Monday, September 14, 2026

स्वातंत्र्याची मर्यादा !

 स्वातंत्र्याची मर्यादा !

'नेहमीच्या रस्त्यावरून गाडी चालली होती...

उजव्या बाजूला वरच्या विवरापर्यंत जाणारी पायवाट आता मागे पडली आहे. ते विवर आता रिकामे आहे. त्यात राहणारे गुरखे आणि त्यांचा सरदार...त्यांची स्मृती तेव्हढी रारंग ढांगात उरली आहे...

विश्वनाथने मागे वळून पहिले. गाडीतून रारंग ढांग अजून दिसत होता. क्षणभर विश्वानथला वाटले- जशी गाडी पुढे जात आहे तसा रारंग ढांग ही दूरवर मार्ग चालत आहे. आपल्यात आणि त्याच्यात प्रती क्षणी अंतर वाढत आहे. पहिल्यांदा पहिला तेव्हाढाच आताही रारंग ढांग बलदंड आहे. आकाशाला मस्तक भिडवून स्वतःच्या मस्तीत हरवलेला आहे. पण त्याच्या अंगावर एक लहानशी रेघ आहे. ही रेष  माणसाच्या जिद्दीचे प्रतीक आहे. या रेषेवरून आता वाहने धावू लागतील. मृत्यूच्या  जबड्यातून जीवनाची रहदारी चालू राहील आणि त्याला साक्षी राहतील त्या आठ यादगारी... 

अंगावरून युनिफॉर्म उतरविला असला तरी विश्वनाथने अभावितपणे सॅल्युट केला... रारंग ढांगाला....' 

रारंग ढांग सोडतांना, विश्वनाथ कर्नल राइटना भेटतो. ते विचारतात: 

"सैन्यात नसेल पण बाहेर तरी तुला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य आहे का

पटो अथवा न पटो, केवळ इंजिनिअरलाच इमारती किंवा रस्ते बांधावे लागतात असे नाही, तर ज्याचा जीवनशी संबंध नाही आणि जे मनापासून पटलेले नाही ते शिकवण्याची पाळी शिक्षकावर येते, राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार संशोधनाचे विषय शास्त्रज्ञांना निवडावे लागतात, फार काय राज्यकर्त्या मंत्र्यांनाही देशहितापेक्षा  आपल्याला मते देणाऱ्या मतदारांना खुश ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागते...

सिव्हिल इंजिनिअर असलेला विश्वनाथ बॉर्डर रोड्समध्ये कमिशनड ऑफिसर म्हणून नेमला जातो. हिमालयात, रारंग ढांग मधून रस्ता बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. या प्रकल्पात काम करत असताना, एका ठिकाणी जमीन कमकुवत असल्याचे त्याला जाणवते. सर्वे करून, सॉइल सॅम्पल घेवून, ते तो टेस्टिंगला पाठवतो. संभाव्य धोका टाळण्या करिता दोन पर्याय सुचवतो – कड्याला भक्कम आधार द्यावा किंवा रस्त्याचे वळण बदलावे.

परंतु सैनिकी शिस्तीच्या चौकटीत त्याच्या सूचना स्वीकारल्या जात नाहीत. काम सुरू असतानाच, कमकुवत ठिकाणी कडा कोसळतो आणि सात जणांचा मृत्यू होतो. संवेदनशील विश्वनाथ त्या ठिकाणी मृतांच्या स्मारकाच्या स्वरूपात आठ खांब उभारतो. त्यासाठी सैनिक आणि स्थानिक मजूर अहोरात्र काम करतात. मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता बांधकाम करणे आणि शासकीय मालमत्तेचा गैरवापर हे आरोप ठेवून त्याचे कोर्ट मार्शल होते.

आपली बाजू मांडताना विश्वनाथ सांगतो – हे बांधकाम करण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. सरकारी साहित्याचा गैरवापर हा जर माझ्यावर आरोप असेल तर तो थोडा आधी झाला असता तर सात लोकांचे प्राण वाचले असते हे आता सिद्ध झाले आहे. 

निसर्गाची लहर आणि अभियांत्रिकीचे शास्त्र हे सैन्याच्या शिस्तीत बांधले जाऊ शकत नाही. परिस्थिती बदलण्याजोगी असताना ती बदलली नाही, ही खरी चूक आहे. 

गेलेल्यांचा मृत्यू जिवंत असलेल्यांच्या कामी यावा म्हणून मी आठ खांब उभारले....

कर्नल बादल निकाल जाहीर करताना म्हणतात – सैन्यात असाधारण शौर्याबद्दल, धैर्याबद्दल गौरव पदके दिली जातात. आरोपीने समोरचा धोका ओळखून, ज्या धैर्याने हे काम केले ते पाहता त्याला सैन्यातला उच्च सन्मान मिळायला पाहिजे. पण सैन्यात काही गोष्टी मनाला पटल्या नाहीत तरी जपाव्याच लागतात. वैयक्तिक स्वातंत्र्याचा कितीही गौरव झाला तरी सैन्यात त्याला जागा नसते. देशाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सैनिकांना स्वतःवर बंधने घालून घ्यावीच लागतात....

आरोपीचे त्याच्या शास्त्रातील ज्ञान, बांधकामा मागील त्याचा उद्देश, वरिष्ठांच्या परवानगी वाचून, व ज्या पारिस्थित त्याने हे बांधकाम केले हे सर्व विचारात घेता आरोपीला दोषमुक्त करण्याची शिफारस कोर्ट करीत आहे. 

पण आरोपीची वृत्ती, स्वतंत्र बुद्धी आणि विचारांची पद्धती पाहता असा माणूस सैन्याच्या शिस्तीत आणि कार्य पद्धतीत बसण्याची शक्यता नसल्याने त्याचा तीन वर्षाचा करार रद्द करून त्याला निवृत्त करण्यात यावे असे आपले मत कोर्ट येथे नमूद करत आहे.

प्रभाकर पेंढारकरांची रारंग ढांग ही कादंबरी केवळ हिमालयाचा भूगोल, सतलजचा प्रवाह, पहाडातील  जीवन आणि सैनिकांचा संघर्ष यांचे चित्रण करीत नाही, तर ती मानवी मनातील मूल्यांचा शोध घेते. 

शिस्त आणि स्वातंत्र्य, आदेश आणि संवेदनशीलता, दोष आणि निर्दोषता यांचा संघर्ष यातून उलगडतो.


Dr. Mahendra Ingale @  Pune on Sept 14, 2026 Author of Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #EveryDreamComesTrue  #ValueBasedADRAndCounsellingServices #HorizonBeyondCertainty


No comments:

Post a Comment

Value-Based ADR for Royal Families

Value-Based ADR for Royal Families Heritage, Wealth, and the Burden of Disputes: At the dawn of independence, India faced the monumental tas...