३६. प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आज निरोपाचा दिवस. तीन वर्षापूर्वी तुम्ही या संस्थेत आला होतात. तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी या संस्थेत प्रवेश केला तेव्हा गेटवरील सिक्युरिटी, साठ एकरांचा वनराईने नटलेला संस्थेचा विस्तीर्ण परिसर, संस्थेची मुख्य दगडी इमारत, विविध विभागांच्या इमारती, मुलांची आणि मुलींची वसतीगृहे, कॅन्टीन, वर्कशॉप, तुमच्यासारख्याच प्रवेशा करिता आलेल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची झालेली गर्दी बघून तुम्ही कावरे बावरे झाल होतात. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर, तुम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये आलात तेव्हा तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रवेश समितीचे प्रमुख प्रा. के. पी. वानखेडे, प्रा. गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन करून याच ड्रॉइंग हॉलमध्ये तुमची बसण्याची व्यवस्था केली, त्यावेळेस तुम्ही थोडे निश्चिंत झालात. ज्या शिस्तबद्ध रीतीने प्रवेश प्रक्रिया पार पडत होती, ते बघून, तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित झालात. या वेळी मी माझ्या केबिनमध्ये असलो तरीसुद्धा पूर्वानुभवाने मी या सर्व गोष्टी कल्पनेने अनुभवत होतो.
प्रवेश प्रक्रिया संपली. तुम्हाला या संस्थेत प्रवेश मिळाला. कॉलेज सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हा सर्वांचे, आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विभाग प्रमुखांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत. ती तुम्ही मनापासून ऐकलीत. पुढील काळात त्याचे अनुपालनही केले. या तीन वर्षाच्या कालावधीत, तुम्ही भरपूर अभ्यास केला, विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला, त्यांच्या आयोजनात हिरीरीने सहभाग घेतला. तुमच्यापैकी काहींना Dipex या राज्यस्तरीय Project Competition मधे, काहींना राज्यस्तरीय Paper Presentation, Technical Quiz Competition मधे प्रथम पारितोषिक मिळाले. तुमचा गुणगौरव झाला. तुमच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता विद्यार्थी सभा व पालक मेळाव्यात तुम्ही उत्साहाने सहभाग घेतला, सूचना केल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीत मदतही! विशेषतः हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुला मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांची सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची असते. विभाग प्रमुख व रेक्टर असलेले डॉ. राजेश पाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सहकार्य केले. कधीही कुठला अनुचित प्रकार घडला नाही ही खरोखरच सर्वांकरिता कौतुकास्पद बाब आहे.
तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे हे आपणा सर्वांना माहित आहेच. या संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचारी हे एका कुटुंब प्रमाणे आहेत याचा आपण अनुभव घेतला आहे. आता आपण येथून बाहेर पडून एका नवीन जगात प्रवेश करणार आहात. त्यात तुम्हास कदाचित एवढी सुरक्षितता लाभणार नाही, परंतु येथे मिळालेल्या बाळकडूच्या आधारावर तेथेही यशस्वी होऊन नावलौकिक मिळविणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. कारण यापूर्वी तुमच्या सारखेच अनेक विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी देशात व परदेशात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. तुमच्या पैकी काही जणांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी, येथील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली ही खरोखरच समाधानाची बाब आहे.
तुम्ही या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर एक यशस्वी अभियंता म्हणून बाहेर पडणार आहातच पण एक चारित्र्यसंपन्न माणूस व्हावा याकरिता यापुढेही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहा. यशस्वी अभियंता बनणे सोपे आहे. चारित्र्यसंपन्न माणूस बनणे कठीण आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे. ती एक तपश्चर्या आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, कृतज्ञता यासारख्या शाश्वत मूल्यांचा विसर पडू देऊ नका. आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगा. गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगली, आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगली ते सर्वजण मोठी माणसे झालीत.
तुम्ही ऐश्वर्या संपन्न व्हा. पद, पैसा आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहेच. कदाचित त्याला थोडा वेळ लागू शकतो. पण केवळ ते मिळवण्यासाठी मूल्यांचा बळी देऊन, स्वप्रतिमा मलिन होईल अशा तडजोडी करू नका. मूल्याधिष्ठित जीवन जगा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ समाधान मिळू शकते. सत्तास्थानी असतांना, आयुष्यात अनेक मोहाचे क्षण येतील तेव्हा विवेक बुद्धीचा उपयोग करून त्यांना झिडकारा. नियमितपणे प्रार्थना करा. त्यामुळे अंतर्मनाच्या कौलानुसार निर्भयपणे तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकाल.
नाविन्याचा हव्यास धरा. प्रत्येक गोष्ट करतांना, ती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करा. त्याचे एक वेगळे समाधान तुम्हाला मिळेल. संधी मिळेल तेव्हा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाविषयी नम्रपणे इतरांना सांगा. कदाचित काहीजण त्यामुळे प्रोत्साहित होऊ शकतील. चांगुलपणा प्रसारित करा. चांगले मित्र जोडा. मैत्री जपा. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांत त्यांची साथ तुम्हाला मोलाची ठरेल.
संधी मिळेल तेव्हा, यशस्वी माणसांना भेटण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणसांना, दुसऱ्यांना मदत करतांना आनंद मिळतो. त्यामुळे आत्मविश्वासपूर्वक त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा व त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणसांबद्दल अनेकांनी लिहले आहे, त्यांची व्याख्या केली आहे. पण मी सांगतो ते ही लक्षात ठेवा. ‘A person who is in a position to help others should be called a Succesful Person.’
या निमित्ताने एका प्रसंगा विषयी आपणास सांगतो आणि थांबतो. हा प्रसंग ‘Father of Modern Management’ म्हणून जे ओळखले जातात, त्या पीटर ड्रकर यांच्या विषयीचा आहे. त्यांनी तो सांगितला आहे. अनेकदा सांगितला आहे. गोष्टी स्वरूपात मी तुम्हाला सांगतो. प्रसंग असा आहे :
शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचाराला, ‘What do you want to be remembered for?’ विद्यार्थ्यांनी आप आपल्या समजुती नुसार उत्तरे दिली. शिक्षकांनी ती शांतपणे ऐकली. नंतर ते म्हटले, “विद्यार्थी मित्रहो, या प्रश्नाचे उत्तर तुमच्या कडून अपेक्षित नाही. त्याकरिता तुम्ही फार लहान आहात, पण मोठे होण्या आधी या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधावे अशी माझी अपेक्षा आहे.” चाळीस वर्षानंतर, शाळेच्या गेट टुगेदर कार्यक्रमात माजी विद्यार्थी भेटले, तेंव्हा ‘हा’ प्रश्न तुम्हाला आठवतो का असे त्यांनी एकमेकांना विचारले. सर्वांचे उत्तर ‘हो’ होते. या कार्यक्रमात पीटर ड्रकर यांच्या सोबत अनेक जण होते. त्यापैकी काहीजण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, लेखक, बिझिनेस एंपायरचे मालक आणि राष्ट्र प्रमुख होते !
अशा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पण महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी सांगण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री आहे. अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेत तसेच पुढील आयुष्यात तुम्हाला भरभरून यश मिळो याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा! यशस्वी भव!!
(शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात व्यक्त केलेले मनोगत)