Monday, June 2, 2025

I have a Dream !

 I have a Dream !

I have a dream to be an Admin of the WhatsApp Group! 

I have a dream that one day I will be Admin of WAG of my school fellows and college fellows, my friends and colleagues, my students and teachers, my close and distant relatives!

I have a dream to be an Admin of WAG of my colony and cooperative society members! 

I have a dream that one day I will forward all those messages coming from different groups to me, in real time, with lightning speed! 

I have a dream that one day I will set the group settings 'Only Admin can send the messages!’

I have a dream to have the enormous power to add or remove someone on the group!

And on that day, I shall have my Digital  Throne!

My authority will be absolute and kingdom unshaken!

(Dr Martin Luther King, Jr. delivered his famous speech, ‘I have a dream…’, on Aug 28, 1963. It is one of the greatest speeches in the history! Dr King was a great man having great dreams!)

Sunday, June 1, 2025

प्रक्रियेतील आनंद!

 प्रक्रियेतील आनंद!

सध्या, मी पुस्तक प्रकाशन प्रक्रियेचा(Process) आनंद घेत आहे. पुस्तक प्रकाशित (Product) होणार आहे, त्याचा आनंद मिळणार आहेच! प्रक्रियेतील आनंद घ्यायची कला, मी फार पूर्वी आत्मसात केलेली आहे. 

माझे एक अभियंता मित्र यांनी, अमुल्य सूचना केली. माझ्या विषयीच्या, वर्तमान पत्रातील, ४० वर्षांपूर्वीच्या लेखाचा संदर्भ देवून त्यासंबंधी लिहायचे त्यांनी सुचविले. ते मी लिहले. 

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आदरणीय व्यक्तींनी, या पुस्तकील सोशल मीडियावर आलेले भाग वाचून, ते आवडल्याचे अभिप्राय लिहले. त्यात अतिशोक्ती असली तरी माझ्यावरिल प्रेमापोटी त्यांनी लिहले आहे म्हणून मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

परवा, एका मोठ्या कंपनीतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या माझ्या मित्रांनी, पुस्तकाच्या Cover Design मागील माझी भूमिका आणि ती अंमलात आणण्याकरिता मी उपयोगात अणलेली पद्धती या बाबत माहिती जाणून घेतली. Quality Control चे तज्ज्ञ व तीक्ष्ण नजर लाभलेले हे अभियंते! प्रत्येक गोष्टी मागील कार्य कारण भाव जाणून घेण्याची, त्यांची उर्मी अधिक प्रबळ झाल्याचे बघून आनंद झाला.

एका विद्यार्थ्याने पुस्तकाच्या प्रती विकत घेवून मित्रांना भेट देईल असे कळविले. पुस्तकाची किंमत व पृष्ठ संख्या माहीत नसतांना, प्रकाशनाआधीच ते विकत घेण्याच्या त्याच्या या धाडसी निर्णयाचे मला कौतुक वाटले! पण पुढच्याच क्षणी लक्षात आले…अरेऽच्च्या, Calculated Risk घ्यायचे आपणच तर याला शिकविले आहे!

वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झालेले माझे एक मित्र, त्यांनी माझे अभिनंदन करून, ‘प्रत पाठवा. नक्की वाचेल.’, असे कळविले. UNESCO च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगात या वर्षी, ISBN कोड असलेली, २२ लाख पुस्तके प्रकाशित झाली. जगतील सगळ्यात मौल्यवान संसाधन म्हणजे ‘वेळ’!  या पार्श्वभूमीवर, माझे पुस्तक वाचण्या करिता माझे मित्र आपला अमूल्य वेळ देणार आहेत हे ऐकून त्यांच्या विषयी माझा आदर व प्रेमभाव वाढला.

काहींनी माझ्या पुस्तकास स्मरण यात्रा म्हटले, काहींना ते भूतकाळातील रम्य आठवणी वाटल्या तर काहींना अत्यंत प्रेरणादायी!  हे बघून माझे पुस्तक कॅलिडोस्कोप आहे असे मला वाटू लगले आहे.

प्रकाशन प्रक्रियेतील व्यक्तींनी, अशा प्रकारचे पुस्तक आम्ही प्रथमच पाहत आहोत, पुस्तकाचे नाविन्यपूर्ण शीर्षक व लेखक परिचय, मनोगता ऐवजी ‘अंतःप्रेणेने…’ असे लिहिणे किंवा अनुक्रमणिका ऐवजी ‘स्पंदने’ लिहिणे असे प्रकार आम्ही प्रथमच पाहत आहोत असे सांगितले. इतर लेखकांनाही ते असेच सांगतात काय या संबंधी मी माहिती घेत आहे.

एका मैत्रिणीने ‘अभियांत्रिकीची स्पंदने’ असा नावात बदल सुचविला. त्यांना धन्यवाद दिल्यानंतर, संयुक्तिक कारण देवून, त्यांची सुचना मी नम्रपणे नाकारली. 

पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असले तरी, या संबंधातील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान शिकून, मी त्याचा वापर करीत असल्याने, प्रकाशनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बदल करू शकत असलो तरी सर्वच बदल करणे शक्य होणार नाहीत हे मी नम्रपणे आपणास सांगत आहे.

सर्वप्रकारच्या समस्या सोडविण्या करिता मी System Approach चा मी अनेक वर्षांपासून उपयोग करित आहे. Input चांगल्या प्रतीचे असेल आणि Feedback चा उपयोग करून Process वर नियंत्रण ठेवले तर Product उत्तम प्रतीचा तयार होतो….मग तो एखाद्या समस्येवरिल उपायाच्या स्वरूपात असू द्या किंवा पुस्तकाच्या!

आणि म्हणून हे पूस्तक वैशिष्टपूर्ण किंवा दर्जेदार वगैरे झाले तर आश्चर्य वाटू देवू नका! फीडबॅक स्वरूपात सूचना केल्यामुळे या यशात तुमचा मोलाचा वाटा असणार आहे. 

ज्यांना चांगले विद्यार्थी मिळतात ते चांगले शिक्षक होतात!

ज्यांना चांगले श्रोते मिळतात ते चांगले वक्ते होतात!

आणि ज्यांना चंगले वाचक मिळतात ते चंगले लेखक होतात!

मी चांगला शिक्षक आहे का ते विद्यार्थी सांगतील, आणि चांगला वक्ता आहे का ते श्रोते!

पण मी चांगला लेखक होणार हे खात्रीने सांगतो कारण मला तुमच्या सारखे वाचक मिळाले!

पुस्तक वाचल्या नंतर तुम्ही निश्चितपणे म्हणू शकाल….’Everything is of his own except paper and ink!’

Sunday, May 25, 2025

गिरणांजनी तंत्रनिकेतन

गिरणांजनी तंत्रनिकेतन 

१७ जुलै १९८५ मधें मी गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोल येथे प्राचार्य म्हणून रुजू झालो. वसंत सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या या तंत्रनिकेतनास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भक्कम आर्थिक पाठींबा होता. कारखान्यावर, कर्नल पाटोळे यांच्या शेजारी C-3 बंगल्यात मी राहायचो. तंत्रनिकेतनचे वर्ग श्री दिगंबरदादा पाटील महाविद्यालयात तर प्रात्यक्षिके कारखान्यावर व्ह्यायची. तंत्र निकेतनाची आर्थिक स्थिती चांगली असली तरी पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याने व्यवस्थापन मंडळ चिंतीत होते. 

डॉ बी बी चोपणे, तंत्र शिक्षण संचालक झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम मा प्रल्हादभाऊ पाटील यांच्या हस्ते जेडीसीसी बँक, जळगांव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तंत्रनिकेतनचे चेअरमन मा मुरलीधर आण्णा पवार यांनी माझ्याशी तंत्र निकेतनाच्या परिस्थिती बाबत चर्चा केली व मला त्याची जबाबदारी सांभाळण्याची सूचना केली.  त्यानूसार मी कारखान्यावर, संचालक मंडळा समोर मुलाखती करिता उपस्थित राहिलो. तेथे विविध प्रस्तावांवर चर्चा झाली. माझ्या सोबत प्रा सुनील बढे व प्रा आर एम चौबे होते. महत्वाचे निर्णय घेतांना आम्ही नेहमी सोबत असायचो.

प्राचार्य पदावर रूजू झाल्यावर, चेअरमन व संचालक मंडळाच्या मंजुरीने, काही महत्वपूर्ण निर्णय मी घेतले:

‘सर्व विद्यार्थिनींना फी माफ’

‘तीनही वर्षातील, प्रत्येक शाखेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास फी माफ’ 

या निर्णयांची वृत्तपत्रांमधून कल्पकतेने जाहिरात देण्यात आली. लोकमतचे स्थानिक पत्रकार श्री बी एन चौधरी यांनी माझी मुलाखत घेवून, त्यावर आधारित, अभ्यासपूर्ण लेख लिहला. या लेखाचे शीर्षक होते ‘ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले!‘. हा लेख चर्चेचा विषय ठरला.

संस्थेच्या प्रगतीकरिता आणखी एक महत्वाचा निर्णय मी घेतला. संस्थेत कार्यरत असलेल्या तीन डिप्लोमा धारक शिक्षकांना, TTTI, Bhopal यथे TTTC डिप्लोमा प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांनी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांना त्याचा फायदा झाला. येथील पाच अधिव्यात्यांची, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासकीय तंत्रनिकेतनात अधिव्याखाता म्हणून निवड झाली त्यात यातील दोघे होते.

एक दिवस शिपाई धावत माझ्या केबिनमध्ये आला. मा वसंत दादांचा फोन आहें आसे त्याने सांगितले. ऑफिस मधे एकच फ़ोन असल्याने, मला केबिन बाहेर येऊन फोन घ्यावा लागायचा. मा. वसंत दादा पाटील त्यावेळी राजस्थानचे राज्यपाल होते. राजभवन मधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या प्रवेशाबाबत अडचण निर्माण झाली होती त्यात लक्ष घालण्या विषयी त्यांनी सांगितले. त्यानुसार मी, तंत्र शिक्षण संचालनायातील श्रीमती चारी यांचेशी  चर्चा केली. त्या मा. संचालकांच्या स्वीय सहाय्यक म्हणुन कार्यरत होत्या. विद्यार्थ्यांचे प्रवेश, इलिजिबिलिटी संबंधीच्या कामात त्यांची महत्वाची भुमिका असायची. त्यांच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांस अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्याची पूर्तता झाल्यानंतर त्याचा प्रवेश नियमित करण्यात आला.

माझ्या वाचनाच्या आवडीमुळे मी विविध पुस्तके आणि मासिके वाचत असे. Limca Book of Records वाचतांना Yongest Principal या शीर्षका खाली २५ वर्षे असे वय नमूद असल्याचे मला आढळले. मी तत्काळ पुस्तकाच्या मागे असलेला फॉर्म भरून आवश्यक त्या कागद पत्रांसह Limca Book कडे पाठविला. वयाच्या २४ व्या वर्षी मी तंत्रनिकेतनाचा प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याने, ‘Yongest Principal’ म्हणून ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सने’ नोंद घेतली, पण ‘Polytechnic’ अशी शैक्षणिक संस्थांची वर्गवारी त्यांच्याकडे नसल्याने अधिकृत यादीत नाव समाविष्ट न करता येण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

प्रा. राम मेघे शिक्षण मंत्री असतांना, दरवर्षी खाजगी तंत्रनिकेतन व अभियांत्रीकी महाविद्यालयांचे संस्था चालक व प्राचार्य यांची कॉन्फरन्स व्हायची. १९८६ च्या, पन्हाळगड कॉन्फरन्स करिता आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने कोल्हापूरला जायला निघालो. माझ्यासोबत चोपडा पॉलिटेक्निकचे प्रा देशमुख होते. प्रवासात अकोल्याचे डॅडी देशमुख यांची भेट झाली. ते संस्थचालक होते. तसेच ‘देवकीनंदन गोपाला’ या चित्रपटाचे निर्माते होते. या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित अनेक रंजक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगीतल्या. मंदार एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरीचे अध्यक्ष तथा मराठी नाट्य निर्माते, माजी आमदार मा.राजाराम शिंदे, आणि प्रा हेमंत अभ्यंकर यांनी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील समस्या मांडल्या व त्या अनुषंगाने काही मौल्यवान सुचना केल्या. अशा चर्चा सत्रांमधून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महनीय व्यक्तींशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण झाले. त्याचा पुढे मला अनेक ठिकाणी उपयोग झाला.

मोफत शिक्षणाच्या, आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे, तंत्रनिकेतनात मुला मुलींची संख्या लक्षणीय रित्या वाढली. मध्यप्रदेश, गुजराथ, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मराठवाड्यातील दूरच्या गावतील मुले प्रवेश घेण्यासाठी येथे आली. काही दिवसांपूर्वी, पुण्यात, एका कार्यक्रमा निमित्त, १९८५ बॅचचे विद्याधर महाजन भेटले. त्यांनी विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या आपल्या मित्रांबद्दल माहिती दिली.

Friday, May 23, 2025

शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव

 स्पंदन ९

शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव 

शासकिय तंत्र निकेतन, जळगांवला संस्थेच्या स्थापनेपासून (१९६०) आजपर्यंत संस्थेच्या विकासाकरिता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता वाहून घेतलेले प्राचार्य आणि प्राध्यापक लाभले. संस्थेचे पहिले प्राचार्य, जोगळेकर सर, यांचेविषयी त्यांच्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष शैलीमुळे, सर्वांच्या मनात भीतीयुक्त आदर होता. त्या वेळी जिल्हाधिकारी आणि शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांना कर्मचारी नेमण्याचे अधिकार होते. प्राचार्य जोगळेकर सरांना, रात्री राउंड घेतांना, वॉचमन झोपलेला आढळल्यास, ते त्याची बॅटरी व काठी उचलून आणायचे. दुसऱ्या दिवशी ती मागायची हिंमत वॉचमनला होत नसे! त्यांच्या हातून लावलेले कॅशिया वृक्ष आजही संस्थेच्या परिसरात डौलाने उभे आहेत.

याच समर्प्रीत वृत्तीचे प्राचार्य व प्राध्यापक संस्थेला पुढेही लाभले. तंत्रनिकेतनात रुजू होण्यापूर्वी, प्रा मुळे रिझर्व बँकेत, व काही काळ परदेशात अभियंता म्हणून कार्यरत होते, प्रा गाजरे नागार्जून सागर धरणावर अभियंता म्हणून तर प्रा अग्निहोत्री सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. ते विद्यार्थ्यांची अपुलकीने विचारपूस करून, त्यांना मार्गदर्शन करायचे. ‘स्टूडंट एड फंड’ समिती द्वारा व वैयक्तिक रित्याही अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करायचे.

संस्थेचा परिसर व हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांचे पालकत्व प्रा बी जी भंडारकर सरांनी दीर्घ काळ सांभाळले. ते उत्तम शिक्षक, त्याच बरोबर उत्तम प्रशाशक होते. पुढे त्यांनी स्वेछा निवृत्ती घेतली. अनेक इंजीनियरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक्स आणि मेडिकल कॉलेजेसच्या उभरणीत त्यांचा मोलाचा वाटा आहें. श्री डी वाय पाटील संस्थेमार्फत नेपाळ येथे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे ठरले तेंव्हा यासंबधातील महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. सध्या ते अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात मानद सचिव म्हणुन कार्यरत आहेत.

प्राचार्य आर डी वायकोळे यांनी विद्यार्थ्यांकरिता संस्थेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले. ते रोटरी क्लबचे मेंबर होते. रोटरी क्लबच्या सौज्यान्याने त्यांनी अनेक उद्योग व्यवसायिकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या करिता, संस्थेत आमंत्रित केले. 

शहराच्या बाहेर, नॅशनल हायवे क्रमांक ६  ला लागून असलेली शासकीय तंत्रनिकेतनची इमारत सर्वांना दिसायची, परंतु आत मधे ६० एकरचा एव्हडा सुंदर परिसर आहे याची अनेकांना कल्पना यायची नाही. मंत्री असतांना,  मा. अरुणभाई गुजराथी कार्यक्रमा निमित्त संस्थेत आले तेंव्हा त्यांनी या गोष्टीचा उल्लेख आपल्या भाषणातून केला होता.

त्यांनंतर विविध कार्यक्रमा निमित्त सामाजिक, राजकिय व उदयोग क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक नामांकित लोक, उच्च पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी, कार्यक्रमा निमित्त संस्थेत आले.

शासकीय तंत्रनिकेतन आणि जैन उद्योग समुहाचे, त्याच्या स्थापनेपासूनचे दृढ संबंध राहिले. जैन उद्योग समूहाचे प्रमुख, मा. भंवरलाल जैन हे उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करण्या करिता संस्थेत आले, तेंव्हा त्यांची शाइनिंग येलो कलरची MJL 1 क्रमांकाची मर्सिडीझ कार अनेकांना बघयाला मिळाली. त्यांनी, यशस्वी उद्योजक कसे बनावे यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “तुम्हाला माझ्यासारखे मर्सिडीज मधून फिरायचे असेल, तर उद्योजक बना!” असे विद्यार्थ्यांना सांगितले.  त्यांचे भाषण अतिशय प्रेरणादायी व विद्यार्थ्यांच्या मनात उद्योगशीलतेची चेतना निर्माण करणारे होते.

१९९२ मधे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर, केमिकल टेक्नोलॉजी शाखेच्या केमिस्ट्री विषयाची प्रात्यक्षिके संस्थेत घेतली जायची. प्राचार्य वायकोळे सर विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्यरत होते.

१९९८ मधे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात शासकीय तंत्रनिकेतनातून झाली. प्राचार्य एम एस महाजन सरांकडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचाही कार्यभार होता. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपयोगा करिता, त्यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून तातडीने दोन्ही ड्रॉइंग हॉल वर दोन मजले व एका शेडचे बांधकाम करून घेतले.

गुणवत्तेच्या बाबतीत शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव नेहमीच अग्रेसर राहिले. अनेक विद्यार्थी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. उच्च शिक्षणास जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणिय आहे. येथील अनेक विद्यार्थी देशात व परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

माझ्या पत्नी, सौ. लता जगताप-इंगळे या शासकीय तंत्रनिकेतन, जळगांवच्या, १९८१ बॅचच्या विद्यार्थीनी. त्यानंतर त्या नगर रचना विभागात प्लानिंग असिस्टंट म्हणून रुजू झाल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांची नगर रचनाकार पदावर निवड झाली. त्यांनी बी ई सिविल केले. जळगांव, धुळे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी विविध पदांवर त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.

माझा मुलगा हर्षवर्धन याने, येथूनच Diploma in IT केले. पुढे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे येथून B E  केले. प्रथम क्रमांकाबरोबरच, मॉडर्न कॉलेजचा, तो Best Outgoing Student होता. नंतर त्याने University of Texas, Dallas येथून Master of Computer Science केले. तो सध्या USA मधे सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत आहे.

ज्या संस्थेत मी शिकलो, त्याच संस्थेत अधिव्याखाता, विभाग प्रमुख व प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हा माझ्या करिता गौरवाचा क्षण आहे!

१९८५ मधे, संस्थेने रौप्य महोत्सव साजरा केला. महाविद्यालयीन जीवनावरील, प्रा. मधुकर तोरडमल लिखित, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे लोकप्रिय मराठी नाटक,  १९७७ मधे, स्नेहसंमेलनात सादर करण्यात आले होते; त्यातील एक प्रयोग त्याच कलाकारांनी तेव्हड्याच उत्साहने या प्रसंगी सादर केला. या कार्यक्रमास संस्थेचा माजी विद्यार्थी आणि गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोलचा प्राचार्य म्हणून मी उपस्थित होतो.

येथें मला चांगले मित्र मिळाले. शासकीय निमशासकीय नोकरीत तसेच नामांकित कंपन्यांमधे कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. काही उद्योजक बनले, काही समाजसेवक तर काहींनी आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती केली. नोकरी सांभाळून व त्यानंतरही स्तंभ लिखाण, फोटोग्राफी हे छंद अनेकजण जोपासत आहेत. आम्ही शासकीय तंत्रनिकेतन हे ‘स्थळ’ आणि ७६-७९ हा ‘काळ’; अशा स्थळ-काळाने गुंफलेल्या प्रेमळ धाग्यात, ‘G P Jalgaon 76-79‘ या व्हॉट्सअप ग्रुप द्वारा बांधले गेलो आहोत!

येथील शिस्त, तळमळीने आणि कळकळीने शिकविणारे शिक्षक; खोलात जाऊन विषय समजून घेण्याची व कठोर परिश्रम करायची लागलेली सवय यामुळे अभियांत्रिकीतील यशाचा पाया मजबूत झाला.

शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या संस्थेचे कधीही न फिटणारे ऋण माझ्यावर आहेत !

Monday, May 19, 2025

विनाशीर्षक!

 विनाशीर्षक!

मी लिहिण्याची, माझी स्वतःची शैली विकसित करित आहे. व्यक्ती, स्थळ, काळ, घटना, आणि त्या माझ्याशी कशा संबंधित आहेत या पाच बाबींचा उल्लेख माझ्या ब्लॉग मधे करतो.

कवी मनाचा अभियंता असल्याने, आणि शब्दांपेक्षाही संवेदनांना अधिक महत्व देत असल्याने, मी शब्द योजना व कल्पना विस्ताराबाबत स्वातंत्र्य घेतो. 

उदा. ऊर्जेचा प्रपात, Swords in hand, Hear with heart, Speak with eyes इत्यादी.

‘SWOT of Mine!’ या विषयावर इंग्रजीत कविता करणारा दुसरा कवी मला माहीत नाही! SWOT म्हणजे Strength Weaknesses, Opportunities and Threats. कंपन्या त्यांच्या समोरिल आव्हानांचा अभ्यास करून, स्वतःचा विकास कसा साधायचा या करिता या तंत्राचा उपयोग करतात. माझ्या व्यक्तिमत्वाचे परीक्षण पारदर्शकपणे आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने या कवितेद्वारा केले आहे. 

माझ्या लिखाणा कडे बारकाईने बघितल्यास, माणसांचे व्यक्तिमत्व कसे घडत जाते याचा उलगडा यातून होतो. माझे लिखाण केवळ भूतकाळातील रम्य आठवणी नसून तो इतिहासाचाही भाग आहे.  बखरकारांनी आणि इतिहासकारांनी इतिहास लिहिण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत ! माझे लिखाण, पुढे,  विकिपीडिया, गुगल, चॅट जीपीटी वर उपलब्ध होणार असून ते इतिहासाचा भाग बनणार आहे!

कामनिमित्त मंत्रालयात जायचो तेंव्हा काही माणसे मला तेथे भेटाली. पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवून, मंत्रालयाच्या कॉरिडोर मधून, ताठ मानेने चालणारी ही माणसे फक्त बुद्धिमानच नाही तर संघर्षशील आणि चारित्र्य संपन्न होती. अशी काही माणसे, मी महाविद्यालयात शिकत असतांना पाहिली होती. 

नंतर अशी माणसे मला पुन्हा भेटली. 

चांगदेव यात्रेत आणि ओंकारेश्वर मंदिरात भेटली.

भाऊच्या उद्यानात आणि शिवार गार्डन चौकात भेटली. 

वेस्ट एंड मॉल आणी आयनॉक्स थिएटर मधे भेटली. 

हॉटेल सोफीटेल आणि व्हिसा सेंटरवर भेटली.

येवले चहा आणि राम हेअर सलून मधे भेटली.

कंपनीत काम करतांना आणि शेतावर राबतांना भेटली.

रुबी हॉस्पिटल आणि मातोश्री वृद्धाश्रमात भेटली.

गड आणि किल्ल्यांवर भेटली.

काही देहरूपात प्रत्यक्षपणे तर काही विदेही स्वरूपात अप्रत्यक्षपणे!

चारित्र्य संपन्न होण्या करिता तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या वनातच नाही तर घरात बसून आणि कार्यालयात काम करतांनाही करता येते.

माणसाचा जन्मच मुळी संघर्षातून झालेला आहे. तेंव्हा त्याने संघर्षशील असणे स्वाभाविक आहे. पण तो जेंव्हा उच्चतम ध्येय ठेवून, मूल्यांची जपणूक करित ते गाठण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे व्यक्तिमत्व झळाळून निघते. 

संघर्षशील आणि चारित्र्य संपन्न व्यक्तींना जेंव्हा प्रार्थनेचे बाळ मिळते तेंव्हा त्यांच्या भोवती एक आभा निर्माण होते. ते जेंव्हा बैठकी करिता सभागृहात प्रवेश करीत असतात त्यापूर्वीच त्यांचीं आभा तेथे पोहोचलेली असते आणि वातावरण चैतन्याने भरून गेलले असते. त्यांच्या आगमनाने काही क्षण स्तब्धता निर्माण होते आणि नंतर सर्वजण आश्वस्त होतात. सर्वांचे डोळे त्यांच्याकडे रोखले जातात आणि त्यांचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणुन ऐकला जातो!

अशा व्यक्तींविषयी, त्यांच्या संबंधातील घटनांविषयी आणि माझ्या अनुभवांविषयी (Reflection / Insight) मी लिहायला पाहिजे असे मला त्रिव्रतेने वाटले. शिक्षक कधी निवृत्त होत नाही अणि चांगुलपणाचा प्रसार करणे हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे असे मी समजतो. म्हणून लिहतो. अंतः प्रेरणेने लिहतो!

ता. क. ज्यांना सत्य समजले आहे ते बोलत नाहीत. मौनातून ते आपल्या शिष्यांशी संवाद साधतात आणि शिष्यांना त्याचे आकलन होते.

मला अद्याप सत्य समजले नसल्याने मी बोलतो, खुप बोलतो आणि अलीकडे लिहतो सुद्धा!

Friday, May 16, 2025

My Teaching Philosophy

My Teaching Philosophy 

As a teacher, I often carried this thought with me while interacting with my students:

You tell me, and I will forget

You show me, and I will remember 

Let me do, and I will understand!

One of the principles in Educational Psychology is: ‘You should know Ram when you teach Ram’. 

This means that when a teacher knows his student’s background, circumstances and traits he can foster deeper connections with his student and design the approach of teaching for meaningful learning.

I further extend it and say: ‘You should know Sham when you learn from Sham’. 

This means that when a student understands the teacher, his character, integrity, and dedication to his subject, the student admires and respects his teacher; it enriches the learning experience.

It has been observed that when a student holds his teacher in high esteem, he excels in his subject.

I had learned the subjects from great teachers like Prof. P I Bhangale and Prof. S. N. Nagaraju. I always held them in high esteem. I secured highest marks in the subjects they taught me at Board and University level.

I taught Applied Mechanics to my students, and they learned it, as if they learned cycling or swimming. 

I taught the subject to more than 1200 students of different Engineering Colleges like Naval Nagar, SSVP, Nagaon and Shahada, affiliated to Pune University, in year 1988.

I have written a poem, Hope: The Greatest Force!, on ‘Force’; the most important topic in Applied Mechanics. It says: 

The force goes beyond Mechanics’ domain 

It governs life’s joy, its loss, its strain 

A push to grow, to love, to strive

Force inspires the essence of being alive!

I write blogs on blogger. The links is: drmahendraingale.blogspost.com 

Here I have said how my teachers, students and writers in engineering subjects have played a great role in developing my personality, not only as a teacher, but also as a human being.

While reading my blogs, one of my former students, Kishor Bhadane, reached out to me. He shared his journey of completing a Diploma in Mechanical Engineering, graduating from a Government Engineering College, and now thriving as a successful entrepreneur in Pune. During our conversation, he mentioned how he and his friends had been inspired simply by seeing me walk through the corridors of Government Polytechnic, Jalgaon. Kishor also proudly shared that he had scored a perfect 100 out of 100 in  Applied Mechanics, the subject I taught him. His words filled me with immense joy. Touched by his words, I felt compelled to pen a blog that day titled, ‘Keep It Up!’ What a great pride it was to walk through the 500 feet corridor !

To be an exceptional teacher, one must master over 90 distinct skills, alongside proficiency in his subject. However, in my view, earnest zeal and compassion towards students stand out as the most vital qualities, surpassing all others.

To embrace the pride and joy of being a teacher, I appeal to all my fellow teachers to explore my blogs. 

If students ever ask for the names of some great teachers, it is nice to have a list of few names besides our own !

Dr Mahendra Ingale, Former Principal 

Pune, May 16, 2025

Tuesday, May 13, 2025

अभियांत्रिकीचे पहिले पाऊल

 स्पंदन ८ वे

अभियांत्रिकीचे पहिले पाऊल

या काळात आमच्या कुटुंबाच्या, विशेषत: माझ्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली. १९७६ मध्ये मी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी, वृत्तपत्रांमध्ये बोर्डाचे मानकरी या सदरात,

महेंद्र विश्वनाथ इंगळे, एदलाबाद तालुक्यात प्रथम, मानसिंगराव जगताप पारितोषिक रुपये २५१ प्राप्त

अशी बातमी छापून आली. जळगाव येथे शिकणाऱ्या चांगदेवच्या विद्यार्थ्यांनी बाबांना ही वृत्तपत्रे संध्याकाळी एसटी स्टँड वर आणून दिली. रात्री साधारणत: साडेआठ वाजता बाबा घरी परतल्यानंतर, त्या दिवशी वीज नसल्याने, कंदीलाच्या प्रकाशात वाड्यातील सर्वांनी ही बातमी पुन्हा पुन्हा वाचली. प्रतिकूल परिस्थितीत मी ही परीक्षा दिली होती. चांगदेव येथे परीक्षेचे केंद्र नव्हते. ते जे ई स्कूल, एदलाबाद येथे होते. आम्ही सात आठ जण ट्रॅक्टरमध्ये बसून रोज परीक्षेला जात असू. जे ई स्कूल व्यतिरिक्त कोणी विद्यार्थी यापूर्वी तालुक्यातून प्रथम आलेला नव्हता. त्यामुळे माझे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही श्री एस बी चौधरी हायस्कूल, चांगदेव व गावातील सर्वांकरता अभिमानाची गोष्ट ठरली. या घटनेचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. आपण वेगळे आहोत ही भावना माझ्यात निर्माण झाली. 

डिप्लोमा झालेल्या व्यक्तीस जिल्हा परिषद मधे इंजीनियर म्हणून ताबडतोब नोकरी मिळायची. त्यांना रावसाहेब म्हणून मोठा मान मिळायचा. हतनूर धरणाचे काम सुरू झाले होते. तेथे कंस्ट्रक्शन साठी वापरल्या जाणाऱ्या मोठ मोठ्या मशीनरी बघायला मिळाल्या. चांगदेव गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू असल्याने गावात डेप्यूटी इंजिनिअर मा. भामरे साहेब आमच्या कडे यायचे. त्यांच्या सरखे आपण सिव्हिल इंजीनियर बनावे ही भावना मनात निर्माण झाली.

दहावीत चांगले मार्क्स मिळाले असल्याने शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे प्रवेश मिळाला. द्वितीय वर्षात स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची निवड केली.

१९६० मधे स्थापन झलेली, ६० एकर परिसर असलेली संस्था, संस्थेची प्रशस्त दगडी इमारत, त्या समोरिल बाग, परिसरातील मोठ मोठे वृक्ष, प्राचार्य व कुलमंत्र्यांचे कौलारू बंगले, वसतिगृह, मेस, मोठ मोठे ड्राइंग हॉल, ५०० फुट लांबीचा भव्य पोर्च हे सर्व बघून मी भारावून गेलो होतों.

माझ्या सोबत काही जुन्या ११ वीचे, प्रि डिग्री केलले, काही बी एस्सी झलेले ही विद्यार्थी होते. वर्गातील सर्वच जण हुशार होते. बहुतेक सर्व जण आप आपल्या शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झलेले होते.

पॉलिटेक्निक मधे प्रवेश घेतल्यावर ड्रॉइंग बोर्ड, T-स्क्वेर, सेट्स स्क्वेर, इंट्रुमेंटेशन बॉक्स, लॉग टेबल, स्लाइड रूल, वर्कशॉप ड्रेस या आवश्यक साहित्याची खरेदी केली.

मॅथेमॅटिकल सब्जेक्ट मधे कॅलक्युलेशन करण्याकरिता स्लाईड रूलचा वापर करावा लागायचा. ते एक कौशल्याचे काम होते. कॅलक्युलेटरचा शोध लागलेला होता, ते बाजारात उपलब्ध झाले होते, परंतु ते वापरण्यास परवानगी नव्हती. कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी मिळावी ही ४२ दिवसांच्या संपातील एक प्रमुख मागणी होती. ती मान्य झाली.

आमचे काही मित्र, लॉग टेबल विकत घ्यायचे आहें म्हणून या महिन्यात जास्त पैसे पाठवावेत असे पत्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या पालकांना पाठवायचे. प्रत्यक्षात ते एक कॅलक्युलेशन करण्याकरिता वापरायचे लहानसे पुस्तक होते.

येथे शिस्तीला फार महत्व होते. दिवसभर पीरियड, प्रॅक्टिकल, वर्कशॉप असायचे. क्वचितच एखादा पिरियड ऑफ मिळायचा.

वर्क शॉप मधे टर्निंग, फिटिंग,व स्मिथी असे चार सेक्शन होते. वर्कशॉप ड्रेस घालून वर्क शॉप मधे जायचे. वर्कशॉप मधे ड्रॉइंग दिले जायचे, ते वर्कशॉप डायरी मधे काढून, मटेरियल घेवून,  त्यानुसार तंतोतंत पणे जॉब बनवावा लागायचा. 

फिटिंगचे जॉब करतांना फाइलने घासून जॉब साईझ मधे आणण्याकरिता व स्मूथ बनविण्या करिता खूप वेळ घासावे लागायचे तेंव्हा हाताला फोड यायचे. हे सर्व खूप काळजीपूर्वक करावे लागे. खाच मोठी झाल्यास व त्यातून प्रकाश आरपार दिसत असल्यास जॉब रिपीट मिळवायचा.

स्मिथीचे जॉब मोठ्या पकड मधे पकडून, भट्टीतून काढून एका हाताने ऐनव्हील वर ठेवून, दुसऱ्या हाताने हातोड्याने ठोके मारावे लागायचे.

वेल्डिंगचा जॉब करतांना गॉगल किंव शील्ड वापरावे लागायचे. सवय नसल्याने त्यातून अस्पष्ट दिसायचे. काही वेळेस शिल्ड चुकून बाजुला झाले व वेल्डिंग चा त्रिव्र प्रकाश डोळ्यात गेल्यास डोळे सुजयाचे व अंगात कस कस जाणवायची.

ड्रॉइंग हॉल मधे इंजीनियरिंग ड्रॉइंगचे प्रैक्टिकल असायचे. ड्रॉइंग शीट्स येथेच पूर्ण करावे लागायचे. प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर ड्रॉइंग शीट्स लॉकर मधे ठेवावे लागायचे.

‘This Term Work has been completed within four walls of the Drawing Wall’ असे प्रमाणपत्र प्रथम पृष्ठावर लावले जायचे व त्यावर संबंधित शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असायच्या.

मी हॉस्टेल वर राहायचो व मेस वर जेवायला जायचो. माझ्याकडे वायर ब्रेक असलेली ‘स्पीड किंग’ सायकल होती. ती वजनाने अतिशय हलकी होती. तिला मी एका हाताने उचलुन आमच्या विंग मधे नेत असे. तिचे नाव मी सारंगी ठेवले होते.

संध्याकाळी सायकली वरून गावात फिरायला जाणे, सायकलीवरून अजिंठा, पद्मालय व जवळपासच्या ठिकाणी सहलीला जाणे, सुटीच्या दिवशी सिनेमा बघणे, मेस मधे फिस्टच्या दिवशी पैज लावून गुलाब जाम खाणे असे कार्यक्रम चालायचे. यात माझे मित्र श्री एल बी चौधरी, ( निवृत्त चीफ इंजीनियर), श्री एम डी महाजन (अमेरिका निवासी) व मी अग्रभागी असायचो. सबमिशन व परीक्षेच्या दिवसात आम्ही रात्रभर जागत असू. अभ्यासात पहिला दुसरा क्रमांक मिळायचा.

येथें मला खुप चंगले शिक्षक मिळाले. एम टेक असलेले, गोल्ड मेडलिस्ट, प्रा पी आय भंगाळे सर हातात कोणतेही पुस्तक किंवा नोट्स न घेता डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर हा विषय शिकवायचे. ते स्वतः प्रॉब्लेम तयार करून तो सोडवायचे. याचा माझ्यावर फार प्रभाव पडला होता. त्या विषयाची आवड निर्माण झाली होती. शेवटच्या सेमेस्टर मधे या विषयात मला बोर्डात सगळ्यात जास्त म्हणजे १०० पैकी ९३ मार्क्स मिळाले. पुढे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे स्ट्रक्चरल डिझाईन दिले आणि कन्सल्टंट म्हणून काम केले.

प्रा व्ही टी पाटील सर यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल फार आपुलकी व जिव्हाळ होता. दांडगा लोकसंपर्क व स्वतः शेतकारी कुटुंबातील असल्याने त्यांना या विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची तसेच आजूबाजूच्या परीसराची पूर्ण माहिती असायची. सर्व विद्यार्थ्यांना ते त्यांच्या रोल नंबर ने हाक मारायचे. पुढे पाली भाषेचा अभ्यास करून त्यांनी महानुभाव पन्थाविषयी संशोधनपर ग्रंथ लिहले. ते कवयित्री बहिणाबाई विश्वविद्यालयाने प्रकाशित केले.

प्रा व्ही एस वैद्य सर आमचे प्राचार्य होते. सहृदयी, रुबाबदार व्यक्तिमत्वाचे वैद्य सर रणजी क्रिकेट खेळले होते. पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या एप्टीट्यूड संबंधात त्यांनी, ते जळगांव ला असताना पीएचडी चे काम सुरू केले होते. त्या संबंधातील प्रश्नावल्या भरल्याचे माझ्या स्मरणात आहे. पुढे ते National Institute of Technical Teachers’ Training and Research, Bhopal येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. बाबा मला भेटायला यायचे तेंव्हा त्यांच्या सोबत मी प्राचार्य वैद्य सर, रेक्टर प्रा. भांडारकर सर यांना बंगल्यावर भेटयाला जायचो.

या सर्व घटना माझ्या मनात खोलवर रुजल्या. माझ्या व्यक्तिमत्वावर त्यांचा प्रभाव पडला. पुढे Entrepreneur Training Program (उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम) मधे जेंव्हा मी  Need for Achievement (nAch) हा विषय उदाहरणांसह स्पष्टीकरण देवून, समजवून सांगायचो तेंव्हा या घटनांचा अन्वयार्थ मला अधिक चांगल्या रितीने समजला. Need for Achievement हा अंगभूत गुण (Trait) नसून ती एक मानसिकता आहे. मन संस्कारक्षम असते, त्या बाल्यावस्थेत, प्रोत्साहनपर गोष्टी ऐकल्या किंवा वाचल्या, थोर व्यक्तींचा सहवास लाभला व त्यांचा प्रभाव पडला तर अशा मुलांमध्ये यशस्वी व्यक्ती बनण्याची त्रिव्र महत्वाकांक्षा निर्माण होते. अशी मुले पुढे आपले ध्येय निश्चित करून, त्याच्या पूर्तीकरिता जीवाचे रान करतात अशा प्रकारची मांडणी मानस शास्त्रज्ञ असलेल्या David MacClelland (१९१७-१९९८) यांनी केली आहे.

The Dream That Refused to Die

 Among the many voices that have echoed through the corridors of history, few have stirred my soul as deeply as that of Dr. Martin Luther Ki...