कृतज्ञता !
आज संध्याकाळी श्री नंदलाल सापकाळे यांचा फ़ोन आला. ते माझे सहकारी होते. त्यांनी सांगितले की शासकीय अधिकारी राहिलेल्या त्यांच्या एका नातेवाईकांनी पनवेल वरून कळविले की त्यांनी माझे पुस्तक वाचले. माझ्या विषयी व पुस्तकाविषयी त्यांचे नातेवाईक जे बोलले ती स्वस्तुती होईल म्हणून मी येथे लिहीत नाही. मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद कळविले.
यानिमित्ताने एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला.
मी शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे शिकत असतांना मा. शालिग्राम पाटील हे शिपाई म्हणून कार्यरत होते. पुढे मी प्राध्यापक म्हणून कार्यरत असतांनाही ते तेथे होते. नियत वयोमानानुसार ते नंतर निवृत्त झाले. त्यावेळी आम्ही त्यांचा निरोप समारंभ आयोजित करून यथोचित गौरव केला. कार्यक्रमात त्यांच्या पत्नी, मुली व जावई उपस्थित होते.
मी प्राचार्य पदावर कार्यरत असताना एक दिवस त्यांच्या पत्नी व जावई माझ्या कडे आले. तेव्हा त्यांचे निधन झाले होते हे मला कळले. त्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन पत्नीस मिळावे म्हणून त्यांच्या पत्नी अर्ज व कागदपत्रे घेवून कोषागारात गेल्या तेव्हा त्या ठिकाणी वारसदार म्हणून पत्नीचे वेगळेच नाव आढळले. कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना ते दाखविले. ‘आमच्याकडे AG Office कडून जे आदेश आले आहेत त्यावर तुमचे नाव नसल्याने आमच्या स्तरावरून काही करता येणार नाही. या संबंधात तुम्हाला AG Office, Mumbai कडे संपर्क साधावा लागेल’ असे कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
‘तुम्हाला काही अडचण आल्यास इंगळे दादांना भेटायचे’. असे काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितले होते, असे त्यांच्या पत्नींनी मला सांगितले. पाटील मला प्रेमाने दादा म्हणायचे. त्यांचा माझ्यावरचा विश्वास पाहून मला गहिवरून आले.
मी ताबडतोब आस्थापना विभागातील सहकाऱ्यांना बोलावून त्यांचे सेवा पुस्तक आणण्याच्या सूचना केल्या. त्याच वेळेस एका महत्वाच्या विषयावर माहिती संकलन करून ती वरिष्ठ कार्यालयामार्फत मंत्रालयात सादर करण्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू होते. त्यांची केस फार जुनी असल्याने, रेकॉर्ड रूम मधून ते शोधून आणणे थोडे अवघड असल्याने श्रीमती पाटील यांना २/३ दिवसांनी येण्यास सांगावे अशी विनंती मला सहकाऱ्यांनी केली. मी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचे काम प्राधान्याने करण्याबद्दल नेहमीच आग्रही असायचो.
त्याच वेळेस निवृत्त झालेले माझे सहकारी श्री नंदलाल सपकाळे काही कामनिमित्त कार्यालयात आले असल्याचे मला समजले. मी त्यांना बोलावून पाटील यांचे सेवापुस्तक शोधून आणायची विनंती केली, कारण यापूर्वी काही काळ त्यांनी त्या विभागात काम केले होते. ते आनंदाने तयार झाले. त्यांनी परिश्रम घेवून पाटील यांचे सेवापुस्तक शोधून आणले.
सेवा पुस्तकात वारसदार म्हणून त्यांच्या पत्नीचे व्यवहारातील प्रचलित नाव लिहलेले होते. पाटील निवृत्त झाले तेव्हा त्यांनी स्वतः ते नाव निवृत्ती अर्जावर लिहले होते. आधार कार्ड आणि ऑनलाइन पद्धतीने निवृत्ती अर्ज करण्याची पद्धत तेव्हा अस्तित्वात नव्हती. पाटील यांनी सादर केलेल्या अर्जानुसार AG ऑफिस कडून त्यांची पेंशन ऑर्डर ट्रेझरी कडे गेली होती व त्या नुसार त्यांना पेंशन मिळत होते.
प्रत्यक्षात त्यांच्या पत्नीचे नाव वेगळे होते. सेवा निवृत्ती आदेशातील नाव आणि श्रीमती पाटील यांच्याकडे असलेल्या कागद पत्रावर असलेल्या नावाची व्यक्ती एकच आहे हे सिद्ध होऊ शकेल असा कोणताही कागदपत्राचा पुरावा त्या सादर करू शकत नव्हत्या. अशा परिस्थितीत AG office कडे जाऊनही काही उपयोग नव्हता.
मी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी व जेष्ठ विभाग प्रमुखांशी या बाबत चर्चा केली.
मी, श्रीमती पाटील यांना एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) करायला सांगितले. निवृत्ती वेतन आदेशात असलेल्या नावाची व्यक्ती आणि त्या एकच व्यक्ती आहे अशा आशयाचे ते प्रतिज्ञापत्र असावे हे त्यांना सांगितले. त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र करून आणल्यानंतर मी AG office कडे सविस्तर पणे एक प्रस्ताव सादर केला. त्यात सर्व घटनांची तपशीलवार माहिती दिली. त्याच बरोबर निवृत्ती वेतन आदेशात नमूद असलेल्या व कागदोपत्री असलेल्या व्यक्ती एकच आहेत आणि मी त्यांना प्रत्यक्षरित्या ओळखतो असे त्यात नमूद केले. मी आहरण व संवितरण अधिकारी (Drawing and Disbursing Officer) असल्याने जबाबदारीपूर्वक हे लिहले होते. पंधरा दिवसांनी श्रीमती पाटील यांच्या नावाचा वारसदार म्हणून उल्लेख असलेला आदेश कोषागारास प्राप्त झाला.
निवृत्त झाल्या नंतरही श्री सपकाळे यांची आम्हाला जी मदत झाली होती त्या घटनेची, मी त्यांना या निमित्ताने आठवण करून दिली तेव्हा त्यांचा कंठ दाटून आल्याचे मला जाणवले !
माझ्या जीवनात कृतज्ञता या शाश्वत मूल्याला अनन्य साधारण महत्व आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेले असे क्षण जीवंत करून, मी त्यांना शब्दबद्ध करतो तेव्हा त्यापासून मिळणारा आनंद शब्दातीत असतो. कृतज्ञता ही केवळ भावना नसून, ती आत्म्याला स्पर्श करून, हृदयात दिव्य स्पंदने निर्माण करणारी एक अनुभूती असते !