Friday, July 11, 2025

शासकीय सेवेत सन्मानाने जगा !

शासकीय सेवेत सन्मानाने जगा !

माझ्या लेखनाला आपल्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. यात केवळ कौतुक नाही तर एक आत्मीयता आहे जी माझ्या अंतरंगाला स्पर्शून नवीन स्पंदने निर्माण करते. 

मागील ब्लॉगमध्ये मी ‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा!’ या नव्या पुस्तक लेखनाचा संकल्प जाहीर केला होता आणि त्यामागची पार्श्वभूमीही उलगडली होती. गुरु पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करून, या पुस्तकाच्या लेखनास औपचारिक सुरुवात केली आहे. 

या ग्रंथाच्या माध्यमातून मी शासकीय सेवेतील संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख अधिकार्‍यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे दर्शन घडविणार आहे. विविध घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांच्या उदाहरणांतून प्रशासनातील अनेक पैलू आपोआपच उलगडले जातील. कामानिमित्त माझा संबंध आला आणि ज्यांची कार्यशैली मला जवळून बघता आली अशा अनेक कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांबद्दल मी लिहणार आहे. साधेपणाच्या तेजाने झळकणारे, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी मा. सीताराम कुंटेएखादा प्रकल्प हातात घेतल्यावर देहभान विसरून त्यात स्वतःला झोकून देणारे, प्रतिभाशाली व कलावंत मनाचे मा. मनुकूमार श्रीवास्तव;  दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल उत्पादनात लक्षणियरीत्या वाढ करण्यात योगदान देणारे पहिले Inspector General of Registration (IGR) मा. नितीन करीर यांच्याबद्दल लिहणार आहे. या अधिकार्‍यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पद भूषविले. सेवा संस्काराचा वारसा लाभलेले, निःस्पृहतेने काम करणारे मा. भूषण गगरणीअत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यतत्पर अधिकारी मा. प्रविण परदेशी यांच्याबद्दल लिहणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनात विविध ठिकाणी कार्यरत राहिलेले, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचे प्राचार्य डॉ एन टी खोब्रागडेसहसंचालक पदावर कार्यरत राहिलेले, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केलेले प्राचार्य मा डी पी नाठे;  सहकाऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेणारे व तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलेले प्राचार्य एम एस महाजन यांच्याविषयी लिहणार आहे. 

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 'कार्य संस्कृती अभियान' आणि 'पगारात भागवा' हे प्रकल्प राबवितांना जीवाचे रान करून, पायला भिंगरी लाऊन वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत महाराष्ट्रभर दौरे करणाऱ्या, शेवटच्या श्वासपर्यंत अधिकाऱ्यांच्या कल्याणा करिता झटणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस राहिलेल्या मा. ग दि कुलथे यांच्या बद्दल लिहणे ही माझ्या कडून त्यांना विनम्र आदरांजली ठरेल. 

संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकभिमुखता केंद्रस्थानी ठेवून जेव्हा प्रशासन चालते तेव्हा लोक कल्याणाचे दरवाजे उघडले जातात. शासकीय सेवेत सन्मानाने जगणारे अधिकारी हे समाजाच्या आशा आकांक्षांची पुर्ती करणारी शक्ती असतात. अशा अधिकार्‍यांच्या कार्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त होते. एक उच्च दर्जाचे मूल्याधिष्ठित आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. इतिहासात त्यांच्या कार्य कर्तृत्वाची नोंद होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ ठरतात. 

या सर्व प्रेरक व्यक्तिमत्वांकडून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या अनुभवांनी माझ्या विचारांना दिशा दिली. त्या सर्वांप्रती कृतज्ञता भाव ठेवून मी हे लिहणार आहे.

Thursday, July 10, 2025

धुळे भेट – भावस्पर्शी क्षण !

 धुळे भेट – भावस्पर्शी क्षण !

आज एका कार्यक्रमानिमित्त धुळे येथे जाण्याचा योग आला. त्या निमित्ताने शासकीय तंत्रनिकेतन, धुळे या माझ्या सेवास्थळी सदिच्छा भेट देण्याचा मनोदय पूर्ण झाला. या संस्थेत मी १९८९ साली अधिव्याख्याता म्हणून आणि २०१५ साली प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्या काळातील आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या.

संस्थेचे  प्राचार्य डॉ. आर. जी. वाडेकर यांच्या पुढाकाराने नवीन इमारतीचे बांधकाम आणि अंतर्गत रस्त्यांचे काम वेगाने सुरू असल्याचे पाहून समाधान वाटले. पांझरा नदीच्या किनाऱ्याने, संस्थेच्या बाजूने, राष्ट्रीय महामार्गापासून शहरात जाणारा चार पदरी रस्ता पूर्ण झाल्यामुळे संस्थेपर्यंतचा प्रवास आता अधिक सुलभ झाला आहे.

सध्या महाराष्ट्रातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आज ऑप्शन फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस असल्याने संस्थेच्या परिसरात विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती जाणवली. प्रवेश प्रक्रियेला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद उत्साहवर्धक होता.

कार्यालयातील कर्मचारीवर्ग व प्राध्यापकांशी संवाद साधताना मन आनंदित झाले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या शुभेच्छा मनाला भावून गेल्या. मी कार्यरत असताना त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

माझे ‘अभियांत्रिकी स्पंदने’ हे पुस्तक मी संस्थेला भेट म्हणून अर्पण केले. माझ्या आठवणी, अनुभव आणि विचार पुन्हा एकदा त्या वास्तूत गुंजले आणि नवीन स्पंदने निर्माण झाली !

Monday, July 7, 2025

कृतज्ञता !

कृतज्ञता !

आज संध्याकाळी श्री नंदलाल सापकाळे यांचा फ़ोन आला. ते माझे सहकारी होते. त्यांनी सांगितले की शासकीय अधिकारी राहिलेल्या त्यांच्या एका नातेवाईकांनी पनवेल वरून कळविले की त्यांनी माझे पुस्तक वाचले. माझ्या विषयी व पुस्तकाविषयी त्यांचे नातेवाईक जे बोलले ती स्वस्तुती होईल म्हणून मी येथे लिहीत नाही. मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद कळविले. 

यानिमित्ताने एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला.

मी शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे शिकत असतांना मा. शालिग्राम पाटील हे शिपाई म्हणून कार्यरत होते. पुढे मी प्राध्यापक म्हणून कार्यरत असतांनाही ते तेथे होते. नियत वयोमानानुसार ते नंतर निवृत्त झाले. त्यावेळी आम्ही त्यांचा निरोप समारंभ आयोजित करून यथोचित गौरव केला. कार्यक्रमात त्यांच्या पत्नी, मुली व जावई उपस्थित होते.

मी प्राचार्य पदावर कार्यरत असताना एक दिवस त्यांच्या पत्नी व जावई माझ्या कडे आले. तेव्हा त्यांचे निधन झाले होते हे मला कळले. त्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन पत्नीस मिळावे म्हणून त्यांच्या पत्नी अर्ज व कागदपत्रे घेवून कोषागारात गेल्या तेव्हा त्या ठिकाणी वारसदार म्हणून पत्नीचे वेगळेच नाव आढळले. कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना ते दाखविले. ‘आमच्याकडे AG Office कडून जे आदेश आले आहेत त्यावर तुमचे नाव नसल्याने आमच्या स्तरावरून काही करता येणार नाही. या संबंधात तुम्हाला AG Office, Mumbai कडे संपर्क साधावा लागेल’ असे कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

‘तुम्हाला काही अडचण आल्यास इंगळे दादांना भेटायचे’. असे काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितले होते, असे त्यांच्या पत्नींनी मला सांगितले. पाटील मला प्रेमाने दादा म्हणायचे. त्यांचा माझ्यावरचा विश्वास पाहून मला गहिवरून आले. 

मी ताबडतोब आस्थापना विभागातील सहकाऱ्यांना बोलावून त्यांचे सेवा पुस्तक आणण्याच्या सूचना केल्या. त्याच वेळेस एका महत्वाच्या विषयावर माहिती संकलन करून ती वरिष्ठ कार्यालयामार्फत मंत्रालयात सादर करण्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू होते. त्यांची केस फार जुनी असल्याने, रेकॉर्ड रूम मधून ते शोधून आणणे थोडे अवघड असल्याने श्रीमती पाटील यांना २/३ दिवसांनी येण्यास सांगावे अशी विनंती मला सहकाऱ्यांनी केली. मी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचे काम प्राधान्याने करण्याबद्दल नेहमीच आग्रही असायचो. 

त्याच वेळेस निवृत्त झालेले माझे सहकारी श्री नंदलाल सपकाळे काही कामनिमित्त कार्यालयात आले असल्याचे मला समजले. मी त्यांना बोलावून पाटील यांचे सेवापुस्तक शोधून आणायची विनंती केली, कारण यापूर्वी काही काळ त्यांनी त्या विभागात काम केले होते. ते आनंदाने तयार झाले. त्यांनी परिश्रम घेवून पाटील यांचे सेवापुस्तक शोधून आणले.

सेवा पुस्तकात वारसदार म्हणून त्यांच्या पत्नीचे व्यवहारातील प्रचलित नाव लिहलेले होते. पाटील निवृत्त झाले तेव्हा त्यांनी  स्वतः ते नाव निवृत्ती अर्जावर लिहले होते. आधार कार्ड आणि ऑनलाइन पद्धतीने निवृत्ती अर्ज करण्याची पद्धत तेव्हा अस्तित्वात नव्हती. पाटील यांनी सादर केलेल्या अर्जानुसार AG ऑफिस कडून त्यांची पेंशन ऑर्डर ट्रेझरी कडे गेली होती व त्या नुसार त्यांना पेंशन मिळत होते. 

प्रत्यक्षात त्यांच्या पत्नीचे नाव वेगळे होते. सेवा निवृत्ती आदेशातील नाव आणि श्रीमती पाटील यांच्याकडे  असलेल्या कागद पत्रावर असलेल्या नावाची व्यक्ती एकच आहे हे सिद्ध होऊ शकेल असा कोणताही कागदपत्राचा पुरावा त्या सादर करू शकत नव्हत्या. अशा परिस्थितीत AG office कडे जाऊनही काही उपयोग नव्हता.

मी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी व जेष्ठ विभाग प्रमुखांशी या बाबत चर्चा केली. 

मी, श्रीमती पाटील यांना एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) करायला सांगितले. निवृत्ती वेतन आदेशात असलेल्या नावाची व्यक्ती आणि त्या एकच व्यक्ती आहे अशा आशयाचे ते प्रतिज्ञापत्र असावे हे त्यांना सांगितले. त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र करून आणल्यानंतर मी AG office कडे सविस्तर पणे एक प्रस्ताव सादर केला. त्यात सर्व घटनांची तपशीलवार माहिती दिली. त्याच बरोबर निवृत्ती वेतन आदेशात नमूद असलेल्या व कागदोपत्री असलेल्या व्यक्ती एकच आहेत आणि मी त्यांना प्रत्यक्षरित्या ओळखतो असे त्यात नमूद केले. मी आहरण व संवितरण अधिकारी (Drawing and Disbursing Officer) असल्याने जबाबदारीपूर्वक हे लिहले होते. पंधरा दिवसांनी  श्रीमती पाटील यांच्या नावाचा वारसदार म्हणून उल्लेख असलेला आदेश कोषागारास प्राप्त झाला. 

निवृत्त झाल्या नंतरही श्री सपकाळे यांची आम्हाला जी मदत झाली होती त्या घटनेची, मी त्यांना या निमित्ताने आठवण करून दिली तेव्हा त्यांचा कंठ दाटून आल्याचे मला जाणवले !

माझ्या जीवनात कृतज्ञता या शाश्वत मूल्याला अनन्य साधारण महत्व आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेले असे क्षण जीवंत करून, मी त्यांना शब्दबद्ध करतो तेव्हा त्यापासून मिळणारा आनंद शब्दातीत असतो. कृतज्ञता ही केवळ भावना नसून, ती आत्म्याला स्पर्श करून, हृदयात दिव्य स्पंदने निर्माण करणारी एक अनुभूती असते !


Saturday, July 5, 2025

संकल्प!

 संकल्प !

‘अभियांत्रिकी स्पंदने’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ऑर्डर प्लेस होण्याचा ओघ सुरू झाला आहे. प्रत्येक ऑर्डर डॅशबोर्डवर दिसते आणि त्यासोबत रॉयल्टीचे आकडेही. हे स्प्रेडशीट पाहताना मनात आश्चर्य, समाधान आणि अनाहत आनंद अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या! आणि त्या भावनेतूनच लिहिण्याचं नवं स्फुरण मनात उमटलं.

१९८२ ते १९८९ दरम्यान मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. त्या काळात मॅकग्रा हिल्स, मॅकमिलन, पियर्सन, धनपत राय यांसारख्या नामवंत प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधी मला सतत भेटत असत. त्यांनी मला पुस्तक लिहिण्याची विनंती केली होती. मी ‘अप्लाइड मेकॅनिक्स’ हा कठीण समजला जाणारा विषय अत्यंत संयतपणे शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतो. हेच कारण असेल की प्रकाशन संस्थांच्या सर्वेक्षणातून माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचले.

पण मी ‘Beer and Johnston’ या लेखकद्वयींच्या Engineering Mechanics या पुस्तकाचा अत्यंत चाहता होतो. त्यांनी त्या विषयावर इतकं सुबोध, समर्पक आणि प्रगल्भ लेखन केलं होतं की त्या पातळीवर मी काही लिहू शकतो, हे मला वाटलंच नाही. म्हणून मी नम्रपणे नकार दिला.

नंतर त्यांनी मला Design of Steel Structures या विषयावर लिहिण्याचा आग्रह केला, जो विषय मला अत्यंत प्रिय होता आणि ज्यात बोर्ड परीक्षेत मी सर्वाधिक गुण मिळवले होते. तेव्हा नुकतंच IS 800 चे सुधारित (Revised) संस्करण प्रसिद्ध झालं होतं. त्या विषयावर R. S. Negi यांच्याखेरीज फार मर्यादित प्रमाणात स्रोत उपलब्ध होते. मी त्या वेळी एकाच वेळी चार अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना  हा विषय शिकवत होतो आणि त्यामुळे वेळे अभावी, इच्छा असूनही लिखाण शक्य झालं नाही.

२००५ मध्ये मुंबईच्या न्यूझीलंड हॉस्टेल, गोरेगाव येथे झालेल्या राजपत्रित महासंघ अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी अध्यक्ष प्रा. राजनीश पिसे यांच्या सोबत उपस्थित होतो. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात श्री. रविंद्र मोरे (जे नंतर Director of Treasuries झाले) यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि मा. ग. दि. कुलथे यांची सरचिटणीस म्हणून.

दुसऱ्या सत्रात माहिती अधिकार कायदा व बदली कायद्यावर चर्चासत्र व परिसंवाद झाला. मी त्यात या कायद्याच्या पळवाटा व त्याचा गैरवापर या विषयावर माझे मत मांडले. बदलीच्या कायद्याचे उल्लंघन करून माझी बदली करण्यात आली होती (नंतर ती रद्द झाली). 

शिक्षक संघटनेत, राजपत्रित अधिकारी संघटनेत आणि प्रशासनात काम करतांना माझ्या अनुभावर आधारित “शासकीय सेवेत सन्मानाने जागा!” हे पुस्तक मी लिहायला घेतलं. पण संघटनेच्या कार्यात आणि नंतर प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढा गुंतून गेलो की ते लिहिणं शक्य झाले नाही. आज, ‘अभियांत्रिकी स्पंदने’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या जुन्या स्फुरणाचा नवा जागर होत आहे. आता ठरवलं आहे – लिहीयचं!

"लोकाभिमुख शासन म्हणजे काय? ही एक संकल्पना आहे की वास्तव?"

"शासकीय नोकरी ही ‘सेवा’ आहे का?"

"सन्मान म्हणजे नक्की काय ? तो कोणी कोणाचा करायचा असतो ?"

"जगणं म्हणजे नेमकं काय? जिवंत राहणे आणि जगणे यातील मुलभूत फरक काय आहे?"

या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत मी चिंतन करीत आहे. विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल, तेव्हा ते लेखन पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबायचे नाही असा संकल्प या निमित्ताने करित आहे!

Friday, July 4, 2025

मूठभर बिया !

काल Amazon Link येताच माझ्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी आणि स्नेहीजनांनी पुस्तक order करून, screen shots पाठवायला सुरवात केली. त्यांना धन्यवाद देताना मध्यरात्री नंतरच्या नीरव शांततेत बाहेर आभाळ आणि आत मन भरून आले होते!

निळ्याशार हिरव्या डोंगरावरुन, आषाढातील भरून आलेल्या मेघांकडे बघून, आसमंतात उधळलेल्या, ओंजळीतील मुठभर बियांचे वटवृक्षात रूपांतर होण्याची प्रक्रिया बघून मी आनंदून गेलो आहे!

माझा प्रत्यक्ष परिचय नसतांना, अनेक मान्यवर व्यक्ती व प्रकाशन संस्थानी Google Books वर Sample वाचून सुंदर अभिप्राय लिहिलेत. फोन वर बोललेत.  हे पुस्तक इंग्रजीतून लिहण्याकरिता अनेक जण आग्रह करित आहेत. 🙏

——————————————————————————

आपल्या पुस्तकाची काही पाने वाचली. आपल्यातली अभियांत्रिकी आणि स्पंदने भावली!

तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयावर लेखन केले आहे.

मंदार जोशी 

ग्रंथपाल, मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय 

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई

—————————————————————————-

Great!

Sample वाचले. छान आहेत. तुम्हाला ‘लेटर ऑफ अप्रिसिएशन’ मिळाले कारण पुस्तक खूप छान आहे. आम्ही कॉपी ऑर्डर केली आहे.

दत्तात्रय वाघमोडे 

CEO, Dexcel Digital Hub Pvt. Ltd.

——————————————————————————

Amazon Link: अभियांत्रिकी स्पंदने 

https://www.amazon.in/dp/936554632X/ref=sr_1_1

Google Link:अभियांत्रिकी स्पंदने 

https://play.google.com/store/books/details?id=8TNpEQAAQBAJ

Monday, June 30, 2025

पुस्तक प्रकाशित झाले !

पुस्तक प्रकाशित झाले ! 

परवा पांडुरंगाच्या दर्शन घडले. 

दर्शन घेवून मंदिराबाहेर आलो आणि पुन्हा एकदा कळसा कडे बघून हात जोडले गेले. 

तर्जनीने 'पब्लिश' टॅब ला स्पर्श केला आणि 'अभियांत्रिकी स्पंदने' प्रकाशित झाले.

या स्पंदनांचे आता सार्वत्रिक लयीत रुपांतर झाले असून जगातील काना कोपऱ्यात ती पोहचते आहे . 

 मूठभर बिया हातात याव्यात आणि निळ्याशार हिरव्या डोंगरावर उभे राहून, आषाढातील भरलेल्या आभाळाकडे हात जोडत पाहून, त्या आसमंतात उधळून द्याव्यात. परमेश्वराची कृपा झाल्यावर, बियांमधील चैतन्याचे वटवृक्षात रुपांतर होते. हा विचार पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माझ्या मनात आला. शब्दांच्याही पलीकडे, लिहणाऱ्यालाही अभिप्रेत नसतील अशा अनेक गोष्टी वाचक अनुभवू शकतात असा ही विचार, माझ्या मनात या प्रसंगी येत आहे. 

तापी-पूर्णा सांगमावरील चांगदेव मंदिरापासून निघालेली ही दिंडी, प्रिय स्नेहीजनहो, तुमच्या सहवासात इथपर्यंत पोहचली. या प्रवासात पुन्हा एकदा तुमच्या सोबत चालत आलो, तुमच्या प्रेमळ साथीत हे आनंददायी क्षण पुन्हा अनुभवले. तुमच्या सहकार्याने हा प्रवास अधिक समृद्ध झाला. तुमचे मनःपूर्वक आभार! 

तुम्ही आठवणी जागवल्या, संवेदनांना स्पर्श करून स्पंदने निर्माण केली, प्रिय विद्यार्थी मित्रहो, तुमच्या जिज्ञासेने आणि प्रतिसादाने मला नवी ऊर्जा मिळाली; तुमचे मनःपूर्वक आभार ! 

वेळोवेळी दिलेल्या अमूल्य सूचना, प्रेम आणि आपुलकीने दिलेला प्रतिसाद, कौतुकाचे शब्द आणि प्रोत्साहानाने वाढवलेला उत्साह या मुळे माझा प्रवास आनंददायी झाला म्हणून प्रिय मित्रहो तुमचे मनःपूर्वक आभार ! 

हे विश्व निर्मात्या परमेश्वरा, तू जग सुंदर बनविले आहेसच, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी दिलीस, अंतःकरणात नव नवीन संकल्पना उमटविल्या, विचारांना दिशा दिलीस. तुझे मनःपूर्वक आभार !

Sunday, June 29, 2025

मनःपूर्वक…

मनःपूर्वक…

प्रिय स्नेहीजनहो,

तापी-पूर्णा संगमावरील चांगदेव मंदिरापासून निघलेली ही दिंडी तुमच्या सहवासात इथपर्यंत पोहचली. या प्रवासात पुन्हा एकदा तुमच्या सोबत चालत आलो, तुमच्या प्रेमळ साथीत हे क्षण अनुभवले. तुमच्या सहकार्याने हा प्रवास अधिक समृद्ध झाला.

तुमचे मनःपूर्वक आभार!

प्रिय विद्यार्थी मित्रहो, 

तुम्ही आठवणी जागवल्या, संवेदनांना स्पर्श करून स्पंदने निर्माण केली. तुमच्या जिज्ञासाने आणि प्रतिसादाने मला नवी ऊर्जा मिळाली. 

तुमचे मनःपूर्वक आभार!

प्रिय मित्रहो,

वेळोवेळी दिलेल्या अमूल्य सूचना, प्रेम आणि आपुलकीने दिलेला प्रतिसाद, कौतुकाचे शब्द आणि प्रोत्साहानाने वाढवलेला उत्साह यामुळे माझा प्रवास आनंददायी झाला. 

तुमचे मनःपूर्वक आभार!

हे विश्वनिर्मात्या परमेश्वरा, 

तू जग सुंदर बनविले आहेसच, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी दिलीस. अंतःकरणात नवनवीन संकल्पना उमटविल्या, विचारांना दिशा दिलीस. तुझे मनःपूर्वक आभार!

कवडशांच्या सोबतीने प्रवास

चालत असताना काही कवडसे दिसले… निश्चित सांगता येणार नाही , पण बहुधा ते सत्याचे असावेत. त्या उजेडाच्या उगमाचा शोध घ्यावा का , असा विचार मन...