स्वाक्षरी!
परवा, माझ्या एका विद्यार्थ्याने, माझे स्वाक्षरी केलेले, पुस्तक पाठविण्याची विनंती केली. नवल नगर इंजीनियरिंग कॉलेजचा, १९८८ चा उत्तर प्रदेशचा, गोरखपूर जवळच्या शहरातील हा विद्यार्थी! नेपाळ येथून एक दुर्मिळ रुद्राक्ष आणून त्याने मला भेट दिला होता. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून तो दिल्ली मेट्रो मधे अभियंता म्हणुन रुजू झाला होता.
त्यानंतर २० वर्षांनी, कामनिमित्त एका इंडस्ट्रीला भेट द्यायला तो जळगावला आला तेव्हा तेथील कागदपत्रे पाहत असताना ‘टेस्टिंग रिपोर्टवर’ त्याने माझी स्वाक्षरी बघितली. तो मला भेटायला आला. त्यानें सांगितले, ‘सर, मी तुमच्या सह्या असलेले जर्नल्स बरीच वर्षे सांभाळून ठेवले होते, परंतु घराचे रिनोव्हेशन करतांना ते मिसप्लेस झालेत.’ (पत्नीच्या अग्रहामुळे, त्याने ते रद्दीत दिले असावेत!) पण तो भेटायला आला याचा आनंद झाला. त्याने माझ्या स्वाक्षरीची वैशिष्ट्ये सांगितली. ती मला माहीत होती. माझ्या ग्राफालॉजिस्ट मित्राने, बऱ्याच वर्षापूर्वी, ती सांगितली होती.
आता मला स्वाक्षरीबद्दल चिंतन करून त्याबद्दल लिहणे भाग आहे!
प्रत्येकाला आपली स्वाक्षरी प्रिय असते तशी ती मलाही प्रिय आहे. स्वाक्षरी हा अपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असते. त्याबद्दल माझ्या ग्राफलॉजिस्ट मित्राने सांगितले त्यापूर्वीही आणि त्यानंतरही मी माझ्या पद्धतीने ती करित आलो आहे. ‘And I do it with Grace!’
२०१५ मधे, न्यायालयाच्या आदेशाने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या पदांवर, शासकीय तंत्रनिकेतनात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिव्याख्यात्यांना नियमित करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण विभागातीलच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय होता.
हा निर्णय येताच शासकिय तंत्रनिकेतन जळगांव येथे कार्यरत असलेल्या अधिव्याखात्यांची प्रकरणे मी मागवून घेतली व वेतन निश्चतीची प्रक्रिया सुरू केली. लेखा विभागात कार्यरत असलेले, नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे व आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून उत्साहाने काम करणारे श्री संजय उपासनी यांचेशी चर्चा केली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवरुन वेतन निश्चीती केली. वेतन निश्चतीच्या आदेशांवर मी स्वाक्षरी केली. प्रत्येक स्वक्षरी कराताना मी उत्साहित झालो. प्रत्येक स्वाक्षरी करताना मला ऊर्जा मिळाली.
माझ्या सारखेच अनेक किंबहुना माझ्या पेक्षाही अधिक लायक व्यक्ती असतांना मला विशिष्ट पदांवर काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता भाव राहिला आहे. कल्याणकारी कार्य करण्याची संधी मिळणे या सारखा दुसरा भाग्याचा क्षण नाही असे मी मानत आलो आहे म्हणुन स्वाक्षरी केली.
मी कर्तव्य भावनेने स्वाक्षरी केली. स्वतः करिता केली. स्वप्रतिमा उंचावत नेण्याकरिता केली. ‘व्यक्तीमत्व विकासाच्या’ कार्यक्रमात आणि ‘कार्य संस्कृती विकास’ या प्रशिक्षण कार्यक्रमात मला माझ्या विद्यार्थ्यांशी आणि सहकाऱ्यांशी ‘स्वप्रतिमा’ (Self Image) या विषयावर बोलायचे होते. फक्त बोलून भागणार नव्हते. त्यांना ते तसे दिसले पाहिजे, त्यांनी ते अनुभवले असले पाहिजे तर प्रशिक्षण परिणामकारक ठरेल याची जाणीव होती म्हणून स्वाक्षरी केली!
लोकशाही राज्य पद्धतीत, कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्या करिता काही पदे निर्माण केली जातात. त्या पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या असतात. ती पार पडण्या करिता अधिकार प्रदान करण्यात येतात. म्हणून त्या पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना अधिकारी म्हणतात. आपल्या अधिकारांचा उपयोग अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच्या माध्यमातून करायचा असतो हे माहित असल्याने स्वाक्षरी केली!
२००५ मधे, न्यूझीलँड हॉस्टेल, गोरेगाव, मुंबई येथे राजपत्रित महासंघाच्या अधिवेशनात उपस्थित असताना, ‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा !’ हे पुस्तक लिहण्याचा संकल्प केला आहे. तो सिद्धीस जावा म्हणून स्वाक्षरी केली !
यशस्वी व्यक्ती, स्वाक्षरी करताना, उत्साहित आणि आनंदित असतात किंबहुना त्यामुळेच ते यशस्वी होतात अशी माझी धारणा असल्याने स्वाक्षरी केली!
अशीच स्वाक्षरी आणखी येकदा केली होती…
२८ एप्रिलला मुलीचे लग्न होते. पुण्याला. मी रजेवर होतो. पण आहरण व संवितरण अधिकारी(Drawing and Disbursing Officer) असल्याने पगार पत्रकांवर माझ्या स्वाक्षरीची आवश्यकता होती. कर्मचारी व अधिकारी यांचे पगार वेळेत व्हावेत या करिता पगार पत्रके जळगाव वरून मागवून घेतली. विवाह सोहळा सुरू असताना, रात्री ११ वाजता मंचावरून खाली उतरुन स्वाक्षरी केली. १ मे हा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन आनंदात साजरा करता यावा म्हणून स्वाक्षरी केली!