Saturday, July 19, 2025

लिहले !

छोट्या मधुरा सोबत रील केले.

ते तुम्हाला आवडले.

सहज म्हणून फेस बुक वर पोस्ट लिहली.

ती तुम्हाला आवडली.

आणखी लिहा म्हटले.

लिहले.

मग तुम्ही ब्लॉग लिहा म्हटले. 

Blogger वर लिहले. त्याचे नियम पाळून लिहले. 

ते ही तुम्हाला आवडले.

आणखी लिहा म्हटले. आणखी लिहले.

जगभरात अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असलेले सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे साडेचार हजार माजी विद्यार्थी  LinkedIn वर आहेत. LinkedIn वर लिहा म्हटले. तेथे लिहले. 

लिहत राहा म्हटले. लिहत राहीलो. 

जगभरातील मान्यवर जेथे महत्वाच्या विषयांवर नावीन्यपूर्ण पद्धतीने लिहतात त्या Medium वर लिहा म्हटले. तेथे लिहले. Leadeship, Decision Making, Need for Achievement, Psyche या विषयांवर लिहले. आणखी वेगळ्या विषयांवर लिहले. नाविन्यपूर्ण पद्धतीने लिहले. अंतःप्रेरणेने लिहले. परमेश्वराच्या कृपेने लिहले.

जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या मोठ्या व्यक्तींना, कुठलाही डेटा उपलब्ध नसताना, ऐतिहासिक महत्वाचे निर्णय घेत असताना उपयुक्त ठरू शकेल असे Decision Making चे Model सादर केले.

हे सर्व इंग्रजीत लिहले.

मराठीत लिहा म्हटले.

मराठीत लिहले.

व्यवस्थापन शास्त्रातील (Management) अनेक महत्वाच्या संकल्पनांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, त्यांना अनुसरून, प्रसंगांचा, घटनांचा उल्लेख करून गोष्टी रूपाने लिहले.

ते कॅलिडोस्कोप सारखे झाले. काहींना ते स्मरणरंजन तर काहींना प्रेरणादायी वाटले. पण सर्वांना आवडले.

पुस्तक लिहा म्हटले.

ते लिहले.

आणखी लिहा म्हणत आहेत.

आणखी लिहत आहे.

वेब साइट सुरू करा म्हटले. www पेक्षा https ही वेबसाइट अधिक secured आणि latest trend ची आहे म्हणून ती सुरू करा म्हटले.

तसे केले.

https://mahendraingale.com 

या नावाने ती सुरू केली.

प्रक्रियेचा आनंद घेत आहे.

तो तुम्हालाही मिळावा म्हणून लिहले.

Tuesday, July 15, 2025

संवेदनशीलता !

संवेदनशीलता !

भाऊच्या उद्यानात, दत्त मंदिरा समोरील बाजूने पाण्याच्या टाकीजवळील बाकावर बसून, मी मंदिरासमोरील कारंज्यांकडे बघत आहे. कारंज्यातून उसळी घेणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या तुषारांमुळे बाहेरच्यापेक्षा वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हे तुषार खाली येवून पॉंड मधील कमलदलांवर पडत आहेत. सकाळी असते त्यापेक्षा माणसांची वर्दळ कमी आहे. 

समोर पौर्तुगीज वास्तूशैलीतील, ‘भाऊचे उद्यान’ या सोनेरी अक्षरांनी सुशोभित भव्य प्रवेशद्वार, त्याच शैलीत निर्माण केलेला उंच खांब व त्यावरील घड्याळ दिसत आहे. घड्याळाचा लहान काटा ७ वर आणि मोठा ६ वर आहे.

ओंकारेश्वर मंदिरातून थोड्या वेळा पूर्वी मी उद्यानात आलो.  ट्रॅक वर चालत असतांना, ‘ये कांहा आ गये हम ….’ हे स्वर कानावर पडताच पावले थांबली. पाथ वे वरील स्टँडिंग स्पीकर जवळ जाऊन, ते मी अधिक लक्षपूर्वक ऐकू लागलो. काही क्षणानंतर  ‘तुम यही हो …यही कही हो …’ हे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील शब्द ऐकताच संवेदनांचा झरा वाहू लागला.

आता मी असे थांबू शकतो. पाहिजे तेव्हढा वेळ थांबू शकतो. त्याकरिता मी स्वतंत्र आहे. पूर्वी असे नव्हते.

मुंबईत असताना ‘गॅलेक्सी-गैटी’ मधे ‘सिलसिला’ बघितला होता. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या संवेदना प्रगटल्या आणि आता निर्माण झालेल्या संवेदनांमधे मिसळून गेल्या. त्यातून नवीन संवेदना निर्माण झाल्या. या संवेदना माझ्यात नेमका कोणता भाव निर्माण करीत आहेत याचा मी विचार करू लागलो.

संवेदना कशा निर्माण होतात, त्या कशा निर्माण करता येवू शकतात याचा विचार करत असताना, छत्रपती संभाजी नगर येथे Capacity Building या प्रशिक्षण कार्यक्रमात, प्रशिक्षणार्थींमध्ये संवेदना (Sensation) निर्माण करण्याकरिता, सुदान मधील दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या, मार्च १९९३ मधे न्यूयॉर्क टाइम्स मधे प्रसिद्ध झालेल्या, एका फोटोचा वापर मी केला होता याची मला आठवण झाली. 

व्यक्ती संवेदनशील असल्यास तिची कार्यक्षमता वाढते अशी माझी धरणा आहे. अलीकडे, माझ्या भाषणात आणि लेखनात, संवेदनशील हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरला आहे.

Monday, July 14, 2025

Great Author!

Great Author!

आज प्राचार्य एम एस महाजन सरांना भेटलो.

सरांचे, शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे असताना, १९८६ मधे, जेव्हा Statistical Quality Control हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ती आम्हा सर्वांकरिता अभिमानाची गोष्ट ठरली होती. धनपत राय सारख्या नामांकित पब्लिशरनी हे पुस्तक प्रकाशित केले होते. देशातील जवळ जवळ सर्व विद्यापीठात आणि प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांत विद्यार्थी आणि प्राध्यापक हे पुस्तक वापरत होते. 

प्रकाशकांच्या आग्रहानुसार, सरांनी १९८२ मधे हे पुस्तक लिहायला सुरवात केली. Statistical Quality Control या विषयातील जागतिक स्तरावर मान्यता असलेले तज्ञ Eugene Grant यांनी या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले Grant हे सरांचे आदर्श होते. परंतु त्यांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांनाच काय प्राध्यापकांनाही समजायला अवघड जायचे!

केरळ राज्यातील त्रिचूर येथे Total Quality Management  (TQM) या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. महाजन सर सहभागी झाले असताना, प्रशिक्षण देणारे प्रा. राघवेंद्र यांना श्री महाजन यांचे कार्यक्रमात लक्ष नाही असे समजून त्यांना एक प्रश्न विचारला. महाजन सरांचे खरोखर लक्ष नव्हते. परंतु समयसूचकता बाळगून,  त्यांनी बोर्डवर लिहलेले काही शब्द बघून त्या अनुषंगाने बोलायला सुरवात केली. ५/७ मिनिट ते बोलत होते. प्रा. राघवेंद्र आश्चर्य चकित होऊन म्हणाले, “यातील बराचसा भाग अजून शिकवायचा आहे, मिस्टर महाजन!”.  तेव्हा प्रा. धनोकरांनी सांगितले, ‘सर, ‘Statistical Quality Control’ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रा राघवेंद्रांनी त्यांना नाव विचारले. नाव ऐकल्यानंतर, “या विषया करिता मी तुमचेच पुस्तक  वापरत असतो.”, असे ते म्हणाले.

या सारखे अनेक अनुभव सरांनी सांगितले. Author होण्याचे काय फायदे असतात तेही सांगितले. अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभल्याने, मलाही ते मिळतील हा विचार माझ्या मनात आला!

Sunday, July 13, 2025

सहकारी, मी आणि प्रशासनाचा आरसा !

सहकारी, मी आणि  प्रशासनाचा आरसा !

काल श्री सुरेश गोस्वामींशी बोललो. ते माझे लेखन आवर्जून वाचतात. शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे ते प्रबंधक म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या ४० वर्षाच्या सेवेत, त्यांना तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकुण १६ प्राचार्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यातील काहींची गुण वैशिष्ट्ये त्यांनी मला सांगितली. गुणग्राहकतेचा त्यांचा हा पैलू मला नव्याने समजला!

इक्विपमेंट मशीनरी पुरविणारे, सिक्युरिटी सर्विसेस व सफाई कामगार पुरविणारे कंत्राटदार, बांधकाम कंत्राटदार, विविध सेवा पुरविणारे पुरवठादार, ‘ग्रांट आली का, बिले कधी निघणार’ याची चौकशी करायला संस्थेत यायचे. यासंबंधातील सर्व माहीती, पत्रव्यवहार संबंधितांना दाखवून ग्रांट उपलब्ध झाल्यावर त्वरित बिले काढण्यात येतील असे सांगुन त्यांना आश्वस्त करण्याची जबाबदारी मी श्री गोस्वामी यांच्याकडे सोपविली होती. ते, ती उत्तमरित्या  पार  पाडत असत म्हणुन  माझ्या पर्यंत कोणी लोक येत नसत. ते या लोकांशी अतिशय सौजन्याने वागायचे आणि त्यांना चहा पाजायचे. कंत्राटदारांना चहा पाजणारे अधिकारी म्हणून मी त्यांचा अनेकदा उल्लेख करायचो. अभ्यागतांच्या  चहापाना वरील खर्च म्हणुन, त्यांना हा कार्यालयीन खर्च म्हणून दाखविता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही.

शासकीय तंत्रनिकेतन जळगाव ही मोठी संस्था. येथे सहा अभियांत्रिकी शाखा आणि फार्मसी शाखा आहे. शासकीय तंत्रनिकेतन, मुक्ताईनगर या संस्थेच्या प्राचार्य पदाचाही कार्यभार माझ्याकडे होता. कामात सुलभता यावी म्हणून प्रा पी पी गडे यांचेकडे, मुक्ताईनगर तंत्रनिकेतना संबंधातील कामकाजा करिता समन्वयकाची जबाबदारी सोपविली होती. ते, ती इतक्या उत्तमरित्या पार पाडत होते की मंत्रालयातील अल्प संख्यांक विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी परस्पर संपर्क करून माहिती घ्यायचे आणि काही निर्देश द्यायचे. त्यानुसार त्वरित अंमल बजावणी केली जायची.  बांधकाम प्रगती अहवाल (Progress Report) तयार करताना स्थापत्य विभाग व सार्वजनिक बांधकाम  विभागा  सोबत समन्वय करणे, ग्रँटची मागणी करताना, मागील निधी पूर्णपणे खर्च झाला आहे, त्यासंबंधीचे विवरण असलेले प्रमाणपत्र -Utilisation Certificate (UC) तयार करण्याकरिता लेखा विभागा बरोबर समन्वय करणे या जबाबदाऱ्या ते व्यवस्थित पार पाडायचे.

मुक्ताई नगर तंत्रनिकेतन संस्थेच्या बांधकाम शीर्षा (Head) खाली ४ कोटी रुपये प्राचार्यांच्या खात्यात जमा होताच मी लेखा विभागाला त्वरीत चेक लिहायला सांगितले. स्वाक्षरी करून, प्रा गडे यांचे हस्ते पुढील प्रक्रिये करिता तो ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला. कंत्राटदारांना हे माहीत झाल्यावर ते संस्थेत आले. आभार व्यक्त करायचे म्हणून भेटी करिता चिठ्ठी पाठविली. ‘तुमचे आभार पोहचले. भेटीची आवश्यकता नाही. ते शासकिय काम होते आणि माझे कर्तव्य होते’, असे मी त्यांना कळविले.  त्यावेळेस, गेल्या अनेक वर्षांपासून, १५ सप्टेंबर रोजी, मी ज्यांच्या चरित्राविषयी बोलत आलो आहे आणि ज्यांच्या कर्तव्यनिष्ठे  संबंधातील ‘दोन मेणबत्त्यांची गोष्ट’ मी सांगत आलो आहे ते महान अभियंता भारतरत्न विश्वेश्वरय्या माझ्या समोर उभे आहेत असे मला वाटले!

कळशीतील पाणी!

कळशीतील पाणी!

तापी- पूर्णा नद्यांच्या संगमा ठिकाणी, किनाऱ्यावर उभा राहून मी अथांग जलाशयाकडे बघत आहे. सेंद्रिय गवतावर माझे पाय भिजले आहेत. हातात कळशी आहे. नुकताच पाऊस कोसळून गेला आहे. आकाश निरभ्र झाले असून सभोवतालच्या परिसराला झळाळी अली आहे आणि वातावरण चैतन्याने भरून गेले आहे. वातावरणात गारवा आहे. पक्षी त्यांच्या पंखांनी पाणी झटकत, झाडांच्या फांद्यांवर विसावा शोधत  आहेत. नावाड्यांनी होड्या सोडायला सुरवात केली आहे. तराफ्यांवर बसून, प्रवाहात खोलवर जाऊन, भोई जाळे फेकत आहेत. 

काही तरुण तरुणी नद्यांना आलेले पूर बघत, पनघटावर हास्य विनोदात मग्न आहेत. वटेश्वर मंदिराच्या शेजारी निंब आणि पिंपळ एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे आहेत. त्यांच्या पारावर बसून भाविक  मंडळी भजने म्हणत हरी नामात तल्लीन झाली आहेत. त्यांचे स्वर चांगदेव मंदिरच्या गाभाऱ्यातील मंत्रोच्च्यारांशी समरस झाले आहेत. मंदिरात, संत व साधू अभिषेकाच्या पवित्रतेत लीन झाले आहेत.


हातातील कळशी प्रवाहात बुडऊन भरून घ्यावी. नदी पात्राकडून मंदिराकडे जाणाऱ्या पनघाटवरील पायऱ्यांवरून चढून, वटेश्वर महादेवावर जल अभिषेक करावा, नंतर पनघटा वरील तरुण तरुणींना आणि पारावर बसलेल्या भाविकांना, ते तहानले असतील तर कळशीतील पाणी द्यावें असा विचार मझ्या मानात आला!

Friday, July 11, 2025

शासकीय सेवेत सन्मानाने जगा !

शासकीय सेवेत सन्मानाने जगा !

माझ्या लेखनाला आपल्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. यात केवळ कौतुक नाही तर एक आत्मीयता आहे जी माझ्या अंतरंगाला स्पर्शून नवीन स्पंदने निर्माण करते. 

मागील ब्लॉगमध्ये मी ‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा!’ या नव्या पुस्तक लेखनाचा संकल्प जाहीर केला होता आणि त्यामागची पार्श्वभूमीही उलगडली होती. गुरु पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करून, या पुस्तकाच्या लेखनास औपचारिक सुरुवात केली आहे. 

या ग्रंथाच्या माध्यमातून मी शासकीय सेवेतील संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख अधिकार्‍यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे दर्शन घडविणार आहे. विविध घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांच्या उदाहरणांतून प्रशासनातील अनेक पैलू आपोआपच उलगडले जातील. कामानिमित्त माझा संबंध आला आणि ज्यांची कार्यशैली मला जवळून बघता आली अशा अनेक कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांबद्दल मी लिहणार आहे. साधेपणाच्या तेजाने झळकणारे, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी मा. सीताराम कुंटेएखादा प्रकल्प हातात घेतल्यावर देहभान विसरून त्यात स्वतःला झोकून देणारे, प्रतिभाशाली व कलावंत मनाचे मा. मनुकूमार श्रीवास्तव;  दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल उत्पादनात लक्षणियरीत्या वाढ करण्यात योगदान देणारे पहिले Inspector General of Registration (IGR) मा. नितीन करीर यांच्याबद्दल लिहणार आहे. या अधिकार्‍यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पद भूषविले. सेवा संस्काराचा वारसा लाभलेले, निःस्पृहतेने काम करणारे मा. भूषण गगरणीअत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यतत्पर अधिकारी मा. प्रविण परदेशी यांच्याबद्दल लिहणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनात विविध ठिकाणी कार्यरत राहिलेले, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचे प्राचार्य डॉ एन टी खोब्रागडेसहसंचालक पदावर कार्यरत राहिलेले, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केलेले प्राचार्य मा डी पी नाठे;  सहकाऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेणारे व तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलेले प्राचार्य एम एस महाजन यांच्याविषयी लिहणार आहे. 

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 'कार्य संस्कृती अभियान' आणि 'पगारात भागवा' हे प्रकल्प राबवितांना जीवाचे रान करून, पायला भिंगरी लाऊन वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत महाराष्ट्रभर दौरे करणाऱ्या, शेवटच्या श्वासपर्यंत अधिकाऱ्यांच्या कल्याणा करिता झटणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस राहिलेल्या मा. ग दि कुलथे यांच्या बद्दल लिहणे ही माझ्या कडून त्यांना विनम्र आदरांजली ठरेल. 

संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकभिमुखता केंद्रस्थानी ठेवून जेव्हा प्रशासन चालते तेव्हा लोक कल्याणाचे दरवाजे उघडले जातात. शासकीय सेवेत सन्मानाने जगणारे अधिकारी हे समाजाच्या आशा आकांक्षांची पुर्ती करणारी शक्ती असतात. अशा अधिकार्‍यांच्या कार्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त होते. एक उच्च दर्जाचे मूल्याधिष्ठित आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. इतिहासात त्यांच्या कार्य कर्तृत्वाची नोंद होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ ठरतात. 

या सर्व प्रेरक व्यक्तिमत्वांकडून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या अनुभवांनी माझ्या विचारांना दिशा दिली. त्या सर्वांप्रती कृतज्ञता भाव ठेवून मी हे लिहणार आहे.

Thursday, July 10, 2025

धुळे भेट – भावस्पर्शी क्षण !

 धुळे भेट – भावस्पर्शी क्षण !

आज एका कार्यक्रमानिमित्त धुळे येथे जाण्याचा योग आला. त्या निमित्ताने शासकीय तंत्रनिकेतन, धुळे या माझ्या सेवास्थळी सदिच्छा भेट देण्याचा मनोदय पूर्ण झाला. या संस्थेत मी १९८९ साली अधिव्याख्याता म्हणून आणि २०१५ साली प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्या काळातील आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या.

संस्थेचे  प्राचार्य डॉ. आर. जी. वाडेकर यांच्या पुढाकाराने नवीन इमारतीचे बांधकाम आणि अंतर्गत रस्त्यांचे काम वेगाने सुरू असल्याचे पाहून समाधान वाटले. पांझरा नदीच्या किनाऱ्याने, संस्थेच्या बाजूने, राष्ट्रीय महामार्गापासून शहरात जाणारा चार पदरी रस्ता पूर्ण झाल्यामुळे संस्थेपर्यंतचा प्रवास आता अधिक सुलभ झाला आहे.

सध्या महाराष्ट्रातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आज ऑप्शन फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस असल्याने संस्थेच्या परिसरात विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती जाणवली. प्रवेश प्रक्रियेला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद उत्साहवर्धक होता.

कार्यालयातील कर्मचारीवर्ग व प्राध्यापकांशी संवाद साधताना मन आनंदित झाले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या शुभेच्छा मनाला भावून गेल्या. मी कार्यरत असताना त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

माझे ‘अभियांत्रिकी स्पंदने’ हे पुस्तक मी संस्थेला भेट म्हणून अर्पण केले. माझ्या आठवणी, अनुभव आणि विचार पुन्हा एकदा त्या वास्तूत गुंजले आणि नवीन स्पंदने निर्माण झाली !

The Dream That Refused to Die

 Among the many voices that have echoed through the corridors of history, few have stirred my soul as deeply as that of Dr. Martin Luther Ki...