Thursday, July 23, 2026

वारी : श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव !

      वारी : श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव !

वारी म्हणजे पांडुरंगाचे, परमेश्वराचे साकार-निराकार स्वरूप!

वारी म्हणजे भक्तिभाव आणि चैतन्याचा संगम!

वारी म्हणजे चांगुलपणावरील विश्वास दृढ करणारी अनुभूती!

वारी म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव!

भक्तांना पांडुरंगाच्या भेटीची जेव्हढी आस, तेव्हढीच पांडुरंगाला भक्तांच्या भेटीची आस!

भक्त आणि परमेश्वर यातील परस्पर आकर्षण हेच वारीचे वैशिष्ट्य !

भागवत एकादशीपासून सुरू होणाऱ्या वाऱ्या संपूर्ण आसमंताला चैतन्याने भरून टाकतात. वारीचा मार्ग आपल्या लयीत चालू लागतो! वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमे रोज वारी कुठे पोहोचली याची माहिती देतात. कुठे गोल रिंगण झाले, कुठे माऊलीचा अश्व भरधाव धावला याची वर्णने येतात. काही जण सायकलीवरून गटाने निघतात, काही पायी दिंडीत सहभागी होतात- ही दृश्ये मनाला चैतन्याच्या प्रवाहात सामावून घेतात, आणि वारीचा अनुभव अंतर्मनात जिवंत होतो.

वारीत चालणे म्हणजे चांगुलपणावरील विश्वास, परस्परांवरील प्रेम आणि आदरभावाचे प्रगटीकरण. "मी" आणि "तू" यातील भेद विसरून "आपण" या भावनेत विलीन होणे, एकमेकांना "माऊली" म्हणून संबोधणे, आदराने वाकून नमस्कार करणे, फुगड्या खेळणे, दैनंदिन कष्ट विसरून "राम कृष्ण हरी"च्या गजरात तल्लीन होणे—हे सर्व अलौकिक अनुभव आहेत.

एकट्याने पांडुरंगाचे दर्शन घेणे हा एक वेगळा अनुभव आहे, तर वारीत चालत असताना वरकऱ्यांमध्ये पांडुरंगाचे स्वरूप पाहणे हा दुसरा. वारी म्हणजे केवळ चालणारे वारकरी नव्हे, तर रस्ते, घाट, पलाख्या, दिंड्या, पताका, रिंगण, फुगड्या, जयघोष, चैतन्याने भरलेला आसमंत, नद्या-नाले, वृक्ष-वेली, ओहळांचे प्रवाह, स्वागतकक्षे, भोजन व्यवस्था, पोलिसांचा बंदोबस्त, वाहिन्यांचे कॅमेरे—हे सर्व मिळून वारीचे रूप अधिक व्यापक होते.

प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥ हे सांगणाऱ्या श्री संत मुक्ताबाई, पुंडलिकाच्या अंगणात प्रगट झालेल्या विठ्ठलाच्या भेटीला भक्तजनांसोबत निघाल्या आहेत. या वर्षी भक्तजनांनी त्यांना चांदीच्या रथात विराजमान केले आहे.

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 23, 2026
Author of 
Value‑Based Leadership 

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

No comments:

Post a Comment

Value-Based ADR for Royal Families

Value-Based ADR for Royal Families Heritage, Wealth, and the Burden of Disputes: At the dawn of independence, India faced the monumental tas...