Thursday, February 5, 2026

सामना : सत्ता, विकास आणि आत्म्याचा संघर्ष

सामना : सत्ता, विकास आणि आत्म्याचा संघर्ष

‘सामना’ हा माझा आवडता चित्रपट. चित्रपट गृहात तो मी अनेकदा बघितला आहे. काल रात्री अचानक तो मोबाइल वर तो Pop up झाला. मी तो पुन्हा बघितला.

सामना हा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर लिखित एक राजकीय चित्रपट आहे. पण तो केवळ एक चित्रपटच नाही, तर सत्ता, विकास आणि नैतिकतेच्या संघर्षाचा आरसा ही आहे. निळू फुले यांनी साकारलेले हिंदुराव धोंडे-पाटील आणि डॉ. श्रीराम लागू यांचा मास्तर – या दोन व्यक्तिरेखांतील जुगलबंदी हा या चित्रपटाचा आत्मा आहे.

धोंडे-पाटील नेहमीच, आपल्या मेहनतीने उभारलेल्या साम्राज्याचा अभिमानाने उल्लेख करतात – सहकारी संस्था, कारखाने, शाळा, कॉलेजेस, दवाखाने, रोजगार.

त्यांच्या संवादात एक ठाम विश्वास दिसतो. ते सांगतात,मास्तर, कुत्री आणि माणसे भांडत होती भाकरीच्या एकाच तुकड्या साठी. पिण्याकरिता पाणी नसायचे. पाच सात मैलांवरून ते आणावे लागायचे. हे चित्र आम्ही बदलले. या भागात समृद्धी आणली. या भागातील सर्व प्रगती आमच्यामुळे झाली. आमचे रक्त आटवून आणि घाम गाळून आम्ही हे सर्व केले.

हे ऐकून मास्तर म्हणतात, " तुमच्या गर्वाने आम्हाला आनंद झाला."

"हा गर्व नाही. वस्तुस्थिती सांगतो आहे", धोंडे पाटील.

"अर्थात! गर्व ही सुद्धा एक वस्तुस्थिती असू शकते. आणि वस्तुस्थिती माहीत नसेल तर कुठलाही दावा गर्व वाटू शकतो, मास्तर.

त्या दोघांमधील असे वैचारिक संवाद ऐकून आपण अंतर्मुख होतो. यातून विकास, गर्व आणि वस्तुस्थिती यातील सूक्ष्म भेद उलगडला जातो.

धोंडे-पाटील प्रचंड मेहनत घेतात. सत्ता मिळवतात. विकास करतात. आणखी सत्ता मिळवतात. पण आता त्यात सेवाभाव उरत नाही. सत्ता मिळविणे आणि ती टिकविणे हाच आता मुख्य उद्देश उरतो. सत्तेच्या आड येणाऱ्या मारोती कांबळेला ते बाजूला करतात. त्याचा खून होतो.

धोंडे-पाटलांचा परीट घडीचा पोशाख, झुपकेदार मिशा,  बोटांतील हिऱ्याच्या अंगठ्या, चांदीची मूठ असलेली छडी यातून ते सत्तेचे प्रदर्शन करीत असले तरी ते आतून पोखरले जात असतात. सत्ता त्यांचा आत्मा कुरतडू लागते. एकटे असतांना याची त्यांना जाणीव होते.

एक दिवस ते मास्तरांना संगतात, " मास्तर, आमच्या घरी आम्ही सुखी नाही. माणसात राहून आम्ही एकटे असतो. कामात मन रमवतो. पण एकटेपणा कमी होत नाही.  मास्तर, तुमची संगत आम्ही जोडली. बाकी आम्हाला कोण मित्र नाही. तुम्ही आम्हाला घाबरत नाही, म्हणून तुम्ही आमचे शत्रू तरी व्हा नाही तर मित्र तरी व्हा."

पूर्व आयुष्यात ध्येयवादी असलेले मास्तर, एक दिवस मारोती  कांबळेच्या खुनाचा तपास करण्यात यावा या करिता उपोषणास बसतात. सर्व प्रकरणांची चौकशी होते. धोंडे पाटील दोषी आढळतात. पोलिस त्यांना घेवून जातात. शेवटी त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य त्यांच्या हातून जातांना, ते हतबलतेने बघत राहतात. 

धोंडे पाटलांचा राजकीय अंत कशामुळे झाला ?

१. त्यांच्या विरोधकांमुळे ?

२. न्याय यंत्रणेमुळे ?

३. मास्तरांनी उपस्थित केलेलेल्या मारोती कांबळे विषयीच्या प्रश्नामुळे ?

४. सत्ता त्यांचा आत्मा कुरतडू लागल्याने ?

उत्तर कदाचित सर्वच घटकांत आहे. पण खरा अंत तेव्हा होतो, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करते.

डॉ. महेंद्र इंगळे, पुणे, फेब्रुवारी ५, २०२६

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats

  

No comments:

Post a Comment

२५९ वी मैफल : प्रवास अभियांत्रिकी स्पंदनांचा !

 २५९ वी मैफल : प्रवास अभियांत्रिकी स्पंदनांचा ! गेल्या अनेक दिवसांपासून ‘हॉबी डूबी डू’ या मंचावर संवाद साधण्याची इच्छा आमचे मित्र, प्रसिद्ध ...