Sunday, June 21, 2026

लोकशाहीचा नवा राजा: काकराज !

लोकशाहीचा नवा राजा: काकराज!

एके दिवशी, घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने, घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्याची चर्चा ऐकली. त्यातून प्रेरणा घेऊन त्याने आपल्या मुलाला, काकराजला परदेशात शिकायला पाठवायचे ठरविले. 

काकराज अतिशय हुशार आणि कल्पक होता. मटक्यातील पाणी पिण्यासाठी, पाण्याची खाली गेलेली पातळी वर आणण्याकरिता त्यात दगड गोटे टाकण्याऐवजी स्ट्रॉ वापरून ते कसे प्यायचे हे त्याने प्रात्येक्षिकासह सगळ्यांना समजाऊन सांगितले होते. त्याची ही कल्पकता बघून कावळे आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे व व्यवहार चातुर्याचे कौतुक केले होते.


काकराज जागतिक दर्जाच्या विद्यापीठामधून व्यवस्थान शास्त्रात उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर कावळ्यांच्या जमातीने त्याचा मोठा सत्कार केला. सर्वांचे आभार मानून
, सत्काराला उत्तर देताना त्याने सांगितले:

"आपण आता लहानसहान गोष्टींमध्ये अडकून राहायचे नाही. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती साकारण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा उपयोग करायचा. हे संपूर्ण जंगल आपल्या मालकीचे झाले पाहिजे. चिमणीचे घरटे मिळविण्यासाठी व्यर्थ वेळ घालवायचा नाही. उलटपक्षी चिमण्या आणि जंगलातील इतर पशुपक्षी, प्राणी यांना आपल्या सोबत घ्यायचे. त्यांना आपले विचार पटवून द्यायचे. जग झपाट्याने बदलत आहे, आपणही बदलले पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती केली पाहिजे."

त्याचे हे विचार अनेकांकरीता नवीन होते. काही जेष्ठ कावळ्यांनी नाराजीही व्यक्त केली. कारण यापूर्वी कावळ्यांनी कधी इतर पशू पक्ष्यांशी संवाद साधला नव्हता आणि अशा पद्धतीचा विचार केला नव्हता. पण लोकशाहीत सार्वमत बनविण्याची ही पद्धत आहे हे काकराजने त्यांना पटवून दिले.

त्याने आपल्या थोर परंपरे विषयीही सांगितले: 

"आपली परंपरा फार थोर आहे. शतकांपूर्वी, कृष्ण द्वीपात राहून न्याय आणि नीती शास्त्र विद्या प्राप्त करून त्यात पारांगत झालेले आपले पुर्वज काककुमार यांनी मानस सरोवरातील हंसांना न्याय आणि नीतीचे दाखले देवून लोकशाही मार्गाने त्यांच्या कडून सत्ता हस्तगत केली होती. 

आपण ज्या घराच्या दारावर बसतो तेथे पाहुणे येतात. आपण पाहुणचाराचे प्रतीक आहोत. आपण पितरांचे संदेशवाहक आहोत. आपण पिंडाला शिवल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्त होत नाही. एवढे आपले महत्व आहे. एवढे आपण थोर आहोत. तेव्हा जंगलावर आपला निसर्गदत्त अधिकार आहे."

आता सर्व कावळ्यांनी काकराजला पाठिंबा जाहीर केला.
त्याने इतर वनचरांशी संवाद साधला:

"चिमण्यांनो, किती दिवस काडी-काडी गोळा करून झाडांवर घरटी बांधणार?
कबुतरांनो, तुम्ही संदेश वाहक, शांती दूत ! तुम्हाला त्याची काय बक्षीशी मिळाली?
माकडांनो, किती दिवस उड्या मारत राहणार? पर्यटकांच्या हातातील चीजवस्तू हिसकावून घेण्यातच आयुष्य घालवणार?
सुग्रीणींनो, तुमच्या सुंदर विणलेल्या घरट्याची परदेशात किती वाखाणणी होईल, याची तुम्हाला कल्पना आहे का?
आपल्या कष्टाचे, आपल्या कलाकौशल्याचे खरे मूल्य जाणून घ्या.
आपल्या श्रमांमध्येच आपली ओळख आहे, आणि त्या ओळखीला मी जगभरात मान मिळवून देईन. नव्या व्यवस्थेत, तुमच्या प्रत्येकाकरिता माझ्याजवळ आकर्षक योजना आहे.”

त्याच्या भाषणाने सर्वजण अंतर्मुख झाले. सर्वांनी आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

कबुतरांनी धुत्कार, घुबडांनी चीत्कार, चिमण्यांनी चिव चिव करून आनंद व्यक्त केला. मोर-लांडोरच्या नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

यानंतर काकराजने  वाघ आणि सिंह वगळता सर्व पशू, पक्षी आणि प्राण्यांची बैठक बोलावली. काही वाघ हे सिंहाविषयी पूर्वीपासूनच नाराज होते. त्यांनी बैठकीस गुप्त पाठिंबा दिला. या बैठकीत काकराजची जंगलचा राजा म्हणून निवड व्हावी असा ठराव करण्यात आला. गरुडाने विरोध केला: "सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो सामर्थ्यशाली आहे, आपण त्याच्या बरोबरीचे नाही." पण गरुडांची संख्या फारच कमी असल्याने त्याचे मत दुर्लक्षित झाले. ठराव बहुमताने संमत झाला.

निवडीचा ठराव सिंहापर्यंत पोहोचविण्यात आला. सिंह संतापला: "मी हे स्वीकारणार नाही." त्याने वाघ, बिबटे, कोल्हे, अस्वले यांची मदत मागितली, पण ते मदतीस आले नाहीत.

काकराजने सिंहाच्या गुहेबाहेर सभा घेतली:

मी लोकशाही मानतो. परदेशात असताना मी लोकशाही राज्य व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आहे. ती जगातील सर्वात चांगली राज्य पद्धती आहे. त्यात प्रत्येकाच्या कल्पकतेला आणि कर्तृत्वाला वाव आहे. येथे सर्वांना राजा बनण्याची संधी आहे. उद्या तुमच्यापैकी कोणीही राजा होऊ शकतो.

आपण सर्वजण सभ्य संस्कृतीचे वारसदार सभ्य आहोत. सभ्य संस्कृतीत हिंसाचाराला स्थान नाही. माझ्याकडे संपूर्ण जंगलाचा नाश करू शकतील अशी घातक अस्त्रे आहेत पण मी ती वापरणार नाही कारण हिंसाचारात माझा विश्वास नाही. सहमतीकरिता शांततेचा मार्ग मला अधिक चांगला वाटतो.

त्याचे हे अभ्यासपूर्ण पण तेव्हढेच आवेशपूर्ण भाषण ऐकून उपस्थितांच्या अंगात उत्साह संचारला. ते काकराजचा जयजयकार करू लागले. जोर जोरात घोषणा देवू लागले. काहींना तर आपण राजा झालो आहे असा भास होऊ लागला. 

उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन करून, काकराज शांततेने आणि आत्मविश्वासाने पुढे बोलू लागला:

 जंगलाचा राजा कोण हे लोकशाही पद्धतीने ठरायला पाहिजे. ज्याला सिंह राजा वाटतो त्याने लाल फूल आणावे. ज्याला काकराज राजा वाटतो त्याने हिरवे पान आणावे ." 

थोड्याच वेळात तेथे हिरव्या पानांचा ढीग जमा झाला. 

काकराज लोकशाही मार्गाने जंगलाचा राजा झाला. 

नद्या-सरोवरांवर हंस आणि बगळ्यांची तर वृक्ष-वेलींवर  चिमण्या आणि पोपट यांची सत्ता स्थापित झाली. भूप्रदेश वाघ आणि बिबट्याच्या ताब्यात दिला गेला. 

कबुतरांना शांती मंत्रालय, माकडांना पर्यटन विभाग, मोरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली.


Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on June 21, 2026
Author of Value‑Based Leadership


 #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

No comments:

Post a Comment

Types of Thinking and the Lens of Possibility

Types of Thinking and the Lens of Possibility Human thought takes many forms— P ositive Thinking ,  Analytical Thinking ,  Critical Thinking...