!

Friday, June 13, 2025

सदिच्छा संवाद!

 सदिच्छा संवाद!

सकाळी फिरत असतांना, ज्यांचे विषयी माझ्या मनात विचार येतो त्यांना मी फ़ोन करतो. नेहमी ज्यांच्याशी बोलतो त्या व्यतिरिक्त हे माझे स्नेही, मित्र, सहकारी असतात, ज्यांच्याशी माझे कित्येक वर्षात प्रत्यक्ष बोलणे नसते. याला मी ‘सदिच्छा संवाद’ (Courtesy Call) म्हणतो. सेवेत असतांना शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मी असे करायचो. आता केंव्हाही करतो. असे केल्याने मला अनेक गोष्टींची माहिती मिळते, नव नविन कल्पना सुचतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऊर्जा प्राप्त होते. ‘हा कर्टसी कॉल आहे’ हे माझे पहिलेच वाक्य उच्चारतो तेव्हा ते आश्चर्यासह आनंदित होतात. 

संवाद किंवा सुसंवाद (Communication Skill), परस्पर संवाद (Interpersonal Skills) करण्याची ही माझी शैली आहे.  बोलण्यातील मोकळेपणा आणि पारदर्शीपणा (Openess and Transperancy) हा अशा संवादांचा पाया असतो तेव्हा त्यातून अनेक संकल्पना जन्मास येतात. त्यातील काही मूर्त स्वरूपात येतात.

आज सकाळी, प्राचार्य मधुकर सलगरे यांच्याशी बोललो. १५ वर्षांच्या कालावधीनंतर प्रत्यक्ष बोललो. कुठेही दुरावा जाणवला नाही. आम्ही नियमितपणे भेटत आणि बोलत असावेत असे वाटावे असा संवाद झाला.

शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी, विविध ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर १३ पुस्तके लिहली. वाचन मनन, चिंतन आणि संशोधन करून लिहिली. अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहाली. त्यातील काहींना पुरस्कार मिळाले. ‘हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर’ व ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि मराठेशाही’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाल्यावर, एक इतिहासकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

जायकवाडी प्रकल्पावरील स्थापत्य अभियंता म्हणून असलेली नोकरी सोडून ते शासकीय तंत्रनिकेतनात अधिव्याखाता म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांकरिता समर्पित भावनेने त्यांनी काम केले. अत्यंत स्पष्ट वक्ते असल्याने त्यांना अनेकप्रसंगी संघर्ष करावा लागला. 

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दांभिक आणि चुकीच्या गोष्टींवर ते सडेतोडपणे लिहितात. दर शनिवारी निघणाऱ्या ‘ठोकशाही’ या साप्ताहिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत. लेखनात व्यस्त असतांनाही ते भरभरून बोलले. त्यांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्पांविषयी माहिती दिली. 

प्रथितयश ना स इनामदार यांच्यापासून त्यांनी लिखाणाची प्रेरणा घेतली हे सांगितल्यावर त्यासंबंधीची माझी एक आठवण जागृत झाली. ना स इनामदार हे माझे आवडते लेखक होते. त्यांची झुंज, झेप, मंत्रा वेगळा, शहेनशाह, राऊ, ही शाळेच्या लायब्ररीत असलेली पुस्तके,  मी ९ वीत असतांना मी वाचली होती.

प्राचार्य सलगरे यांच्याशी बोलत असतांना अनेक संकल्पना जन्मास आल्या!

Thursday, June 12, 2025

स्वाक्षरी!

 स्वाक्षरी!

परवा, माझ्या एका विद्यार्थ्याने, माझे स्वाक्षरी केलेले, पुस्तक पाठविण्याची विनंती केली. नवल नगर इंजीनियरिंग कॉलेजचा, १९८८ चा उत्तर प्रदेशचा, गोरखपूर जवळच्या शहरातील हा विद्यार्थी!  नेपाळ येथून एक दुर्मिळ रुद्राक्ष आणून त्याने मला भेट दिला होता. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून तो दिल्ली मेट्रो मधे अभियंता म्हणुन रुजू झाला होता. 

त्यानंतर २० वर्षांनी, कामनिमित्त एका इंडस्ट्रीला भेट द्यायला तो जळगावला आला तेव्हा तेथील कागदपत्रे पाहत असताना ‘टेस्टिंग रिपोर्टवर’ त्याने माझी स्वाक्षरी बघितली. तो मला भेटायला आला. त्यानें सांगितले, ‘सर, मी तुमच्या सह्या असलेले जर्नल्स बरीच वर्षे सांभाळून ठेवले होते, परंतु घराचे रिनोव्हेशन करतांना ते मिसप्लेस झालेत.’ (पत्नीच्या अग्रहामुळे, त्याने ते रद्दीत दिले असावेत!) पण तो भेटायला आला याचा आनंद झाला. त्याने माझ्या स्वाक्षरीची वैशिष्ट्ये सांगितली. ती मला माहीत होती. माझ्या ग्राफालॉजिस्ट मित्राने, बऱ्याच वर्षापूर्वी, ती  सांगितली होती.

आता मला स्वाक्षरीबद्दल चिंतन करून त्याबद्दल लिहणे भाग आहे!

प्रत्येकाला आपली स्वाक्षरी प्रिय असते तशी ती मलाही प्रिय आहे. स्वाक्षरी हा अपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असते. त्याबद्दल माझ्या ग्राफलॉजिस्ट मित्राने सांगितले त्यापूर्वीही आणि त्यानंतरही मी माझ्या पद्धतीने ती करित आलो आहे. ‘And I do it with Grace!’

२०१५ मधे, न्यायालयाच्या आदेशाने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या पदांवर, शासकीय तंत्रनिकेतनात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिव्याख्यात्यांना नियमित करण्याचा  निर्णय झाला. महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण विभागातीलच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय होता.

हा निर्णय येताच शासकिय तंत्रनिकेतन जळगांव येथे कार्यरत असलेल्या अधिव्याखात्यांची प्रकरणे मी मागवून घेतली व वेतन निश्चतीची प्रक्रिया सुरू केली. लेखा विभागात कार्यरत असलेले, नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे व आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून उत्साहाने काम करणारे श्री संजय उपासनी यांचेशी चर्चा केली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवरुन वेतन निश्चीती केली. वेतन  निश्चतीच्या आदेशांवर मी स्वाक्षरी केली. प्रत्येक स्वक्षरी कराताना मी उत्साहित झालो. प्रत्येक स्वाक्षरी करताना मला ऊर्जा मिळाली.

माझ्या सारखेच अनेक किंबहुना माझ्या पेक्षाही अधिक लायक व्यक्ती असतांना मला विशिष्ट पदांवर काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता भाव राहिला आहे. कल्याणकारी कार्य करण्याची संधी मिळणे या सारखा दुसरा भाग्याचा क्षण नाही असे मी मानत आलो आहे म्हणुन स्वाक्षरी केली.

मी कर्तव्य भावनेने स्वाक्षरी केली. स्वतः करिता केली.  स्वप्रतिमा उंचावत नेण्याकरिता  केली. ‘व्यक्तीमत्व विकासाच्या’ कार्यक्रमात आणि ‘कार्य संस्कृती विकास’ या प्रशिक्षण कार्यक्रमात मला माझ्या विद्यार्थ्यांशी आणि सहकाऱ्यांशी ‘स्वप्रतिमा’ (Self Image) या विषयावर बोलायचे होते. फक्त बोलून भागणार नव्हते. त्यांना ते तसे दिसले पाहिजे, त्यांनी ते अनुभवले असले पाहिजे तर प्रशिक्षण परिणामकारक ठरेल याची जाणीव होती म्हणून स्वाक्षरी केली!

लोकशाही राज्य पद्धतीत, कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्या करिता काही पदे निर्माण केली जातात. त्या पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या असतात. ती पार पडण्या करिता अधिकार प्रदान करण्यात येतात. म्हणून त्या पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना अधिकारी म्हणतात. आपल्या अधिकारांचा उपयोग अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच्या माध्यमातून करायचा असतो हे माहित असल्याने स्वाक्षरी केली!

२००५ मधे, न्यूझीलँड हॉस्टेल, गोरेगाव, मुंबई येथे राजपत्रित महासंघाच्या अधिवेशनात उपस्थित असताना, ‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा !’ हे पुस्तक लिहण्याचा संकल्प केला आहे. तो सिद्धीस जावा म्हणून स्वाक्षरी केली !

यशस्वी व्यक्ती, स्वाक्षरी करताना, उत्साहित आणि आनंदित असतात किंबहुना त्यामुळेच ते यशस्वी होतात अशी माझी धारणा असल्याने स्वाक्षरी केली!

अशीच स्वाक्षरी आणखी येकदा केली होती…

२८ एप्रिलला मुलीचे लग्न होते. पुण्याला. मी रजेवर होतो. पण आहरण व संवितरण अधिकारी(Drawing and Disbursing Officer) असल्याने पगार पत्रकांवर माझ्या स्वाक्षरीची आवश्यकता होती. कर्मचारी व अधिकारी यांचे पगार वेळेत व्हावेत या करिता पगार पत्रके जळगाव वरून मागवून घेतली. विवाह सोहळा सुरू असताना, रात्री ११ वाजता मंचावरून खाली उतरुन स्वाक्षरी केली. १ मे हा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन आनंदात साजरा करता यावा म्हणून स्वाक्षरी केली!

Sunday, June 8, 2025

मित्र आणि स्नेहीजनहो,

 मित्र आणि स्नेहीजनहो, 

तर्जनीने ‘पब्लिश’ या टॅबला स्पर्श करताच ‘हे’ पुस्तक प्रकाशित होणार आहे, कोणत्याही क्षणी!

…आणि त्याच क्षणाला, जिंतूरचे रामा भराडी आणि NITTTR चे माजी विद्यार्थी व सोमालीयाचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेतील हर्षवर्धन आणि रशियातील निकिता, मुंबईचे पंकज शाह आणि दिल्लीचे सतीश सुर्यन, पुण्याचे सतीश केरकळ आणि जळगांवचे कैलास वानखेडे हे पुस्तक वाचू शकतील!

चांगदेव मधील माझे स्नेही, शाळा कॉलेजातील माझे मित्र, माझे सहकारी, माझे विद्यार्थी हे पुस्तक आप आपल्या सवडीने घरी बसून वाचू शकतील.

प्रकाशनानंतर, या पुस्तकाच्या जाहिरात आणि वितरणाची जबाबदारी एका आंतर राष्ट्रीय संस्थेकडे दिलेली आहे. यात बऱ्याचशा संकल्पना माझ्या आहेत, विशेषतः जाहिरातीतील मजकुराबाबत.

आवश्यक ते बदल करून, या पुस्तकाचे इंग्रजीतील, केलेले रूपांतर (भाषांतर नाही!)‘Engineering Heart Beats’ हे बेस्ट सेलर होऊ शकते अशी शक्यता या क्षेत्रातील काही व्यक्तींनी वर्तविली आहे. विविध विषय, नाविन्यपूर्ण पद्धतीने त्यांची केलेली मांडणी, अनुभवांशी निगडित करून, त्यावर प्रभावी शब्दात केलेले भाष्य, विचारातील स्पष्टता व सलगता, सकारात्मकता, हृदय स्पर्शी शब्दांनी साधलेला संवाद, आणि सगळ्यात महत्त्वाचे, व्यक्ती, स्थळ, काळ आणि घटना यांचा उल्लेख असल्याने, निर्माण झालेली Authenticity, जिचे जागतिक पटलावर फार महत्व आहे …अशी काही महत्वाची कारणे त्यांनी मला सांगितली. असे होऊ शकते याची मला जाणिव आहे. तो एक मोठा प्रकल्प असेल व मला त्यात आपले सहकार्याची आवश्यकता भासेल.

आणखी असे की, पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमात मी आपल्याला सहभागी करून घेवून, आनंद देवू इच्छितो…

हे पुस्तक वेग वेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या व्यक्तींच्या हस्ते, वेग वेगळ्या वेळी प्रकाशित होणार आहे. 

आपणही, आपल्या घरून, कार्यालयातून, आपल्या कुटुंबियांच्या व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत,  ते आपल्या हस्ते प्रकाशित करू शकाल. त्याची पूर्व सूचना दिल्यास त्यासंबंधीची व्यवस्था करता येईल.

आपला स्नेहांकित, 

महेन्द्र इंगळे

Thursday, June 5, 2025

३६. प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

३६. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 

माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 

आज निरोपाचा दिवस. तीन वर्षापूर्वी तुम्ही या संस्थेत आला होतात. तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी या संस्थेत प्रवेश केला तेव्हा गेटवरील सिक्युरिटी, साठ एकरांचा वनराईने नटलेला संस्थेचा विस्तीर्ण परिसर, संस्थेची मुख्य दगडी इमारत, विविध विभागांच्या इमारती, मुलांची आणि मुलींची वसतीगृहे, कॅन्टीन, वर्कशॉप, तुमच्यासारख्याच प्रवेशा करिता आलेल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची झालेली गर्दी बघून तुम्ही कावरे बावरे झाल होतात. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर, तुम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये आलात तेव्हा तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रवेश समितीचे प्रमुख प्रा. के. पी. वानखेडे, प्रा. गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन करून याच ड्रॉइंग हॉलमध्ये तुमची बसण्याची व्यवस्था केली, त्यावेळेस तुम्ही थोडे निश्चिंत झालात. ज्या शिस्तबद्ध रीतीने प्रवेश प्रक्रिया पार पडत होती, ते बघून, तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित झालात. या वेळी मी माझ्या केबिनमध्ये असलो तरीसुद्धा पूर्वानुभवाने मी या सर्व गोष्टी कल्पनेने अनुभवत होतो. 

प्रवेश प्रक्रिया संपली. तुम्हाला या संस्थेत प्रवेश मिळाला. कॉलेज सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हा सर्वांचे, आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विभाग प्रमुखांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत. ती तुम्ही मनापासून ऐकलीत. पुढील काळात त्याचे अनुपालनही केले. या तीन वर्षाच्या कालावधीत, तुम्ही भरपूर अभ्यास केला, विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला, त्यांच्या आयोजनात हिरीरीने सहभाग घेतला. तुमच्यापैकी काहींना Dipex या राज्यस्तरीय Project Competition मधे, काहींना राज्यस्तरीय Paper Presentation, Technical Quiz Competition मधे प्रथम पारितोषिक मिळाले. तुमचा गुणगौरव झाला. तुमच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता विद्यार्थी सभा व पालक मेळाव्यात तुम्ही उत्साहाने सहभाग घेतला, सूचना केल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीत मदतही! विशेषतः हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुला मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांची सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची असते. विभाग प्रमुख व रेक्टर असलेले डॉ. राजेश पाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सहकार्य केले. कधीही कुठला अनुचित प्रकार घडला नाही ही खरोखरच सर्वांकरिता कौतुकास्पद बाब आहे.

तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे हे आपणा सर्वांना माहित आहेच. या संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचारी हे एका कुटुंब प्रमाणे आहेत याचा आपण अनुभव घेतला आहे. आता आपण येथून बाहेर पडून एका नवीन जगात प्रवेश करणार आहात. त्यात तुम्हास कदाचित एवढी सुरक्षितता लाभणार नाही, परंतु येथे मिळालेल्या बाळकडूच्या आधारावर तेथेही यशस्वी होऊन नावलौकिक मिळविणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. कारण यापूर्वी तुमच्या सारखेच अनेक विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी देशात व परदेशात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. तुमच्या पैकी काही जणांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी, येथील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली ही खरोखरच समाधानाची बाब आहे.

तुम्ही या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर  एक यशस्वी अभियंता म्हणून बाहेर पडणार आहातच पण एक चारित्र्यसंपन्न माणूस व्हावा याकरिता यापुढेही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहा. यशस्वी अभियंता बनणे सोपे आहे. चारित्र्यसंपन्न माणूस बनणे कठीण आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे. ती एक तपश्चर्या आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, कृतज्ञता यासारख्या शाश्वत मूल्यांचा विसर पडू देऊ नका. आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगा. गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगली, आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगली ते सर्वजण मोठी माणसे झालीत.

तुम्ही ऐश्वर्या संपन्न व्हा. पद, पैसा आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहेच. कदाचित त्याला थोडा वेळ लागू शकतो. पण केवळ ते मिळवण्यासाठी मूल्यांचा बळी देऊन, स्वप्रतिमा मलिन होईल अशा तडजोडी करू नका. मूल्याधिष्ठित जीवन जगा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ समाधान मिळू शकते. सत्तास्थानी असतांना, आयुष्यात अनेक मोहाचे क्षण येतील तेव्हा विवेक बुद्धीचा उपयोग करून त्यांना झिडकारा. नियमितपणे प्रार्थना करा. त्यामुळे अंतर्मनाच्या कौलानुसार  निर्भयपणे तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकाल.

नाविन्याचा हव्यास धरा. प्रत्येक गोष्ट करतांना, ती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करा. त्याचे एक वेगळे समाधान तुम्हाला मिळेल. संधी मिळेल तेव्हा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाविषयी नम्रपणे इतरांना सांगा. कदाचित काहीजण त्यामुळे प्रोत्साहित होऊ शकतील. चांगुलपणा प्रसारित करा. चांगले मित्र जोडा. मैत्री जपा. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांत त्यांची साथ तुम्हाला मोलाची ठरेल.

संधी मिळेल तेव्हा, यशस्वी माणसांना भेटण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणसांना, दुसऱ्यांना मदत करतांना आनंद मिळतो. त्यामुळे आत्मविश्वासपूर्वक त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा व त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणसांबद्दल अनेकांनी लिहले आहे,  त्यांची व्याख्या केली आहे. पण मी सांगतो ते ही लक्षात ठेवा. ‘A person who is in a position to help others should be called a Succesful Person.’ 

या निमित्ताने एका प्रसंगा विषयी आपणास सांगतो आणि थांबतो. हा प्रसंग ‘Father of Modern Management’  म्हणून जे ओळखले जातात, त्या पीटर ड्रकर यांच्या विषयीचा आहे. त्यांनी तो सांगितला आहे. अनेकदा सांगितला आहे. गोष्टी स्वरूपात मी तुम्हाला सांगतो. प्रसंग असा आहे : 

शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचाराला, ‘What do you want to be remembered for?’ विद्यार्थ्यांनी आप आपल्या समजुती नुसार उत्तरे दिली. शिक्षकांनी ती शांतपणे ऐकली. नंतर ते म्हटले, “विद्यार्थी मित्रहो, या प्रश्नाचे उत्तर तुमच्या कडून अपेक्षित नाही. त्याकरिता तुम्ही फार लहान आहात, पण मोठे होण्या आधी या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधावे अशी माझी अपेक्षा आहे.”  चाळीस वर्षानंतर, शाळेच्या गेट टुगेदर कार्यक्रमात माजी विद्यार्थी भेटले, तेंव्हा ‘हा’ प्रश्न तुम्हाला आठवतो का असे त्यांनी एकमेकांना विचारले. सर्वांचे उत्तर ‘हो’ होते. या कार्यक्रमात पीटर ड्रकर यांच्या सोबत अनेक जण होते. त्यापैकी काहीजण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, लेखक, बिझिनेस एंपायरचे मालक आणि राष्ट्र प्रमुख होते ! 

अशा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पण महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी सांगण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री आहे. अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेत तसेच पुढील आयुष्यात तुम्हाला भरभरून यश मिळो याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा! यशस्वी भव!!

(शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात व्यक्त केलेले मनोगत)

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...