Saturday, November 29, 2025

Learn to Learn (Marathi)

 Learn to Learn

अनोळखी नंबरवरून WhatsApp वर आलेला संदेश पाहिला. लिहिले होते—

सर, मी डॉ. राजेंद्र बोरसे. तुमचा १९८९ बॅचचा विद्यार्थी. मी तुम्हाला भेटू इच्छितो.

त्या भेटीत राजेंद्र यांनी त्यांच्या जीवनप्रवासाची कहाणी सांगितली. दैनिक सकाळ मधे छापून आलेला लेख मला दाखविला. प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक संकटांचा सामना करत त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथून सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर विविध ठिकाणी नोकरी केली. पुढे एका नामांकित आयटी कंपनीत चांगली नोकरी मिळाली. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणामुळे त्यांनी तेथे चांगले स्थान प्राप्त केले.

तरीही शिक्षणाची ओढ कायम राहिली. त्यांनी अभियंत्रिकी पदवी, एलएलबी असे शिक्षण घेतले. अनेक वर्षे प्रतिष्ठित आयटी कंपनीत काम करून अखेर VRS घेतली आणि फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायानिमित्त अमेरिका, जपान सह अनेक देशांत व्याख्याने आणि चर्चा सत्रांकरिता दौरे केले. पुढे त्यांनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ऑफ म्युच्युअल फंड्स या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.

त्यांचा प्रवास हे Learn to Learn या संकल्पनेचे जिवंत उदाहरण आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचो—

“Learn to Learn हे कौशल्य ज्याच्या जीवनाचा भाग बनते, त्याला कोणतीही अडचण कधीच अडथळा ठरत नाही.

राजेंद्र यांनी हे वाक्य जसेच्या तसे मला पुन्हा सांगितले. त्याच ध्यासाने त्यांनी शिक्षणाचा प्रवास अखेर पीएच.डी. पर्यंत नेला.


शिकत असताना, प्रा. श्रीमती सुनंदा वैद्य आणि प्रा. एस. टी. महाजन यांनी ‘विद्यार्थी मदत निधी योजना’ अंतर्गत दिलेल्या आर्थिक सहाय्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. ही बाब मला विशेष भावली.

त्यांच्या सोबतच्या संवादातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचा सतत शिकण्याचा ध्यास आणि त्यासाठी घेतलेले कष्ट अनेकांकरीता प्रेरणादायी ठरू शकतात.

राजेंद्र यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील कार्याला सुयश चिंतितो.

डॉ. महेंद्र इंगळे @ जळगाव, नोव्हेंबेर ३०, २०२५

No comments:

Post a Comment

लोकशाहीचा नवा राजा: काकराज !

लोकशाहीचा नवा राजा: काकराज! एके दिवशी , घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने , घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्य...