Thursday, July 30, 2026

नवा करार!

 नवा करार!

हिरवी पाने आणि लाल फुले मोजून काकराजची जंगलचा राजा म्हणून निवड झाल्यानंतर सत्कार समारंभाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व जंगलवासीयांना निमंत्रण होते. सिंह, चिमपंझी सोडले तर जवळ जवळ सर्व जंगलवासी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

सिंहाला काकराजची निवड अवैध पद्धतीने झाली आहे असे वाटत होते त्यामुळे त्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता तर माकडाकडे पर्यटन खाते सोपविण्यात आल्यामुळे चिमपंझी नाराज होते.

सिंहावर पूर्वीपासूनच नाराज असल्याने, काकराजच्या निवडीला वरुन विरोध दर्शवून आतून समर्थन केलेले वाघ आवर्जून उपस्थित होते. नव्या व्यवस्थेत लाभाचे पद पदरात पडू शकेल अशी त्यांना आशा होती.

सांस्कृतिक खात्याच्या प्रमुखाने, मोराने बहारदार नृत्य सादर करून पचारिक प्रस्तावनेने  सभेची सुरवात केली, 'काकराज महोदयांची जंगलचा राजा म्हणून निवड झाली तो क्षण इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे!…..’

एक एक जण पुढे येवून महोदयांचा, पुष्प माला घालून आणि भेट वस्तु देवून सत्कार करू लागला. काहीनी नव्या व्यवस्थेत महोदयांकडून अपेक्षाही व्यक्त केल्या.

सरोवरातील लहान माशांचा एक समूह पुढे आला व त्याने जलपुष्पांचा एक भला मोठा हार महोदयांच्या गळ्यात घातला. 'महोदय, आम्ही सरोवरतील लहान मासे. मोठे मासे लहान माशांना खातात. आम्हाला संरक्षण द्या', त्यांच्या नेत्याने विनंती केली.   

जलामृत फूडस' प्रकल्पाची त्वरित घोषणा करण्यात आली. हा प्रकल्प सरोवरात उभारला जाईल. यात माशांना खाण्याचे रुचकर व पौष्टिक खाद्य तयार करण्यात येवून ते मोठ्या माशांना वितरित करण्यात येईल, त्यामुळे त्यांना लहान माशांना खाण्याची आवश्यकता भासणार नाही. लहान आणि मोठ्या माशांनी अत्यानंदाने हवेत उड्या घेऊन व शेपट्या हलवून आभार व्यक्त केले.

हरिण आणि सशांमध्ये या घोषणेमुळे उत्साह संचारला. त्यांनी वाघ सिंहांपासून संरक्षण मागितले. 'गो ग्रीन.२' योजनेस मंजूरी देण्यात आली. सर्व अभय अरण्यात ही योजना त्वरित राबाविण्याचे आदेश निघाले. नदीकाठाने अधिक उत्पादन देणाऱ्या गवताची लागवड करण्यात यावी. हरिण आणि सशाच्या मांसाचा फ्लेवोर असलेले गवताचे गोळे बनविण्यात येवून ते वाघ सिंहाना खाण्यास देण्यात यावेत. ही योजना दोन दशके कार्यान्वित राहील व टप्प्या टप्प्याने बंद होईल. त्या काळात वाघ सिंहानी गवत आणि कंद-मुळे या आहाराकडे वळावे. वाघांनी नाईलाजानेच माना डोलवल्या. ससा टूणकन उडी मारून हरणाच्या पाठीवर बसला तर हरणाने मंडपातील सुशोभित खांबांवर शिंगे घासून आनंद प्रकट केला.

एका तरुण गिधाडाने आपल्या दोन मागण्या मांडल्या, 'आम्ही जंगल स्वच्छतेचे काम करतो, पण मृत प्राण्यांचे मांस खातो म्हणून आमची हेटाळणी केली जाते. आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी. दुसरे असे की माणसांनी 'गिधाडे' नाटक लिहले असून त्याचे प्रयोग सुरू  आहेत. त्यावर बंदी घालण्यात यावी.' सन्मान ही काल्पनिक गोष्ट आहे आणि माणसांचा विषय येथे घेता येणार नाही हे सांगून त्याला खाली बसविण्यात आले.

माणसाशी आमची तुलना करण्यात येवू नये असे विचार व्यक्त करण्याचा गाढवाचा  विचार होता आणि माणसांपासून संरक्षण मागण्याचा बकऱ्या व कोंबड्यांचा विचार होता परंतु परिस्थितीचे आकलन झाल्याने त्यांनी गप्प राहण्याचा निर्णय घेतला.

जंगलात आग लागली होती तेव्हा चिमणीने चोचीत पाण्याचे थेंब नेऊन ती विझवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तिला ‘वीरश्री’ पुरस्कार देवून तिचा सत्कार करण्यात आला.   

त्यानंतर आणखी काही जणांनी आपले विचार मांडले. त्यातील शब्द महोदयांच्या अलौकिक कर्तृत्वा विषयीचे व अभिनंदनपर होते.

महोदयांनी, त्यांच्याकडे विश्वासाने सोपवलेल्या जबाबदारी बद्दल विनयशीलतेने सर्वांचे आभार व्यक्त केले. ‘तुमच्या आशा आकांक्षाची पूर्ती करण्याकरिता मी जीवाचे रान करीन….’, त्यांनी स्वप्न जागवून नवा करार केला!

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 31, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने #राजांचीस्मारके #लोकशाहीचानवाराजाकाकराज

 

No comments:

Post a Comment

Value-Based ADR for Royal Families

Value-Based ADR for Royal Families Heritage, Wealth, and the Burden of Disputes: At the dawn of independence, India faced the monumental tas...