पेंशनचा सॅल्यूट !
३५ वर्षीच्या प्रदीर्घ सेवे नंतर पाटील साहेब निवृत्त झाले. सेवपूर्तीचा
मोठा कार्यक्रम झाला. कार्यक्रम आटोपून साहेब रात्री उशिरा घरी पोहचले. दिवसभर हर
तुरे स्वीकारून, संभाषण आणि भाषण करून त्यांना थकवा आला होता.
त्यामुळे बिछ्यान्यावर पडताच, त्यांना गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि फिरायला निघाले.
कुणाल आयकॉन रोडवरून चालत शिवार चौकात पोहोचल्यावर ट्रॅफिक हवालदार त्यांच्याकडे
पाहून फक्त हसले—कडक सॅल्यूट मात्र केला नाही. पुढेही असेच अनुभव त्यांना येऊ
लागले.
“आता मला कोणीच
सॅल्यूट करणार नाही,” हा
विचार मनात येताच त्यांना दरदरून घाम आला. रात्रभर ते या कुशीवरून त्या कुशीवर होत होते.
पहाटे पहाटे डोळा लागला. ते उशिरा उठले. फिरायला गेले नाहीत. घरातच येरझाऱ्या घालत
राहिले आणि फिटबिटवर पावले मोजत राहिले.
साहेब स्वतःची समजूत घालू लागले... आपले सर्व ठीक काय... चांगलेच आहे.
मुला मुलींची लग्ने झालेली आहेत. स्थावर आणि जंगम बऱ्यापैकी आहे. गावाकडे शेती
घेतलेली आहे. पुण्यात दोन फ्लॅट्स आहेत. शेअर्स आणि म्यूचुअल फंडांमधे कोटींवधीची गुंतवणूक आहे. तेव्हाडयाच रकमांच्या बँकांमध्ये
एफ डी आहेत. सोने नाणे आहे. तरीही अस्वस्थता जात नव्हती. दिवसभर ती सोबत होती.
रात्री पुन्हा तीच अवस्था. पत्नीने विचारले, “तुम्ही एवढे
अस्वस्थ का आहात?” साहेब
द्विधा मनस्थितीत होते—खरी परिस्थिती सांगावी की नको? शेवटी
त्यांनी धाडस केले. मात्र बोलताना त्यांना जाणवले की आपल्या धाडसाचे प्रमाणही कमी
झाले आहे. त्यांनी सर्व हकिगत पत्नीला सांगितली.
पत्नी हसून म्हणाल्या, “त्यात एवढे काय!”
साहेब थोड्या नाराजीनेच म्हणाले, “तुम्हाला त्याची कल्पना येणार नाही.”
त्यांच्या सुविद्य पत्नी महिला मंडळाच्या अध्यक्षा होत्या, समाजकार्य करणाऱ्या. चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याची त्यांची ख्याती होती. त्या म्हणाल्या, “आता शांत झोपा. सकाळी मी तुमच्या सोबत येते. पूर्वीपेक्षा अधिक सॅल्यूट तुम्हाला मिळतील.” हे ऐकताच साहेबांना गाढ झोप लागली.
सकाळी ते नेहमीपेक्षा लवकर उठले. शेविंग करून, हलका स्प्रे मारून, जिन्स-पॅन्ट, शर्ट, जॅकेट आणि स्पोर्ट्स शूज घालून ते तयार झाले.
पत्नीची वाट पाहू लागले.
दोघेही घराबाहेर पडले. लक्षदिप पॅलेसच्या सिक्युरिटी
गेटवर पोहोचल्यावर पत्नीने सुरक्षा रक्षकाला बोलावून हळू आवाजात काही सांगितले. ते
ऐकताच त्याने साहेबांना कडक सॅल्यूट मारला. साहेब मंद हसले, छाती अभिमानाने फुलली.
पुढे शिव टेरेस, साई पर्ल, अल्कोह,
रोसलँड, कुणाल आयकॉन, रोझ आयकॉन अशा प्रत्येक
सोसायटीजवळ पत्नी थांबायच्या आणि सिक्युरिटी पर्सन साहेबांना सॅल्यूट करायचा.
संपूर्ण परिक्रमा अशाच सन्मानाने झाली.
साहेबांनी पत्नीचे
आभार मानले. पत्नीचे महिला मंडळ आणि
समाजकार्य अधिक जोमाने सुरू झाले आहे. पाटील साहेबांना एखाद्या समाजसेवी
संस्थेकडून पुरस्कार देता येईल का या प्रयत्नात त्या सध्या आहेत.
वॉकमनवर सुमधुर गीते
ऐकत, सिक्युरिटी गार्डांचे सॅल्यूट घेत, पाटील साहेब रोज सकाळी
नियमित वॉकिंग करतात, संध्याकाळी जिममध्ये जातात. दिवसभर उत्साहात असतात.
पाटील साहेबांच्या पेंशनचा
बराचसा भाग आता सिक्युरिटी गार्डांवर खर्च होतो. या मूल्याच्या बदल्यात त्यांना
मिळणारा ‘पेंशनचा सॅल्यूट’ त्यांच्यासाठी अमूल्य ठरतो आहे !
Dr. Mahendra Ingale @
Pune on June 28, 2026
Author of Value‑Based Leadership
#ValueBasedLeadership
#EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने
No comments:
Post a Comment