Monday, December 15, 2025

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

१६ डिसेंबर हा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. 

१९७१ च्या युद्धातील भारताचा विजय म्हणून हा ‘विजय दिन’ आहे. 

१६ डिसेंबर हा दिवस माझ्या करिता ही विशेष आहे.

१९८५ च्या या दिवशी, कोठारी मंगल कार्यालय, जळगाव येथे 

मी सौ. लता यांच्याशी विवाहबद्ध झालो. 

लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणारे पुरुष 

पत्नीच्या प्रेमास अधिक पात्र होतात, असे म्हणतात!  

मी तर तो दिवस आधीच लक्षात ठेवून, त्याविषयी लिहितो, प्रसारित करतो— 

म्हणून मला अधिक प्रेम मिळण्याची शक्यता नक्कीच आहे!

शक्यतेचे वास्तवात रूपांतर व्हावे म्हणून,

पूर्व संध्येला आणखी एक स्फुट लिहीत आहे! 

प्रिय लता,

छोटी मधुराही म्हणते, तुम्ही छान आहात!  

मॅडम, तुम्ही खरंच छान दिसता,

मॅडम, तुम्ही खरंच छान बोलता,

आणि मॅडम, तुम्ही खरंच छान रागावता!

मॅडम, तुम्ही हुशार आहातच,

पण अलीकडे WhatsApp च्या मदतीने,

मेसेजेस फॉरवर्ड करण्याची कला अवगत करून घेतल्याने,

तुम्ही अधिकच हुशार भासता!

उंटावरून शेळ्या हाकण्याची कला तुम्ही कुठून शिकलात?

हे मी वेळोवेळी विचारले, तरी तुम्ही ते आजवर सांगितलेले नाही.

तुमच्याकडे एखादे जादूचे भंडार आहे का, सूचनांनी भरलेले?

चाळीस वर्षांत, अगणित सूचना दिल्यानंतरही,

ते अजूनही तितकेच भरलेले वाटते!

सर्वच सूचनांचे पालन करता येत नसले,

तरी काहींचे पालन केल्याने खरंच फायदा झाला.

भेंडी कडक नसावी,

काकडी लहान असावी—

अशा सूचना सहज अंमलात आणता आल्या.

पण आंबा गोड असावा,

द्राक्षे आंबट नसावीत—

अशा सूचनांमुळे मात्र अजूनही तारांबळ उडते.

एखादी गोष्ट उत्साहाने सांगायला आलो,

तर ती तुम्हाला आधीच माहीत असतेतेव्हा थोडा हिरमोड होतो खरा,

पण तरीही, पुन्हा नवीन गोष्ट सांगण्यासाठीमी तेवढ्याच उत्साहाने पुढे येतो.

"मी तुम्हाला आधीच सांगितले होते…"

असे तुम्ही नंतर म्हणू नये म्हणून,

आधीच काय ते सांगा, असे वारंवार विनवूनही, तुम्ही ते सांगत नाही.

तरीही, तुम्ही खूप आवडता!

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, तुमचे खूप खूप अभिनंदन!

तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!!

तुमचा,

महेंद्र, डिसेंबर १५, जळगाव

No comments:

Post a Comment

शांततेतील संवाद !

शांततेतील संवाद ! पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारव्याची हलकी झुळूक पसरली आहे. मध्यरात्र उलटून गेली आहे. बरीचशी शांतता आहे. थोडी रपेट ...